विधिमंडळात घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय! सुनील तटकरेंकडून नाराजी व्यक्त; मंत्री कोकाटेंबद्दल म्हणाले...
23-Jul-2025
Total Views |
नवी दिल्ली : अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधिमंडळात जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री माणिकराव कोकांटेंवर जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी बुधवार, २३ जुलै रोजी माध्यमांशी संवाद साधला.
सुनील तटकरे म्हणाले की, "माणिकराव कोकाटेंनी काल घेतलेली पत्रकार परिषद मी पाहिली. त्यांची सरकारबद्दल असलेली विधाने अनुचित आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्याशी बोलतील आणि त्यासंदर्भातील भूमिका व्यक्त करतील. माणिकराव कोकाटे आणि माझे बोलणे झाले नाही. विधान भवनाच्या अखत्यारितील हा विषय आहे. विधानसभा, विधानपरिषदेचा हा आवार पूर्णपणे विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापतींच्या नियंत्रणाखाली येतो. त्यामुळे जे शूटिंग झाले, ते उचित नव्हते. या सगळ्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधिमंडळात जो प्रकार घडला, तो निंदनीय आहे. विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापतींनी या विषयाची सखोल चौकशी सुरु केली असेल. चौकशी केली पाहिजे," असे ते म्हणाले.
"महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून किंवा मुंबई राज्य असतानासुद्धा महाराष्ट्राच्या सुसंस्कृत लोकशाहीची थोर परंपरा यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरु केली. विरोधकांशी असलेले सौहार्दाचे संबंध, विधिमंडळाच्या कामकाजात अनेकदा प्रखर टीका झाली, पण ती टीका शाब्दिक होती. अलीकडे जे काही घडते आहे ते अत्यंत क्लेशकारक आहे. मी २० वर्ष विधानसभा, ५ वर्ष विधानपरिषदेत होतो आणि १५ वर्षे राज्याचा मंत्री म्हणून काम केले. अलीकडे विधानभवनात घडलेल्या घटना अत्यंत क्लेशकारक आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या परंपरेला गालबोट लागणाऱ्या आहेत. यावर सर्वांनी स्पष्ट भूमिका मांडली असून या संदर्भात काही साधनसुचिता करणे आवश्यक आहे," असेही सुनील तटकरे म्हणाले.