सा.‘विवेक’ प्रकाशित आणि मंदार मोरोणे व प्रांजली काणे लिखित ‘मोरोपंत पिंगळे-द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ या पुस्तकाचे प्रकाशन प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते दि. ९ जुलै रोजी नागपूर येथे संपन्न झाले. यावेळी बोलताना मोरोपंतांचे वयाच्या पंचाहत्तरीवरचे विचार सरसंघचालकांनी मांडले. यावरून सुतावरून स्वर्ग गाठत विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवृत्तीचा सल्ला सरसंघचालक देत असल्याचा जावईशोधही लावला. त्यानिमित्ताने याचा वाट्टेल तसा अर्थ लावत अर्थाचा अनर्थ करणारी आजची माध्यम यंत्रणा असो अथवा नेते त्यांच्या वर्तवणुकीवर केलेला हा विमर्श...
सा.‘विवेक’ प्रकाशित मोरोपंत पिंगळे चरित्र ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन दि. ९ जुलै रोजी नागपूर येथे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संपन्न झाले. स्वाभाविकपणे डॉ. मोहनजी भागवत यांचे, मोरोपंत पिंगळे यांच्या कार्यकर्तृत्वावर बोलणे झाले. संघ ज्यांना माहीत आहे आणि समजतो, त्यांच्या हे लक्षात येईल की, डॉ. मोहनजी भागवत आज जरी सरसंघचालक असले, तरी त्यांची कार्यकर्ता म्हणून जी जडणघडण झाली ती, मोरोपंत पिंगळे यांच्या काळात झाली आहे. संघाचे काम पारिवारिक काम आहे, म्हणून आताच्या पिढीला आणि मोहनजींच्या पिढीलादेखील मोरोपंत हे पितृतुल्य आहेत.
मोरोपंतांचे अनेक किस्से सांगत असताना, मोहनजींनी मोरोपंतांचा एक किस्सा सांगितला. "मोरोपंत एकदा म्हणाले की, वयाची पंचाहत्तरी झाल्यानंतर शाल देऊन तुमचा सन्मान झाला की, त्याचा अर्थ असा करायचा असतो की, तुम्ही आता थांबा. तुमचे वय वाढले आहे. बाजूला व्हा आणि दुसर्यांना जागा करून द्या.”
असे बोलण्याची मोरोपंतांची खास एक शैली होती आणि त्या शैलीत मोरोपंतांचे बोलणे झाले की, सभागृह हास्याने डुंबून जात असे. प्रत्येक स्वयंसेवक हा प्रतिज्ञित स्वयंसेवक असतो आणि ‘स्वयंसेवकाचे व्रत मी आजन्म पाळीन,’ अशी त्याला प्रतिज्ञा घ्यावी लागते. ‘आजन्म पाळीन’ याचा अर्थ शेवटच्या श्वासापर्यंत मी संघकार्य करीत राहीन.
म्हणून संघकार्यातून कोणालाही ‘रिटार्यमेंट’ नसते, निवृत्ती नसते. ‘पद्मश्री’ पुरस्कार समारंभातील एका उपकार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मला विचारले, "रमेशजी, विवेक का काम अभी भी हैं या?” मी त्यांना म्हणालो, "संघकाम से छुटकारा नहीं होता|” ते अर्थपूर्ण हसले. वय वाढले म्हणून संघात कोणालाही घरी बसविले जात नाही. वाढत्या वयानुसार जबाबदारीत बदल होतो. माझ्यासारख्या वयाने वाढत चाललेल्या स्वयंसेवकाचा विचार करता, संघात आमच्यावर कोणीही दैनंदिन संघकामाची जबाबदारी टाकत नाही. कारण, त्यासाठी सतत प्रवास करावा लागतो, सतत बैठका घ्याव्या लागतात. असो. एवढे सर्व चर्हाट सांगण्याचे कारण पुढे आहे.
डॉ. मोहनजींचे वक्तव्य प्रसिद्ध झाले. ते मोरोपंतांविषयी काय बोलले, ‘विवेक’विषयी काय बोलले, याची कोणी बातमी नाही केली. ‘पंचाहत्तर वर्षांनंतर निवृत्त झाले पाहिजे,’ या एका वायाची बातमी केली. प्रिंट आणि इलेट्रॉनिक मीडिया अत्यंत कडक भाषेत म्हणायचे तर, शेण खाणारा झाला आहे. भाषणातील एक वाय उचलायचे, त्याचा संदर्भ सोडून द्यायचा आणि त्या वायानंतर काय बोलले याचाही विचार करायचा नाही आणि आपल्या सडया डोयातून निरनिराळ्या कल्पना काढून, भाषणकर्त्याच्या माथी मारायच्या.
सरसंघचालकांनी नरेंद्र मोदी यांना संदेश दिला आहे, असा अर्थ बांगे रावतापासून बंगलोरी खर्गेंपर्यंत सर्वांनी लावला आणि हे वीर काय बोलतात, यांचे शब्द चाटण्याचे काम सवयीप्रमाणे मीडियाने केले आणि रोज त्याच्यावर काही ना काही वक्तव्य चालू असतं. स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा अन्य कारणांमुळे राजकारणात ज्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे, असे बांगी आणि बंगळुरुचा भोंगा आहेत.
संघाची प्रथा कुठल्याही जाहीर भाषणातून कोणालाही, कसलाही इशारा देण्याची नसते. ७५ वर्षे झाल्यानंतर मोदींनी पंतप्रधानपदी राहायचे की नाही, हे मोदींनी आणि पक्षाने ठरवायचे आहे, तिसरा कोणीही हे ठरवू शकत नाही. बांगी गँग आणि भोंगा ब्रिगेडला मोदी नको आहेत. मोदी राहिले, तर त्यांची दुकानदारी भरभराटीस येत नाही. त्यांच्या दुकानदारीवर खूप मर्यादा पडतात. सत्तेच्या राजकारणाचा हा स्वभाव आहे. कोणत्याही राजाला लोकशाही नको असते. कारण, राजा आणि त्याची सरदार मंडळी यांच्या सत्तेवर आच येते. तसेच, मोदींच्या बाबतीत आहे. मोदी जोपर्यंत सत्तेवर आहेत, तोपर्यंत या बांगी आणि भोंगेवाल्यांची सत्तेची भूक भगण्याची शयता नाही. म्हणून मोदी जाण्यासाठी ते देव पाण्यात बुडवून बसले आहेत.
मोदींना नको या त्यांच्या विषयसूचीत सरसंघचालकांना खेचण्याचे काहीही कारण नाही. त्यांना या सत्तेच्या साठमारीत खेचणे हा अधमपणा आहे. आता बांगी आणि भोंगेवाले म्हणतील की, सत्तेच्या राजकारणात असेच वागायचे असते. संधी आली की तिचा उपयोग करायचा. आली नाही तर, संधी निर्माण करायचा प्रयत्न करायचा; पण आपला ढोल वाजवायचे काही बंद करायचे नाहीत. त्या सर्वांनी एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला पाहिजे की, नरेंद्र मोदी हे संघस्वयंसेवक आहेत. राजकारण करण्यापूर्वी ते संघ प्रचारक होते. ते प्रतिज्ञित स्वयंसेवक आहेत आणि संघाच्या प्रतिज्ञेमध्ये ‘हे व्रत मी आजन्म पाळीन,’ असे शब्द आहेत. तेव्हा ते व्रतस्थ स्वयंसेवक आहेत. त्यांनी पंतप्रधानपदी राहायचे की, आणखी कोणत्या पदावर राहायचे हे अन्य कोणालाही ठरविण्याचा काहीही अधिकार नाही.
आणखी काही वर्षांनंतर म्हणजे २०२९ साली सार्वत्रिक निवडणुका आहेतच. तोपर्यंत मनोसक्त बांग देत बसा आणि बंगळुरुहून भोंगे वाजवत बसा. जर तुमच्या या सर्व उचापतींचा परिणाम झाला आणि जनता जनार्दनाने ठरविले की, नरेंद्र मोदी यांची पंचाहत्तरी झाली आहे, तेव्हा त्यांना आता निवृत्त केले पाहिजे तर ती खर्या अर्थाने लोकशाही होईल आणि लोकांनी असे ठरविले की, पंचाहत्तरी होवो, अथवा पंचाऐंशी होवो आम्हाला मोदीच हवे आहेत, तर तीदेखील लोकशाहीच होईल. तेव्हा शहाणपण यातच आहे की, आपण लोकशाहीतील या जनता जनार्दनाच्या आदेशाही वाट बघत बसूया.
रमेश पतंगे
९८६९२०६१०१