‘टी-सिरीज’सारखा ब्रॅण्ड जेव्हा राजू कलाकारसारख्या इन्स्टाग्राम कंटेंट क्रिएटर्सना सोबत घेऊन संगीत व्हिडिओची निर्मिती करतो, तेव्हा एकूणच भारतातील ‘क्रिएटर्स इकोनॉमी’ आणि मनोरंजन क्षेत्रात एक आमूलाग्र बदल घडू लागल्याचे स्पष्ट संकेत मिळतात. काय आहेत हे बदल, त्याचेच हे आकलन..
दिल पे चलाई छुरीयाँ’ हे आजकाल प्रत्येकाच्या मुखोद्गत असलेल्या गाण्यांपैकी एक. हे मूळ गाणे राजू कलाकार यांच्या अकाऊंटवरून 14 कोटींहून अधिक लोकांनी पाहिले. तसेच ‘टी-सिरीज’ने तयार केलेल्या संयुक्त प्रसिद्धीनंतर 50 लाखांहून अधिक लोकांपर्यंत ते पोहोचले. पूर्वापार गाणी प्रसिद्ध करण्याच्या पद्धतींमध्ये म्युझिक चॅनेल्स, रेडिओ, म्युझिक अॅप्स, कॉलर ट्यून्स इत्यादी माध्यमे होती. कालांतराने युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्राम ही नवमाध्यमे या पंक्तीत येऊन बसली. अर्थात, मजकूर किंवा आशय अपलोड केल्यानंतर त्याला प्रत्यक्षात व्ह्यूज, लाईक्स आणि कमेंट्स येतात. त्यामुळे त्याचे मोजमाप सहज शक्य होते. नेमकी हीच बाजू आता नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरताना दिसते.
राजू कलाकार यांचे एक गाणे व्हायरल झाले. ज्याचे अनुकरण करुन हजारो रिल्स इन्स्टाग्रामवर झळकल्या. अर्थात, संगीत क्षेत्राच्या दृष्टीने हा आशय तितकाच महत्त्वाचा असल्याकारणास्तव एका बड्या संगीत कंपनीला या गाण्याची दखल घेणे भाग पडले. ‘टी-सिरीज’ने तातडीने नव्याने निर्माण केलेल्या या गाण्यात गायक सोनू निगमला पाचारण करावे लागले. संगीत व्हिडिओ म्हटल्यानंतर त्यात कलाकार मंडळीही आलीच. त्यातही पुन्हा सोशल मीडिया क्रिएटर्सना स्थान मिळाले. अर्थात, यात एकही प्रसिद्ध सिनेकलाकार, अभिनेता-अभिनेत्री नाही. याचा अर्थ क्रिएटर्स क्षेत्रामुळे या गोष्टींची परिभाषाच बदलणार आहे. ‘टी-सिरीज’कडे आपसूकच या गाण्याचे हक्क आले. त्यानंतरचा व्यावसायिक नफा हा भाग तर वेगळाच. मात्र, नव्या बदलामुळे जाहिरात क्षेत्राचेही गणित 180 अंशांच्या कोनातून बदलणार आहे.
पूर्वापार सुरू असलेल्या विपणन पद्धतीतही बदल होणार, हे देखील निश्चित. कंपन्या जितका निधी जाहिरातीसाठी खर्च करतात, त्याचा मोबदला (रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट) किती आहे? याचाही विचार केला जातो. तुलनेत सोशल मीडियाद्वारे मिळणारा ‘रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट’ हा अधिक आहे. युवावर्गही इथे अधिक. भाषा, स्थळ, उत्पन्न गट, आवड-निवड अशा सर्वच प्रकारची युझर्सची माहिती मिळू शकते. त्यापद्धतीने डिजिटल माध्यमांवर जाहिरातींसाठी ग्राहकांचा गट ठरवता येतो. म्हणजे आपला ग्राहकवर्ग कोण आहे? हे ओळखून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन म्हणजे आजची डिजिटल माध्यमे.
हा झाला डिजिटल जाहिरातींचा भाग. मात्र, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केवळ जाहिरातीच नव्हे, तर आशयनिर्मितीद्वारेही पोहोचावे लागेल. प्रसिद्ध अभिनेत्री पारुल गुलाटीचेही असेच एक उदाहरण देता येईल. ती यापूर्वी पंजाबी सिनेमांसह अनेक वेब सिरीजमध्ये दिसली. मात्र, तिने तिचा ‘निश हेअर’ हा ब्रॅण्ड बाजारात आणला. शार्क टँकमध्ये झळकली. तिथून तिला नवी ओळख मिळत गेली. अर्थात आपल्या उत्पादनांबद्दल तिने तयार केलेला मजकूर सातत्याने सोशल मीडियावर झळकत असतो. प्रेक्षकांना ती सतत ब्रॅण्डबद्दल आठवण करून देत असते. याचा अर्थ ती विनाजाहिरातींवर खर्च करता इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकते की, उत्पादनांना मागणी आपसूक येते. पायलसारखी अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यांनी आपल्या ‘कंटेंट क्रिएटर्स’ क्षेत्रात दबदबा निर्माण केलाच. पण, त्याचसोबत स्वतःच्या ब्रॅण्डची जाहिरातही केली.
आपल्याला सोशल मीडियावर बर्याचदा अनेक सिनेअभिनेते, अभिनेत्री रिल्स करताना दिसतात. अनेक कंटेंट क्रिएटर्स दिवसभरात 30 सेकंदांसाठी का होईना, पण तुमच्या फीडवर हजेरी लावतात. याचाच अर्थ त्यांच्याकडे फार फावला वेळ आहे, असे नाही, तर ते भविष्यातील या बदलांसाठी तयार करत आहेत, अशीही शक्यता नाकारता येत नाही. पूर्वापार केल्या जाणार्या ब्रॅण्डिंग आणि विपणन निधीला कात्री लावण्यात आली असून, कंपन्यांनीही आपली उपस्थिती सोशल मीडियावर अधिक ठळक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे.
भारतात एकूण 80 लाख क्रिएटर्स आहेत. या एकूण क्षेत्राची उलाढाल दोन लाख कोटींपेक्षाही अधिक. 2030 सालापर्यंत ही उलाढाल दहा लाख कोटींच्या घरात जाईल, अशी अपेक्षा आहे. ‘जागतिक क्रिएटर इकोनॉमी’ ही 80 लाख कोटींचा टप्पा पार करेल. केंद्र सरकार या क्षेत्रात आठ हजार, 600 कोटी रुपये इतकी भरभक्कम गुंतवणूक करू इच्छित आहे, ज्यात ‘वेव्हज 2025’ यासारख्या समिटचाही समावेश आहे. याच वर्षी झालेल्या ‘वेव्हज परिषदे’मध्ये एक हजार, 328 कोटींचे करार झाले होते. यावेळी 90 हून अधिक देशांचा सक्रिय सहभाग होता. एकूण दहा हजार विविध क्षेत्रांतील मान्यवर इथे उपस्थित होते. व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स, ग्लोबल मीडिया पार्टनशिप्स क्षेत्रानेही याची दखल घेतली. यावरून डिजिटल क्षेत्राचा आवाका किती आहे, हे स्पष्ट दिसून येते. साध्या मोबाईल फोनपासून सुरू झालेला क्रिएटर्सचा प्रवास आजघडीला कोट्यवधींच्या उलाढालीपर्यंत येऊन पोहोचला. ‘जेन-झी’ प्रेक्षकांची वाढती संख्या, इंटरनेटची उपलब्धता, प्रेक्षकांची वाढती क्रयशक्ती, बदलत चाललेले फॅशन आणि राहणीमानाचे ट्रेंड याचा एकत्रित परिणाम हा नव्या बाजारपेठांवर होणारा आहे.
कंपन्या, ब्रॅण्ड्स आता अभिनेता-अभिनेत्रींपेक्षा क्रिएटर्सना जास्त महत्त्व देऊ इच्छित आहे. ‘कोविड’ काळात ज्यांनी घरबसल्या आपल्या कलागुणांना सोशल मीडियावर वाव दिला आणि त्यात सातत्य ठेवले, त्यांना ही यशाची फळे चाखता येत आहेत. यात अनेक मराठी आशयनिर्मिती करणारा मोठा वर्ग आहे. मुळात प्रादेशिक भाषांमध्ये चालणारा मजकूर हा अधिक आहे. ब्रॅण्ड्सनाही तळागाळात पोहोचलेला आश्वासक क्रिएटर्स हवा आहे. ब्रॅण्ड्स अशा क्रिएटर्सच्या शोधात आहेत. उत्तम मार्केटिंग करण्याबद्दल एक उदाहरण पुन्हा एकदा सोशल मीडियावरच उपलब्ध आहे.
डॉ. इमरान पटेल हे सोशल मीडियावरचे प्रसिद्ध नाव. लहान मुलांना इंजेक्शन द्यायचे असेल, तर अगदी त्यांच्यात मिसळून, त्यांना आवडेल, असे गाणे गात, हसतखेळत त्या चिमुकल्याला कळणारही नाही, अशा पद्धतीत उपचार करतात. बर्याचदा बाळाला आपल्याला इंजेक्शन दिले, हेदेखील कळत नाही. अर्थात, या डॉक्टरांची ख्याती सोशल मीडियामुळेच सर्वदूर पसरली. तसे बालरुग्णही वाढू लागले. हा झाला आपला सोशल मीडियावरचा वावर असण्याचा फायदा. पण, ज्याप्रकारे डॉक्टर मुलांना हळूवार इंजेक्शन देतात, ब्रॅण्डसही त्याच पद्धतीने ग्राहकांवर (युझर्स) आपल्या ‘डीटूसी’ ब्रॅण्डचा ठसा उमटवू इच्छित आहेत, त्यासाठी सोशल मीडियासारखे प्रभावी माध्यम तूर्त दुसरे उपलब्ध नाही.