पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नसून विकास करण्याचे ध्येय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
23-Jul-2025
Total Views | 19
मुंबई : पंढरपूर विकास आराखड्याबाबत जे काही आहे ते उघड काम आहे. कारण पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही, तर सर्व लोकांना सोबत घेऊन या परिसराचा विकास करण्याचे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यांनी पंढरपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "एकदा विकास आराखडा पूर्ण झाला की, सगळ्यांना विश्वासात घेतले जाईल. यामध्ये काहीही लपवण्यात आलेले नाही. सरकारच्या अधिकाऱ्यांनी सर्वांशी चर्चा केली आहे. कुठेही लपूनछपून काम चाललेले नाही. जे काही आहे ते उघड काम आहे. कारण पंढरपूर विकास आराखडा म्हणजे चोरी नाही. तर सर्व लोकांना सोबत घेऊन या परिसराचा विकास करण्याचे ध्येय आहे."
"आपल्याला कुणाचाही विनाश करून विकास करायचा नाही. सर्वांना सोबत घेऊन, त्यांना समाविष्ट करून विकास करायचा आहे. ज्यांची दुकाने किंवा घरावर कॉरिडॉरमुळे कारवाई करावी लागली तर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समाविष्ट करून घेण्यात येईल. कुणाचेही नुकसान होणार नाही, असा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. इथे कोट्यावधी लोक येतात आणि त्यांची अवव्यवस्था होत राहते, हे योग्य नाही. त्यामुळे सगळ्या सोबत घेऊन हे काम करायचे आहे. आम्ही जनतेत गेल्यावर त्यांचा आम्हाला पाठींबा राहील, असा विश्वास आहे," असेही ते म्हणाले.
संत नामदेवांनी भागवत धर्माला वैश्विक धर्म केले!
"संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा समाधी सोहळा आपण सगळे साजरा करून त्यांचा आशीर्वाद घेतो आहोत. संतांचे जीवन, त्यांचा जन्म, त्यांची समाधी या सगळ्या गोष्टी अतिशय प्रेरणादायी असतात. त्यातून आपल्याला केवळ विचारच नाही तर एक मार्गसुद्धा मिळत असतो. संत नामदेव यांनी आपल्या भागवत धर्माला वैश्विक धर्म केले आणि वारकरी विचाराला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. त्यामुळे या संपूर्ण वारकरी पंथात त्यांचे मोठे कार्य पाहायला मिळते. त्यांचा अख्खा परिवार याठिकाणी समाधी घेतात. संत जनाबाई या त्याकाळातील समाजिक विषमतेचा एक भाग होता. पण ज्याप्रकारे त्यांनी संतांच्या मांदियाळीमध्ये अभूतपूर्व कार्य केले, अशा सर्व संतांचे विचार साजरे झाले पाहिजे," असेही ते म्हणाले.
मंत्री माणिकराव कोकाटेंबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "मी कुठल्याही प्रश्नाकरिता आलेलो नाही. त्यांच्यापेक्षा मोठे संतांचे कार्य आहे. त्यामुळे मी कुठल्याही राजकीय प्रश्नावर उत्तर देणार नाही." तसेच राज्यपाल जे योग्य आहे ते बोलतात. त्यांना कुठल्याही वादात ओढणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.