'आपले सरकार' पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई : आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून देणात येणाऱ्या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, २५ ऑगस्ट रोजी दिले. वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली.

यावेळी राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या ९ सेवा एकत्र कराव्या. सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी. तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे," अशा सूचना त्यांनी दिल्या.

रिंग आणि क्लस्टर प्रणाली राबवा

"सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल. या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग आणि क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा आणि गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात. या रिंगच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र गट आणि व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच सेवा पुरवण्यासाठी डिश डिजिटल सेवा हबचा वापर करावा," अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

c

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....