मुंबई : संजय राऊत यांनी आधी त्यांच्या महाविकास आघाडीतील सावळा गोंधळ बघावा आणि मग दुसऱ्याच्या गोंधळाकडे बघावे, अशी टीका सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सोमवार, २५ ऑगस्ट रोजी केली.
मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "महाराष्ट्रातल्या जनतेने आपला निर्णय खूप स्पष्ट दिलेला आहे. ज्यापद्धतीने महायुतीच्या बाजूने मतदान आणि समर्थन आहे ते विरोधी पक्ष पचवू शकत नाहीत. महाराष्ट्रातील जनतेचा हा कौल जनतेने निवडून दिलेल्या आमदार आणि सरकारच्या बाजूने आहे. जे या मतदानाच्या विरोधात बोलतात आणि मतचोरी म्हणतात, ते मतचोरीबद्दल बोलत नसून महाराष्ट्रातल्या जनतेशी हरामखोरी करतात, असे माझे म्हणणे आहे. काँग्रेस, उबाठा सेना आणि त्यांचे अगलबगलचे पक्ष महाराष्ट्रातल्या जनतेशी हरामखोरी करत आहेत. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही. जनतेचा कौल आणि आशीर्वादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांवर आणि त्यांच्या मतदानावर प्रश्न उपस्थित करणे आहे. त्यामुळे या पक्षांनी महाराष्ट्राची हरामखोरी सुरू केलेली आहे," असा हल्लाबोल त्यांनी केला.
मुंबई भाजपमध्ये नवीन अध्यायाची सुरुवात"आज भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी आमदार अमित साटम यांची नियूक्ती केली असून त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. यानिमित्ताने मुंबई भाजपमध्ये एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. अमित साटमजी हे नगरसेवक, आमदार या सर्व पदांवर काम करून चुकले आहेत. तळागाळातल्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपचे काम करणे ते युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि मुंबईचे सरचिटणीस म्हणूनसुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यामुळे संघटनेच्या कामाचा एक प्रदीर्घ अनुभव असलेला एक सहकारी आज अध्यक्ष होतोय याचा खूप आनंद आहे. एक धाडसी कर्तुत्ववान नेता आज मुंबई भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष झाला. त्यांची ही कारकीर्द यशस्वीच होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महेश सावंत यांनी अमित ठाकरेंची मते चोरली का?राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, "अमित ठाकरेंची मते महेश सामंत यांनी चोरी केली का? कुणी कुणाची मते चोरी केली याचे त्यांनी उत्तर द्यावे. अमित ठाकरेंच्या मतांची चोरी महेश सावंत यांनी केली आणि मनसेच्या मुंबई अध्यक्षांच्या मतांची चोरी आदित्य ठाकरेंनी केली का? याचे उत्तर त्यांनी द्यावे,” असे ते म्हणाले.
पराभवाच्या कारणांचे बीजारोपण करण्याचा प्रयत्नप्रभाग रचनेवरील विरोधकांच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “ज्यांना निवडणुकीत पराभवाची पूर्ण शाश्वती आहेत त्यांच्या मनात सतत शंका कुशंका चालू राहतील. ते कधी ईव्हीएम आणि मतदान पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तर कधी मतदार यादीवर आणि निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह करतात. आता प्रभाग समितीवर करत आहेत. त्यामुळे उद्याच्या पराभवाला आजच काहीतरी कारणांचे बीजारोपण करण्याचा हा प्रकार आहे. मग मुंबईत आमचीच सत्ता, आम्हीच ब्रँड असे म्हणतात तर मग आता रडगाण्याचा बँड का वाजवताय? हिम्मत असेल तर उबाठा सेनेने एकटे लढून दाखवावे,” असेही मंत्री आशिष शेलार म्हणाले.