मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास न्यायालयाची मनाई

    26-Aug-2025   
Total Views |

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे २७ ऑगस्ट रोजी मुंबईच्या दिशेने निघणार होते. परंतू, त्याआधीच मंगळवार, २६ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, या आंदोलनाच्या विरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली आहे.

मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणाची सुनावणी पार पडली. सणासुदीच्या काळात जरांगे यांच्या आंदोलनाचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होईल. त्यामुळे मुंबईऐवजी नवी मुंबई, खारघर इथे आंदोलनासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देता येईल, असे न्यायालयाने यावेळी नमूद केले. मुंबईतील जनजीवन विस्कळीत होऊ नये याची खबरदारी घ्या, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. “आम्ही १०० टक्के मुंबईत जाणार असून कोर्टाच्या नियमाचे उल्लंघन करणार नाही. आमचे वकील बांधव न्यायालयात जातील आणि न्यायदेवता आम्हाला न्याय देईल," असे ते म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....