विकसित महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी पथदर्शी 'व्हिजन डॉक्युमेंट' ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठक संपन्न

    25-Aug-2025   
Total Views |

मुंबई : ध्येय निश्चित असल्यानंतर ध्येयप्राप्ती करण्याचा मार्गही प्रशस्त होतो. त्या दृष्टिकोनातून विकसित महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या माध्यमातून हा मार्ग तयार होत आहे, आहे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सोमवार, २५ ऑगस्ट रोजी सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विकसित महाराष्ट्र २०४७ व्हिजन डॉक्युमेंट प्रारूप मसुदा सादरीकरण बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्याला २०४७ पर्यंत 'विकसित महाराष्ट्र' करण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांचा समावेश असलेले व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत आहे. यासाठी जनतेच्या संकल्पना जाणून घेण्यात आल्या असून यामध्ये चार लाखापेक्षा जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला आहे. हे व्हिजन डॉक्युमेंट जनसामान्यांच्या संकल्पनांचे प्रतिबिंब असावे.भविष्यामध्ये कुठलीही योजना, उपक्रम किंवा निर्णय घेताना व्हिजन डॉक्युमेंट समोर ठेवून घेता आले पाहिजे, असे व्हिजन डॉक्युमेंट पथदर्शी ठरावे. ध्येय निश्चित असल्यानंतर ध्येयप्राप्ती करण्याचा मार्गही प्रशस्त होतो. त्या दृष्टिकोनातून विकसित महाराष्ट्र ध्येयपूर्तीसाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट'च्या माध्यमातून हा मार्ग तयार होत आहे."

"राज्याला केवळ देशातच नाही, तर जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट करण्यासाठी या 'व्हिजन डॉक्युमेंट' मधील उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक विभागाने ठेवलेली ध्येय निश्चिती प्राप्त होण्यासारखी आहे. यासाठी यंत्रणांनी आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन संकल्पना आणि या क्षेत्रातील जगातील सद्यस्थिती लक्षात घेऊन कार्यवाही करावी. सर्वसामान्य जनतेने या डॉक्युमेंटच्या निर्मितीसाठी घेतलेला सक्रिय सहभाग त्यांची राज्याच्या विकासाप्रती असलेली भावना अधोरेखित करतात," असेही त्यांनी सांगितले.

विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी महत्त्वाचा दस्तऐवज

"राज्य संपूर्ण विकसित होण्यासाठी राज्यासमोर असलेली आव्हाने व्हिजन डॉक्युमेंट निर्मितीच्या अनुषंगाने समोर आली आहेत. हा मार्ग खडतर जरी असला, तरी अशक्यप्राय नाही, हेसुध्दा यातून स्पष्ट झाले आहे. विकसित महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून समोर येणार आहे," असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....