कौशल्यांची पूर्वतयारी

    17-Jul-2025
Total Views | 6

‘स्कील डेव्हलपमेंट’ अर्थात ‘कौशल्य विकास’ हा मोदी सरकारच्या काळातील केवळ एक परवलीचाच शब्द नव्हे, तर त्यादृष्टीने विविध क्षेत्रांत त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. बंगळुरुमध्ये तर विशेष प्रकारची कौशल्य विकास केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत. त्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...

प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण कर्मचारी ही प्रत्येक उद्योग-व्यवसायाची मूलभूत गरज. कर्मचार्यांमध्ये आवश्यक कौशल्य निर्माण व्हावी, यासाठी प्रत्येक कंपनी व्यवस्थापन आपापल्या पद्धतीने सदैव प्रयत्न असते. यासाठी विशेष प्रशिक्षणासारखे उपक्रम प्रयत्नपूर्वक केले जातात. यामागे कर्मचार्यांनी अधिक चांगले व परिणामकारक काम करावे, हीच भावना असते. माहिती-तंत्रज्ञान व संगणक सेवा क्षेत्रात तर सतत बदलते तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांवर आधारित कौशल्य विकासाला सातत्याने चालना देणे आवश्यक असते. या महत्त्वाच्या कामी भारतातीलच नव्हे, तर जागतिक स्तरावरील संगणकीय सेवा उद्योगातील कर्मचार्यांमध्ये विशेष कौशल्य वृद्धी व्हावी व त्याचा काम या क्षेत्रातील देश-विदेशात काम करणार्या कंपन्या व कर्मचार्यांना प्रकर्षाने व्हावा, यासाठी बंगळुरुमध्ये विशेष प्रकारची कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. विविध उद्योग व व्यवसाय करणार्या कर्मचार्यांमध्ये विशेष प्रयत्नपूर्वक कौशल्य विकास व्हावा, या कारणासाठी सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रांची उत्साहवर्धक छाप आता जागतिक पातळीवर कशी पडत आहे, त्याचीच ही यशोगाथा...

यासंदर्भातील व्यवस्थापकीय पार्श्वभूमी म्हणजे, या जागतिक कौशल्य विकास केंद्रांची स्थापना विशेषतः संगणक सेवा व माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राला अद्ययावत स्वरूपातील प्रशिक्षित कर्मचारी या उद्योगांना उपलब्ध करून द्यावेत व त्याचवेळी माहिती-तंत्रज्ञान व संगणकशास्त्र विषयातील पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांना त्यांच्या विषयाशी संबंधित क्षेत्रात रोजगारक्षम बनवावे, अशा दुहेरी उद्देशाने करण्यात आली. तुलनेने कमी वेळात या उद्देशांची पूर्तता होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या प्रासंगिक व उत्साहवर्धक प्रयत्नांच्या पहिल्याच टप्प्यात ‘वॉलमार्ट ग्लोबल टेक’, ‘एसएपी लॅब्ज’, ‘थेस्स’, ‘इंट्यूट’ व ‘बार्कलेज’ या संगणकीय सेवा क्षेत्रातील आघाडीच्या व प्रस्थापित कंपन्यांनी, कौशल्य विकास केंद्रांची सुरुवात केली व अल्पावधीतच त्याला जागतिक पातळीवर प्रस्थापित केले. या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांचा व्यावसायिक उपयोग व महत्त्व लक्षात घेता, या नव्या पण महत्त्वाच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.

अशा प्रकारे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिक प्रगत व आवश्यक स्वरूपातील कौशल्य विकास साधून त्याला संगणक सेवा उद्योगासाठी उपयुक्त व परिणामकारक बनविण्यासाठी संगणकीय कौशल्य विकास केंद्रातील प्रशिक्षणाला कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती-तंत्रज्ञानाचा अद्ययावत उपयोग, माहितीचे संकलन-प्रक्रिया व विश्लेषण, शिक्षण-प्रशिक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग, संगणकविषयक विशेष कार्यपद्धती व सुरक्षा इत्यादी विषयांची जोड देण्यात आली. परिणामी, या कौशल्य विकास प्रयत्नांना चांगली गती व प्रगती प्राप्त होऊ लागली. अशा प्रशिक्षित कौशल्यधारक उमेदवारांना देश-विदेशातून वाढीव मागणी सुरू झाली.

यासंदर्भातील उल्लेेखनीय बाब म्हणजे, या वर्षीच्या प्रारंभीच ‘वॉलमार्ट ग्लोबल टेक’तर्फे ‘कृत्रिम बुद्धिमता प्रशिक्षण अकादमी’ची सुरुवात करण्यात आली. हा उपक्रम प्रामुख्याने ऑनलाईन पद्धतीने अमलात आणण्यात येत आहे. या पद्धतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा विषय आणि वापर या उभयतांवर सुरुवातीपासूनच भर दिला जात असून, त्याचा उपयोग ‘वॉलमार्ट’ला देश-विदेश पातळीवर होत आहे.

या प्रतिसादाच्या आधारे ‘वॉलमार्ट’ने आता स्वतंत्र स्वरूपात ‘जागतिक तंत्रज्ञान विकास अकादमी’ची स्थापना केली आहे. या अकादमीच्या माध्यमातून ‘वॉलमार्ट’ला जागतिक पातळीवर आवश्यक असणार्या व कंपनीच्या भविष्यकालीन कौशल्यविषयक गरजा लक्षात घेऊन कौशल्यवाढ व प्रशिक्षणाची विशेष सोय करण्यात आली आहे, हे विशेष. कंपनीने ‘जागतिक तंत्रज्ञान विकास अकादमी’ची स्थापना करून त्याच्या कामाला विशेष प्रयत्नांसह गती दिल्यामुळे कंपनीला अनेकविध फायदे झाले आहेत. याकामी ‘वॉलमार्ट’ने ‘वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’, ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरु’ व ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस, हैद्राबाद’ यांसारख्या प्रथितयश प्रशिक्षण संस्थेचे सहकार्य घेतले व त्याचा मोठा लाभ आम्हाला अल्पावधीत व अपेक्षित स्वरूपात झाला,” असे स्पष्ट मत ‘वॉलमार्ट’चे जागतिक धोरण व्यवस्थापन प्रमुख बी. व्ही. भरत यांनी नमूद केले आहे.

याच संदर्भात ‘एसएपी लॅब्ज इंडिया’ने घेतलेल्या पुढाकारानुसार त्यांच्या संगणक तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधन व विकास व्यवसायाला पूरक पद्धतीने कौशल्य विकास केंद्राचा उपक्रम राबविला आहे. मुळात जर्मनीमध्ये मुख्यालय असणार्या ‘एसएपी लॅब्ज’ने नव्या तंत्रज्ञानाला संशोधनाची जोड देऊन त्याच्या व्यावसायिक अंमलबजावणीवर भर दिला आहे. यासाठी कंपनीने कृत्रिम बुद्धिमतेला तंत्रज्ञानावर आधारित प्रत्यक्ष अनुभवाची जोड दिल्याने त्याचा नेमका फायदा नवीन उमेदवार-कर्मचार्यांच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून कंपनीला होत आहे. याचाच एक पुढचा व प्रगत टप्पा म्हणून कंपनीने कर्मचार्यांच्या कौशल्य विकासविषयक निकड आणि त्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय पावले उचलली आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रशिक्षार्थी कर्मचार्यांची कौशल्यविषयक सोडवणूक, गरजू कर्मचार्यांना वैयक्तिक स्वरूपाचे मार्गदर्शन, अंतर्गत कौशल्य विकासविषयक फेलोशिप, कर्मचार्यांना अधिकाधिक कौशल्यप्रवण बनविण्यासाठी त्यांना विविध कौशल्य कामांच्या प्रत्यक्ष सरावासह प्रशिक्षण देणे इत्यादी प्रयोग यशस्वीपणे केले जात आहेत. या कल्पक कौशल्य विकास उपक्रमांचा फायदा कंपनी व कर्मचारी या उभयतांना होत आहे.

‘एसएपी लॅब्ज इंडिया’च्या मानव संसाधन विकास विभागाच्या प्रमुख श्वेता मोहंती यांच्यानुसार कंपनीवरील कौशल्य विकास उपक्रमांतर्गत विविध स्तरावरील कर्मचार्यांनी कौशल्य विकासाचे ३५ हजार, ४५८ कार्यक्रम पूर्ण केेले आहेत. याशिवाय या उपक्रमाच्या पहिल्याच दोन लाख, १४ हजार, ६५३ तासांचे कौशल्य प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे, हे विशेष. या आणि अशाच प्रकारच्या कौशल्य विकास प्रयत्नांतून आज ‘एसएपी लॅब्ज’मधील जवळजवळ ५० टक्के कर्मचारी व्यावसायिक कौशल्यांच्या संदर्भात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षित झाल्याचे श्वेता मोहंती आवर्जून नमूद करतात.

‘बार्कलेज’सारखी कंपनी पण आता नव्या-जुन्या कर्मचार्यांच्या कौशल्य विकासावर प्राधान्याने काम करीत आहेत. यामध्ये कंपनीतर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे ‘तज्ज्ञ कर्मचारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणली आहे. याकामी कंपनीच्या कौशल्य विकास व त्यानुसार केलेले प्रयत्न याचे मोठे योगदान राहिले आहे. कौशल्य विकास केंद्रामुळे कंपनीच्या कर्मचार्यांमधील कौशल्यांमध्ये लक्षणीय स्वरूपात वाढ झाल्याचे ‘बार्कलेज इंडिया’चे मानव संसाधन विभाग प्रमुख अरुण कृष्णमूर्ती आपल्या स्वानुभवातून सांगतात.

संगणकीय क्षेत्रातील कर्मचारी विकास केंद्राच्या माध्यमातून भावना मोठ्या प्रमाणावर कर्मचार्यांच्या कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांची उत्पादकता व परिणामकारक उपयुक्तता आता जागतिक स्तरावर वाढली आहे. भारत आणि भारतीयांची पात्रता क्षमता व उपयुक्तता वाढत्या कौशल्यांमुळे संगणक क्षेत्रात जागतिक स्तरावर सर्वमान्य झाली आहे.

दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व्यवस्थापक आणि सल्लागार आहेत.)
९८२२८४७८८६

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121