
मुंबई : दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंनी कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते आमदार आहे ही गोष्ट लपवली आहे, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. गुरुवार, ३ जुलै रोजी त्यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी संवाद साधला. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात कोणताही घातपात झालेला नाही, असे प्रतिज्ञापत्र एसआयटीने उच्च न्यायालयात दाखल केले आहे.
यावर बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "दिशा सालियन प्रकरणात जो अहवाल एसआयटीच्या वतीने न्यायालयात गेला त्यावर न्यायालयाने काय म्हटले ते समजून घेतले पाहिजे. हा फक्त नितेश राणेंपुरता विषय नसून दिशा सालियनच्या वडिलांनीसुद्धा आदित्य ठाकरे, दिनो मोरिया यांच्यावर आरोप केले आहेत. हे प्रकरण कोर्टात सुरू आहे. त्यामुळे त्याबद्दल किती भाष्य करू शकतो असा प्रश्न आहे. दिशा सालियानच्या वडिलांनी स्वतःची मुलगी गमावली आहे. तेसुद्धा राजकीय आरोप करतील का? त्यामुळे पिक्चर अभी बाकी है. पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही. १६ तारखेला न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यावेळी काय होते ते बघू," असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंकडून प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती
ते पुढे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंनी कोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते आमदार आहेत ही माहिती लपवली. मी समाजसेवक आणि उद्योजक आहे अशी खोटी माहिती त्यांनी दिली. त्याविरोधातसुद्धा एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टात खोटं बोलणारे इथे किती खोटे बोलत असतील ते येणाऱ्या दिवसांत कळेल. या प्रकरणातील दोषींवर नक्की कारवाई होईल आणि दिशा सालियनला न्याय मिळेल," असेही ते म्हणाले.