पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर वाढलेल्या भारत-पाकिस्तान संघर्षामुळे क्रीडाविश्वावर विपरीत परिणाम झाला. अनेक क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या, तर काही क्रीडापटूंना काही स्पर्धांना मुकावे लागले. या तणाव आणि अशांततेमुळे क्रीडा क्षेत्रावर होणार्या परिणामांचा घेतलेला हा आढावा...
पाकिस्तानने भारताच्या कुरापती काढत नेहमीप्रमाणेच भारताविरुद्ध नाहक युद्ध उकरून काढले. युद्ध म्हटले की, स्वाभाविकच त्याचे दुष्परिणाम आलेच. हळूहळू व्यापकता वाढवणारे रशिया-युक्रेन युद्ध, त्यामुळे रशियाला पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास मिळालेला नकार हे प्रकरण असो अथवा आताचे ताजे भारत-पाकिस्तानमधील युद्ध असो, त्याचे परिणाम दिसतातच. एकेकाळी ऑलिम्पिकच्या उच्चासनी विराजमान असलेल्या रशियाची दयनीय अवस्था या युद्धामुळेच झाली. आज पाकिस्तानही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नकोसा झाला आहे. या युद्धांच्या खुमखुमीनेच पाकिस्तान अनेक स्पर्धांमधूनही अधिकृतपणे बाहेर काढला जात आहे. असे जरी असले, तरी विविध खेळांमध्ये पाकिस्तानचा सहभाग भारताला त्रासदायकही ठरला आहे.
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या संघर्षामुळे, दोन्ही देशांच्या हवाई क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. व्यावसायिक विमान उड्डाणे एकतर विलंबाने होत होती किंवा पूर्णपणे रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रभावीत झालेल्या भारतीय क्रीडाविश्वातली काही उदाहरणे आपण पाहू.
बीच हॅण्डबॉल
ओमानमधील मस्कत येथे झालेल्या आशियाई बीच हॅण्डबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाही, भारताला पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास भाग पाडण्यात आले. दि. ९ मे रोजी झालेल्या या सामन्यात भारताचा ६-३४, ७-३६ असा पराभव झाला. हा सामना मूक निषेध व्यक्त करत खेळवण्यातच आला. भारतीय खेळाडूंनी बांधलेल्या काळ्या फिती देखील काढण्याचे आदेश त्यांना देण्यात आले. स्पर्धेचे अधिकारी आणि ‘आशियाई हॅण्डबॉल फेडरेशन’ यांनी स्पष्ट केले की, स्पर्धेदरम्यान कोणतीही राजकीय निदर्शने सहन केली जाणार नाहीत. स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता, दोन वर्षांची आंतरराष्ट्रीय बंदी आणि खेळण्यास नकार दिल्यास, दहा हजार डॉलर्स दंड असा इशारा दिल्याने, भारतीय संघाने नाईलाजाने निषेधार्थ सामना खेळण्याचा निर्णय घेतला. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होण्याच्या आधीच म्हणजे दि. ५ मे रोजीच भारतीय पथक मस्कतमध्ये दाखल झाले होते. या स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनकच झाली. २०२६ मध्ये होणार्या बीच हॅण्डबॉल वर्ल्ड अजिंक्यपद स्पर्धेतील पात्रता म्हणून हे स्पर्धा महत्त्वाची होती.
बास्केटबॉल
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे ‘दक्षिण आशियाई बास्केटबॉल असोसिएशन क्लब चॅम्पियन’ असलेल्या तामिळनाडूने, २०२५ च्या ‘एफआयबीए वेस्ट एशिया सुपर लीग फायनल-८’ मधून माघार घेतली. विमानतळावर १२ तासांहून अधिक ताटकळत राहिल्यानंतर आणि ३० हून अधिक विमानतळ बंद असल्याने, स्पर्धेत या संघाचा सहभाग आता शक्य नसल्याचे ‘एफआयबीए’कडून सांगण्यात आले. गेल्या महिन्यातच ‘दक्षिण आशियाई बास्केटबॉल असोसिएशन क्लब चॅम्पियन’ म्हणून तामिळनाडू ‘वेस्ट एशिया सुपर लीग फायनल-८’साठी पात्र ठरले होते आणि स्पर्धेसाठी ते लेबेनॉनला जाणार होते.
डायमंड लीग स्पर्धा
दोहा, कतार येथे भारतीयांसाठी शुक्रवार, दि. १६ मे रोजी डायमंड लीग स्पर्धेतील मोठा सामना झाला. त्यात ९१.०६ मीटर भालाफेक करत जर्मनीचा जूलियन वेबर प्रथम क्रमांकावर, ९०.२३ मीटरवर भालाफेक करत आपला नीरज चोप्रा द्वितीय क्रमांकावर, तर ग्रेनेडा देशाचा पीटर्स अॅण्डरसन तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. पाकिस्तान या स्पर्धेतच नव्हता. स्वतःची सर्वोत्तम कामगिरी आणि राष्ट्रीय विक्रम नोंदवणारा नीरज चोप्रा त्याचा सहावा डायमंड लीग हंगाम आणि १८वा डायमंड लीग सामना जगातील सर्वोत्तम भालाफेकपटूंविरुद्ध खेळला.
दि. २७ ते दि. ३१ मे रोजी दक्षिण कोरियातील गुमी येथे होणार्या ‘आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’च्या सरावामुळेच, पाकिस्तानचा ऑलिम्पिक भालाफेक विजेता अर्शद नदीम हा या लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. त्यामुळे नीरज चौप्राचा अर्शद नदीम विरुद्धचा सामना झालाच नाही.
नीरज चोप्रा शुक्रवारी रात्री दोहा डायमंड लीगमध्ये मैदानावर उतरतेवेळी म्हणाला होता की, “या दौर्यातील इतर सर्व स्पर्धकांशी त्याचे संबंध चांगले आहेत.” नीरज आणि अर्शद नदीम हे २०१६ पासूनच आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धक आहेत आणि त्यांनी नेहमीच परस्परांविषयी आदरभाव बाळगला आहे. नीरजने अर्शद नदीमला दि. २४ मे रोजी बंगळुरुच्या कांतीरवा स्टेडियमवर होणार्या नीरज चोप्रा क्लासिकमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले होते. तथापि, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
क्रिकेट
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे दि. ९ मे पासून ‘आयपीएल’स्पर्धाही स्थगित केली होेती. आता पुन्हा एकदा ही स्पर्धा सुरु होत आहे. ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, यानुसार शनिवार, दि. १७ मे रोजीपासून पुन्हा एकदा ‘आयपीएल’चे सामने सुरू झाले आहेत. दरम्यान काही परदेशी खेळाडूंनी त्यांच्या देशात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यानुसार काही स्वगृही गेले होते. काही परदेशी खेळाडू भारत दौरा करून आले.
हॉकी
‘चक दे इंडिया’ चित्रपट फेम शाहरुख खान भारत-पाकिस्तान तणावाबाबत मौन बाळगून आहे. चित्रपट सृष्टीतील अनेकांनी भारताच्या समर्थनार्थ आपले विचार प्रकट केले असले, तरी शाहरुख खानने मौन सोडलेले दिसत नाही.
भारतीय स्त्री-पुरुष हॉकीपटू सध्या आपापल्या खेळात स्वदेशात, विदेशात व्यस्त आहेत. भारतीय कनिष्ठ महिला ऑस्ट्रेलिया दौर्यावर असून, वरिष्ठ महिला दि. १४ ते दि. २९ जून रोजी लंडन, अॅन्टवर्प आणि बर्लिन येथे होणार्या ‘एफआयएच प्रो लीग २०२४-२५’मध्ये भाग घेण्यासाठी सज्ज होत आहेत. तर पुरुष भारतातच ‘नॅशनल’ खेळत आहेत. मलेशियात नोव्हेंबरमध्ये होणारा ’सुलतान अझलन शाह कप’ तसेच दि. २८ नोव्हेंबर ते दि. १० डिसेंबर २०२५ रोजी चेन्नई आणि मदुराई येथे ‘एफआयएच’ पुरुष ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत खेळेल; पण पाकिस्तान मात्र खेळणार नाही. बिहारमधील राजगीर या ठिकाणी ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ दरम्यान होणार्या पुरुषांच्या ’हीरो आशियाई चषक स्पर्धे’त सहभाग घेण्यासाठी, पाकिस्तानला भारताने व्हिसा नाकारला आहे.
पाकिस्तानचे मोठे नुकसान
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आधी त्यांना पाकिस्तान सुपर लीग अनिश्चित काळासाठी रद्द करावी लागली आणि आता त्यांना देशांतर्गत स्पर्धादेखील पुढे ढकलाव्या लागल्या. भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. असे असूनही, पाकिस्तान दहशतवादे कारवाया कमी करत नाहीच. याचा फटका त्यांच्याच क्रीडाक्षेत्राला सहन करावा लागत आहे.
बलुची क्रीडा
सध्या बलुचिस्तानचे नाव चर्चेत आहे. बलुचिस्तान प्रांतातील बलुच लोक जे पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या प्रांतापैकी एक आहेत, ते स्वतःला राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे मानतात. त्यांच्या हक्कांसाठी आणि पूर्ण स्वातंत्र्यासाठी ते लढत आहेत.
बलुचिस्तानमधील तरुणांना खेळासारख्या कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये प्रवेश नाही. ज्यांना खेळांमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत निराशाजनकच आहे. संपूर्ण प्रांतात किशोरवयीन मुले रस्त्यावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळताना दिसतात. परंतु, त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी क्वचितच दिली जाते. बहुतेक शैक्षणिक संस्था कोणत्याही सुविधा पुरवत नाहीत किंवा विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धांचेही आयोजन करत नाहीत.
क्रिकेट, फुटबॉल, टेनिस इत्यादींसाठी अनेक राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात असल्या, तरी प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन क्वचितच बलुचिस्तानमधील खेळाडूंची निवड करतात. बलुचिस्तानात कुठेही प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात नाहीत. यामुळे खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, आहार आणि खेळाची जाणीव नसते. म्हणूनच देशाच्या इतर भागांत चाचण्यांसाठी प्रवास करू शकणार्यांचीही निवड क्वचितच होते. काही तरुण खासगी कंपन्यांद्वारे आयोजित फुटबॉल स्पर्धांमध्ये नियमितपणे भाग घेतात. तथापि, या स्पर्धा उत्साह आणि प्रतिभेने भरलेल्या खेळाडूंसाठी पुरेशा नाहीत. आता ‘फिफा’ने ‘पाकिस्तान फुटबॉल फेडरेशन’वरील बंदी उठवल्यानंतर, फेडरेशनने या प्रांतातही स्पर्धा आयोजित केल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बलुचिस्तानमधील प्रतिभेची दखल घेत, खेळाडूंची भरती केली पाहिजे आणि त्यांना स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार केले पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित केले पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी स्पर्धाही आयोजित केल्या पाहिजेत.
आपल्या अस्तित्वासाठी अत्याचारी पाकिस्तानविरुद्ध रात्रंदिवस युद्ध करणार्या, मराठ्यांचा वारसा चालवणार्या बलुचिस्तानची विशेष आठवण एक पुणेकर म्हणून मला आज येते. बलुचिस्तानात पेशवे (पेशवाई मराठा) ही एक मराठा वंशाची जात आहे. त्यांच्या वंशावळीनुसार ते पेशवांच्या वंशाचे आहेत. हे बलुचिस्तानमध्ये कसे आले, याबद्दल अनेक कथा आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. यातील काही प्रमुख कथा आपण बघू:
बलुचिस्तानात आजमितीस अंदाजे २० लाख मराठा वंशज राहतात. १९४८ साली पाकिस्तानने त्यांचे जबरदस्तीने विलीनीकरण केले होते. तेव्हापासून स्वातंत्र्यासाठी त्यांनी चार मोठे विद्रोह केले आणि त्याचे नेतृत्व मराठा वंशजांनी केले आहे. मराठा वंशज बलुचिस्तानात कसे स्थाईक झाले, याचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे.
बलुचिस्तानात पेशवे येण्याची प्रमुख कारणे म्हणजे, पानिपतच्या तिसर्या लढाईत मराठा सैन्याची झालेला पराजय. पुण्यातील पेशवांच्या ५० हजार ते ७५ हजार सैनिकांना पकडून बलुचिस्तानमध्ये गुलाम म्हणून नेण्यात आले, जे त्यावेळी अफगाणिस्तानचा भाग होते. बलुचिस्तानात राहणार्या मराठ्यांना ‘पेशवाई मराठा’ म्हणून ओळखले जाते. हे पेशवांच्या कुटुंबीयांचे वंशज आहेत, जे बलुचिस्तानमध्ये पकडण्यात आले.
बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमामुळे आणि मराठा साम्राज्याच्या विस्ताराने काही मराठा सैनिक बलुचिस्तानमध्ये स्थलांतरित झाले, जिथे त्यांनी आपली नवीन जीवनशैली व संस्कृती विकसित केली. बलुचिस्तानमध्ये मराठा वंशाचे लोक आणि स्थानिक बलुच यांच्यात चांगले संबंध आहेत. एकमेकांवर असलेल्या प्रभावामुळे त्यांची जीवनशैलीही समृद्ध झाली आहे. पुण्यातून नेलेल्यांना आजही ज्या नावाने ओळखतात त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत,
पेशवानी मराठा : हे पेशव्यांचे नातेवाईक होते. पेशव्यांच्या भावाचाही त्यात समावेश होता. बुगती मराठा, कल्पर मराठा, नोथानी मराठा, शंबानी मराठा, मोसनी मराठा, शौ मराठा अशा २० मराठा समुदायांच्या उपनामात शेवटी मराठा जोडलेले आहे. हे सारे आजही महाराष्ट्राचे रीतिरिवाज आणि परंपरा जोपासतात. तसेच, त्यांच्यात लग्न करतात. ही लोकं आजही आपल्या आईला ‘अम्मीजान’ नाही म्हणत, तर चक्क ‘आई (माँ)’ म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांची पूजा करतात. प्रत्येक बलुच मराठा घराघरात छत्रपती शिवाजी महाराजांची एक तस्वीर लपवून ठेवलेली असते. पाकिस्तानी सेना घरोघरी झडती घेत असतात आणि सापडले तर तो देशद्रोहाचा गुन्हा समजला जातो.
ती लोकं शिवरायांप्रमाणेच पाकविरोधात गनिमी काव्यानेच युद्ध करतात. एक दिवस बलुचिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून नावारूपाला आले, तर ते काही गैर नसेल. पाकिस्तानचा तो अजून एक पराभव असेल आणि बलुच क्रीडापटू ऑलिम्पिकमध्ये एखादे पदक घेताना दिसले, तर भारतासारखे देश त्याचे स्वागतच करतील.
जय भवानी जय शिवाजी।
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
९४२२०३१७०४