जगातील सर्वांत समृद्ध राष्ट्र म्हणून स्वतःचा अभिमान बाळगणार्या अमेरिकेच्या पतमानांकनात नुकतीच ‘मूडीज’ या प्रमुख पतमानांकन संस्थेने घट केली. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे. धोरणांत नसलेले सातत्य, रिपब्लिकन-डेमोक्रॅट्समधील वितुष्ट आणि निवडणुकीसाठी आखले जाणारे राजकीय अर्थसंकल्प हे या संकटाचे मूळ!
जगातील आघाडीच्या क्रेडिट रेटिंग एजन्सींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्या ‘मूडीज’ने नुकतेच अमेरिकेच्या पतमानांकनात घट केली. अमेरिकी अर्थव्यवस्था अद्याप सावरलेली नाही. मंदीची छाया अमेरिकी अर्थव्यवस्थेवर दाटलेली असताना, ‘मूडीज’ने दिलेला धक्का जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असाच. ‘जागतिक महासत्ता’ असा लौकिक असलेल्या अमेरिकेच्या मानांकनात झालेली घट वित्तीय चिंता निर्माण करणारे ठरणार आहे. अमेरिकेच्या डोक्यावरील वाढता कर्जाचा बोजा ‘मूडीज’ला हे पाऊल उचलण्यास भाग पडणारा ठरला. ‘मूडीज’ने नकारात्मक शेरा नोंदवला म्हणून अमेरिकी अर्थव्यवस्था कोलमडणार नसली, तरी गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि जागतिक बाजारपेठांसाठी हा एक महत्त्वपूर्ण संकेत म्हणावा लागेल. ‘मूडीज’ने असे नमूद केले आहे की, अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज 31 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा अधिक असून, ते ‘जीडीपी’च्या तुलनेत ऐतिहासिकदृष्ट्या उच्चांकी पातळीवर आहे. अमेरिकी धोरणांची अनिश्चितता या वाढत्या कर्जामुळे वाढीस लागली असून, राजकोषीय धोरणालाही त्याचा थेट फटका बसतो आहे. त्याचवेळी सरकारी खर्चात झालेली वाढ, मंदावलेली महसुली उत्पन्न तसेच संरचनात्मक तुटीत झालेली वाढ याला कारणीभूत. म्हणूनच ‘मूडीज’ने राजकोषीय धोरणांच्या शाश्वततेबद्दल आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेबाबत चिंता व्यक्त केली आहे. अन्य राष्ट्रांच्या तुलनेत अमेरिकेचे पतमानांकन आजही मजबूत असले, तरी त्यात घट झाली आहे, ही बाब अमेरिकी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी. यापूर्वी ‘फिच रेटिंग्ज’ने अमेरिकेच्या मानांकनात घट केली होती. 2011 साली ‘एस अॅण्ड पी’ने पहिल्यांदाच अमेरिकेची पत कमी केली होती.
‘मूडीज’च्या या निर्णयामुळे बाजारात गोंधळ उडणे हे अत्यंत स्वाभाविकच. गुंतवणूकदार अनेकदा पतमानांकनाकडे आर्थिक स्थिरतेचे सूचक म्हणून पाहतात. शेअर बाजार हे अत्यंत संवेदनशील असेच असतात, त्यामुळे बाजारातील अस्थिरता वाढीस लागते. अमेरिकी डॉलर आज तुलनेने मजबूत असला, तरी बाजाराच्या धारणांचा विदेशी चलन बाजारावर थेट परिणाम होत असल्याने, त्याच्यावरील दबाव वाढीस लागू शकतो. जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था, विदेशी गंगाजळी या अमेरिकेच्या पथ्यावर पडणार्या गोष्टी असल्यामुळे ‘मूडीज’ने मानांकनात केलेली घट तातडीने कोणता धोका उत्पन्न करेल असे नाही, हे समजून घेतले पाहिजे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकी अर्थव्यवस्थेत सर्व काही आलबेल नाही, हाच संदेश पुन्हा एकदा यातून अधोरेखित झाला.
‘यूएस ट्रेझरी बॉण्ड’वरील उत्पन्न कमी असताना, दीर्घकालीन दृष्टिकोन बदलू शकतो. गुंतवणूकदार अधिक जोखीम घेण्यास टाळाटाळ करत असतील, तर अमेरिकेला कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होऊ शकते, विशेषतः मानांकनात घट झाल्यामुळे अमेरिकी कर्जाचे पुनर्मूल्यांकन काहीसे धोकादायक म्हणून केले गेले आहे. शाश्वत वित्तीय धोरणांची आवश्यकता यातून समोर आली आहे. हे धोरणकर्त्यांना कर्जाच्या चिंता अधिक गंभीरपणे सोडवण्यास प्रेरित करू शकते, खर्च सुधारणा किंवा महसूल वाढवणार्या उपाययोजना अमेरिकी प्रशासनाला राबवणे भाग पडणार आहे. अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी हे पतमानांकन हा धोक्याचा इशारा आहे. ‘मूडीज’ने अमेरिकेसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे. धोरणकर्ते आणि गुंतवणूकदारांसाठी त्याचवेळी तो एक महत्त्वाचा इशारा ठरला आहे. जागतिक स्थिरतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्या अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेकडे आता अनिश्चिततेच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. ती जगातील सर्वांत मोठ्या आणि प्रभावशाली अर्थव्यवस्थांपैकी एक असली, तरी अलीकडील घडामोडींवरून असे दिसून येते की, तिचा मार्ग जागतिक बाजारपेठांमध्ये चिंता निर्माण करत आहे, असे दिसून येते.
अमेरिकेत चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथील फेडरल बँकेने आक्रमकपणे व्याजदर वाढवण्याचे जे धोरण अवलंबले, त्यामुळे महागाई नियंत्रणात आली असली, तरी आर्थिक मंदीला चालना मिळाली. व्याजदर वाढल्यामुळे तेथील क्रयशक्तीत घट झाली असून, अमेरिकी अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट कायम ठेवणारी ठरली आहे. भूराजकीय तणाव, चलनवाढीची भीती आणि वित्तीय अनिश्चितता बाजारपेठांमधील अस्थिरतेचे प्रमुख कारण ठरले आहेत. ही अस्थिरता अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेवरील विश्वास कमी करते, तसेच गुंतवणुकी संबंधित निर्णय गुंतागुंतीचे करणारी ठरत आहे. जगातील राखीव चलन म्हणून अमेरिकी डॉलरला आजही प्राधान्य दिले जाते. अमेरिकी अर्थव्यवस्थेतील अस्थिरतेचे पडसाद जगभरात उमटतात. म्हणूनच, तेथील वित्तीय चिंता अमेरिकी मालमत्तांवरील विश्वास कमी करणार्या ठरतील. त्यामुळे चलनाचे अवमूल्यन होण्याची भीती आहे. तशातच, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगभरात जे व्यापारयुद्ध छेडले आहे, त्याचा थेट फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसत आहे. अमेरिकेतील व्याजदर वाढले, तर जगभरातील बाजारपेठांमधून गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून ती अमेरिकी रोख्यांमध्ये गुंतवतात. अमेरिकी रोखे हे आजही अधिक विश्वासार्ह मानले जातात. मात्र, स्थिरतेपासून चिंतेकडे होत असलेले संक्रमण वित्तीय व्यवस्थापन, सुसंगत धोरणात्मक प्रतिसाद तसेच अमेरिकी नेतृत्वाकडून पारदर्शक संवादाचे महत्त्व अधोरेखित करतो. अमेरिकी अर्थव्यवस्था अजूनही मजबूत आणि लवचिक आहे. अमेरिकी कर्जाची मागणी तसेच चलन पुरवठ्यावर या मानांकनाचा परिणाम कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच पतमानांकनात घट झाल्याने गुंतवणूकदार आणि ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच, जागतिक शेअर बाजारात विक्री वाढू शकते. त्यामुळे वित्तीय तूट वाढेल. आर्थिक वाढ कमी होण्याबरोबरच रोजगार आणि उत्पन्नाला धक्का बसल्याने कर्जाची परिस्थिती आणखी बिघडेल. मानांकनात झालेली घट ही अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी एक धोक्याची सूचना असून, त्यावरून योग्य तो बोध घेत अमेरिकेने आपल्या धोरणात बदल करणे अपेक्षित आहे.
संजीव ओक