सिंधुदुर्ग सुपूत्र सदानंद करंदीकर यांचे दातृत्व; वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान

    22-May-2025   
Total Views | 10

Sadanand Karandikar donates 20 lakhs



मुंबई - डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले... आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपूर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी वीस लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे या दानशूर सिंधु पुत्राचे नाव. श्री. करंदीकर मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील.
आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना श्री. करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, न कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी कृतज्ञतापूर्वक हे धनादेश स्वीकारले. तसेच श्री. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला नमन केले.
सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी श्रीमती सुमती करंदीकर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहात असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये करंदीकर यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असा एकूण २० लाख रुपयांच्या निधीचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.
सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते बहिण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात. वृध्दाश्रम, कर्करोगग्रस्तांच्या कुटुंबीयांची धावपळ यांचा अनुभव गाठीशी असणाऱ्या सिंधुदुर्ग सुपूत्र श्री. सदानंद करंदीकर यांनी सागरा प्रमाणेच समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठीचे आपले दातृत्वही अमर्याद असल्याचे सिद्ध केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा
इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

इराणचा इस्रायलवर पलटवार! तेल अवीव, जेरुसलेमसह अनेक शहरांवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे

(Iran Strikes 150 Missiles on Israel) इस्रायलने शुक्रवारी दि. १३ जून रोजी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलवर मोठा हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. इराणने या हल्ल्यात इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य करण्यात आले आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त इस्रायलमधील एका वृत्तप..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121