अभिजात मराठी भाषा म्हणजे काय ?

    31-May-2024
Total Views |

marathi 
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, या मागणीने जोर धरल्यानंतर काही वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. मात्र, जवळपास अडीच हजार वर्षांचा समृद्ध वारसा असलेल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अजूनही मिळालेला नाही. मागील साडेआठ वर्षांपासून मराठीच्या अभिजात भाषेचा प्रस्ताव धूळ खात पडून आहे.
अनेक वर्षांपासून महाराष्ट्राकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होतेय, पण ती अद्याप पूर्ण झालेली नाही. आज भारतात तामिळ, तेलगू ,कन्नड आणि संस्कृत या चार भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आहे. त्यांच्या जोडीला आता मराठीचा समावेश होण्याची गरज आहे.
अभिजात भाषा म्हणजे काय ?
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावी
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावी
भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे
प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
प्राचीन महारट्ठी, मरहट्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास आहे. महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळया भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रूपे आहेत.
मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ 'गाथासप्तशती' हा सुमारे २००० वर्षे जुना आहे. 'लीळाचरित्र' आणि 'ज्ञानेश्वरी' हे मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. भाषा काही एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी अनेक शतके जावी लागतात. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वर्षे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शेकडो शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध आहेत.
मराठीचे वय २५०० वर्षे असल्याचे पुरावे :
मराठी भाषेतील पहिला शिलालेख २२२० वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राम्ही लिपीतील असून तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' असा स्पष्ट उल्लेख आहे. या शिलालेखाच्या तिसऱ्या १३ ओळीतील काही मजकूर दिसत नाही. मात्र, महारठिनो हा शब्द स्पष्ट दिसतो. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या 'सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख', या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे.
या नोंदींवरून असे सिद्ध होते की, ‘महारठी’ भाषा बोलणारे ते महारठी लोक आणि ही भाषा बोलणाऱ्यांचा प्रदेश तो महारठी प्रदेश म्हणजेच महाराष्ट्र प्रदेश. ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान २०० ते ३०० वर्षे अस्तित्वात असली पाहिजे. यावरून मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असले पाहिजे.
विश्वातील भाषा आणि 'प्राकृत' :
भाषाशास्त्रज्ञांनी आज उपलब्ध असलेल्या सुमारे २००० मुख्य भाषा १२ गटात विभागल्या आहेत. भारतात प्रचलित असणाऱ्या प्राचीन, मध्ययुगीन आणि प्राकृत भाषा या बारांपैकी 'भारोपीय' (इंडो-युरोपियन) या गटात समाविष्ट होतात. 'भारोपीय भाषा' या सामान्यतः १३ उपगटात विभक्त केल्या जातात. त्यापैकी एक मुख्य गट 'आर्य-भारतीय' (इंडो-आर्यन) भाषांचा आहे. भारतात 'प्राकृत' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भाषा या 'आर्य-भारतीय' भाषा गटामध्ये समाविष्ट केल्या जातात.
आर्य-भारतीय भाषांचा विचार तीन काळांमध्ये विभागून केला जातो.
(१) प्राचीन आर्य-भारतीय भाषाकाळ इ.स.पू.१६०० ते इ.स.पू.६००
(२) मध्यकालीन आर्य-भारतीय भाषाकाळ इ.स.पू. ६०० ते इ.स.१०००
(३) आधुनिक आर्य-भारतीय भाषाकाळ इ.स.१००० ते आजपर्यंत.
मराठी भाषेचे अभिजातत्व सिद्ध करताना, आपल्याला वरीलपैकी दुसऱ्या काळाचा (इ.स.पू.६०० ते इ.स.१०००) विशेष विचार करावा लागतो. हा काळही भाषाविदांनी तीन गटात विभागला आहे. त्यापैकी दुसऱ्या गटाचा काळ आहे - इ.स.१०० ते इ.स.५००. ज्या काळात त्या विविध प्राकृत भाषांमध्ये साहित्यिक कृती घडल्या, त्यात 'महाराष्ट्री' आणि 'जैन महाराष्ट्री या भाषांचा समावेश होतो. त्याखेरीज मागधी, अर्धमागधी, पाली, पैशाची आणि शौरसेनी या भाषांमधील साहित्यही उपलब्ध आहे.
इ.स. ७८० च्या सुमारास लिहिलेल्या उद्योतनसूरी यांच्या कुवलयमाला या ग्रंथात अनेक भाषांचा उल्लेख असून त्यातील एकीचे नाव "मरहट्ठ" असे आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे दिसते :
दढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य। दिण्णले गहिल्ले उल्लविरे तत्थ मरहट्ठे ॥
(बळकट, ठेंगण्या, धटमुट, काळ्यासावळ्या रंगाच्या काटक, अभिमानी, भांडखोर, सहनशील, कलहशील व 'दिण्णले' (दिले) 'गहिल्ले' (घेतले) असे बोलणाऱ्या मरहठ्यास त्याने पाहिले.) हे सगळे वर्णन मराठी माणसाचेच आहे.
इ.स. ७८० साली जैन मुनि उद्योतन सुरी यांनी प्राकृत भाषेत लिहिलेल्या कुवलयमाला ग्रंथात मराठी भाषेतील शब्द आणि एक मराठी व्यक्तीचे वर्णन आढळून येते.
भूलोकमल्ललिखित मानसोल्लास किंवा अमिलषतार्थचिन्तामणि या शके १०५१ (इ. स. ११२९) मधील ग्रंथातले दोन उतारे : ‘जेणें रसातळउणु मत्स्यरूपें वेद आणियले मनुशिवक वाणियले तो संसारसायरतरण मोह (हं) ता रावो नारायणु’. ‘जो गोपिजणे गा (?मा) यिजे बहु परि रूंपे निऱ्हांगो…’
(शके ११०८ (इ. स. ११८७) मधील शिलाहार अपरादित्याच्या (द्वितीय) परळ येथे सापडलेल्या लेखातील शापवचन : ‘अथ तु जो कोणु हुवि ए शासन लोपी तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुंटुंबीआ पडें तेहाची माय गाढवें झविजे’.
मराठीचे वय १५०० ते २००० वर्षांपेक्षा जास्त असल्याचे सांगणारे किमान ८० ग्रांथिक पुरावे आज एकट्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत उपलब्ध आहेत. ज्या ग्रंथांमध्ये मराठी भाषेची जुनी रुपे वापरलेली आढळतात त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (४ थे शतक), शूद्रकाचे मृच्छकटिक (६वे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (५ वे शतक), भद्रबाहूचे आवश्यक निर्युक्ती (३ रे शतक), विमलसुरीचे पौमचरियम् (१ ले ते ३ रे शतक) यांचा समावेश आहे.
मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे बहुतांशी मानले जाते. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपी मधुन लिहिली जाते.
महाराष्ट्री आणि जैन महाराष्ट्री
महाराष्ट्री प्राकृत मौर्य आणि सातवाहन राजवंशांच्या काळात विकसित झाली. या भाषेचा उपयोग प्राचीन साहित्य, काव्य आणि नाट्यलेखनात झाला आहे.
महाराष्ट्री भाषेची बरीच वैशिष्ट्ये जैन महाराष्ट्रीत असली तरी त्यात थोडे वेगळेपणही होते. ती अर्धमागधीने काहीशी प्रभावित होती, कारण श्वेतांबर जैन लेखकांवर अर्धमागधीचा प्रभाव होता. शिवाय ते लेखक भारताच्या ज्या ज्या प्रांतात जन्मलेले होते (उदा. हरिभद्र-राजपुताना, हेमचन्द्र-गुजरात) तेथील बोली भाषेतील शब्दसंपत्तीही त्यात होती. शिवाय जैन तत्त्वज्ञान व आचारातील अनेक रूढ पारिभाषिक शब्दही त्यात होते. दिगंबर जैनांनी 'शौरसेनी' भाषेला आपलेसे केल्यावर अर्थातच आपले सांप्रदायिक वेगळेपण राखण्यासाठी श्वेतांबर जैनांनी समकालीन भाषांमध्ये सर्वात प्रभावी असलेली 'महाराष्ट्री' भाषा आपली साहित्यभाषा म्हणून निवडली.
इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापासून अठराव्या शतकापर्यंत जैनांनी 'महाराष्ट्री' प्राकृतात लेखन केले. जैन महाराष्ट्रीत आज शेकडो ग्रंथ उपलब्ध आहेत.
पादलिप्त हे अतिशय प्रभावी जैन आचार्य होऊन गेले. (इ.स.१ ले-२ रे शतक) 'गाथासप्तशती' (अथवा गाहकोस) या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये त्यांचे भरीव योगदान आहे. कुवलयमाला ग्रंथात (इ.स. ७७८) पादलिप्तांबरोबर सातवाहन आणि षट्प्रज्ञक यांचे उल्लेख आहेत. 'पालित्तयेण हालो हारेण व सहइ गोट्ठीसु'- यामध्ये पादलिप्तांना 'सातवाहनाच्या गळ्यातला हार' म्हटले आहे. त्यांच्या आज उपलब्ध नसलेल्या 'तरंगवईकहा' नावाच्या अप्रतिम काव्यग्रंथाचा उल्लेख आहे. त्यांचे हे प्रेमाख्यान महाराष्ट्रीत लिहिलेले होते.
मराठी साहित्य परंपरा
१२ व्या शतकापासून मराठी साहित्य परंपरा आढळून येते. १२व्या शतकात मुकुंदराज यांनी लिहिलेला विवेक सिंधू हा आद्य मराठी काव्य ग्रंथ मानला जातो. त्यानंतर इ स १२३८ मध्ये महिमा भट्ट यांनी लीळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यानंतर इ.स. १२९० साली संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थ दीपिका (ज्ञानेश्वरी) हा ग्रंथ लिहिला.
आपण संत एकनाथांचे वारसदार आहोत. ते म्हणाले होते, "संस्कृत भाषा देवे केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" संत एकनाथ लिहीत होते, बोलत होते, ती भाषा कोणती होती? ती आजची मराठीच होती. तरीही ते तिला प्राकृतम्हणत होते, कारण महाराष्ट्री प्राकृत हीच जुनी मराठी होय. संस्कृत व मराठी या दोन्ही भाषा बहिणी आहेत असेच एकनाथ यातून सुचवीत आहेत.
सुफी परंपरेने मराठी भाषेला मौलिक योगदान दिलेले आहे. मराठीत लिहिणाऱ्या मुस्लीम / सुफी परंपरेतून मध्ययुगात सुमारे ५५ कवींनी मराठीला समृद्ध करणारे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच वीरशैवांचे योगदानही फार महत्त्वाचे आहे.
उद्योतनसूरीने इ. स. ७७८ मध्ये 'कुवलयमाला' हा ग्रंथ लिहिला. त्यात 'मरहट्ट' भाषेचा उल्लेख आहे. यातील वर्णन मराठी माणसाचेच आहे यात काय शंका? महाराष्ट्री प्राकृत म्हणजेच जुनी मराठी, अपभ्रंश मराठी म्हणजे मधल्या काळातील मराठी आणि चक्रधर-ज्ञानेश्वरांची मराठी ही प्रगल्भ आणि श्रीमंत अशी अर्वाचीन मराठी होय. मराठीचे हे तीन टप्पे आहेत. मात्र या सर्व प्रवासात मराठी भाषेचा गाभा आणि तिची चौकट कायम होती. आहे. मुळात या तीन वेगळ्या भाषा नाहीतच. ती एकच भाषा आहे
तसेच श्रीलंकेत दोन हजार वर्षापूर्वी ‘दीपवंश ‘आणि ‘महावंश’ हे दोन ग्रंथ लिहिले गेले त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे.तर ‘विनयपिटक’ या अडीच हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात लिहीलेल्या बौद्ध ग्रंथात ‘ महाराष्ट्र ‘ हा प्रदेश वाचक उल्लेख आहे.