जागतिक संगीत दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
22-Jun-2025
Total Views | 22
मुंबई : "संगीत हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, संगीतामुळे आपल्या संवेदना चिरकाल जीवंत राहतात " असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५ आणि आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात ते बोलत होते. दि. २१ जून रोजी मुंबईच्या नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, येथे पार पार पडला. यावेळी महाराष्ट्र भूषण पद्मविभूषण आशाताई भोसले, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी इतिहासात पहिल्यांदाच ५ रेडिओ जोकींनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी संगीतासोबतचे त्यांचे ऋणानुबंध उलगडून सांगितले, यावेळी बोलताना ते म्हणाले की " रेडिओ हे अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम आहे. रेडिओ हा आपला सांस्कृतिक वारसा आहे, ज्याच्या माध्यमातून आज सुद्धा शेवटच्या माणसापर्यंत आमचा आवाज पोहोचतो."
दि. २१ जून रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र रेडिओ महोत्सव २०२५, आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. समाजमनाचे सांस्कृतिक अवकाश विस्तारण्यामध्ये रेडिओने अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याच रेडिओ या समाजमाध्यमात काम करणाऱ्या लोकांच्या सन्मान सोहळा आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमात पार पडला. महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत प्रथमच १२ रेडिओ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, निवेदक यांसारख्या वेगवेगळ्या विभागांसाठी पुरस्कार देण्यात आले. सदर कार्यक्रमात रसिक प्रेक्षकांना आग्रहास्तव आशाताईंनी गाणे सुद्धा ऐकवले. सदर कार्यक्रमाची सांगता संगीत कार्यक्रमाने झाली, ज्यात युवा गायकांनी गीत सादर केले.
रेडिओ हे आज सुद्धा सर्वसमावेशी माध्यम : विकास खारगे, अपर सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग
"रेडिओ म्हटलं की सुमधुर संगीत, ही आठवण आपल्या सगळ्यांच्या मनपटलावर कोरली गेलेली आहे. सकाळच्या गाण्यांपासून ते क्रिकेटच्या कोमेंट्रीपर्यंत आपल्या सगळ्यांची नाळ रेडिओशी जोडली गेली आहे. बदलत्या काळात रेडिओच्या जोडीला अनेक समाजमाध्यमांचा उदय झाला. परंतु रेडिओची जागा कुणीही घेऊ शकलेले नाही. रेडिओ आज सुद्धा सर्वसमावेशी माध्यम आहे."
रेडिओच्या माध्यमातून मराठी लोकसंगीताचे जतन व्हावे! : आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
महाराष्ट्र रेडिओ महोतस्वात आपले मत व्यक्त करताना, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले "आपल्या सगळ्यांच्या सांस्कृतिक जडण घडणीमध्ये रेडिओचा अत्यंत महत्वाचा वाटा आहे. रेडिओ वर ऐकलेली गाणी आज सुद्धा अनेकांना तोंडपाठ असतात, इतका मोठा सुवर्णकाळ रेडिओशी जोडला गेलेला आहे. अशा या समाजमाध्यमाची ताकद लक्ष्यात घेता त्याला राजाश्रय मिळावा, या रेडिओमध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांचा सन्मान व्हावा म्हणून आशा रेडिओ पुरस्काराची संकल्पना आम्ही मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी तत्तकाळ या कार्यक्रमाला मंजुरी दिली. आशा भोसले म्हणजे जिवंत दीपस्तंभ आहेत, त्यांच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान, रेडिओमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल. वेगवेगळ्या रेडिओ चॅनलवर काम करणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकसंगीत आपल्याला ऐकायाला मिळते, त्या लोकसंगीताचे जतन रेडिओच्या माध्यमातून व्हायाला हवे."
रेडिओमुळेच आज मी तुमच्यासमोर उभी आहे! : आशा भोसले, ज्येष्ठ गायिका
आशा रेडिओ पुरस्कार २०२५ या कार्यक्रमाच्या दरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना, ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या की " माझ्या ९२ वर्षाच्या कारकीर्दीमध्ये मी अनेक वेगवेगळी प्रकारची गाणी गायली. परंतु माझ्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात झाली ती रेडिओ पासून. रेडिओवर पहिल्यांदा मी माझ्या बाबांची (दिनानाथ मंगेशकर) गाणी गायली. रेडिओ नसता, तर कदाचित मी केवळ अभिनेत्री म्हणून रंगभूमीवर काम केले असते. ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून माझं गाणं सगळ्यांपर्यंत पोहोचले. आपल्याला जर पुढच्या पिढीची ऐकण्याची तऱ्हा सुधरवायची असेल, तर त्यांच्या कानांवर शास्त्रीय संगीत गेले पाहिजे. जुनी गाणी त्यांनी ऐकायाला हवी, आणी हे गाणी त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम रेडिओचे आहे. "