सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा महासागर आज दि. ६ जुलै रोजी बघायाला मिळाला. टाळ मृदुंगाचा गजर करत, हरी नामाच्या भक्तीरसात तल्लीन होऊन ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात वारकऱ्यांमुळे अवघा परिसर भक्तीमय झाला. तुकाराम महाराजांच्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालख्या पंढरपूरात दाखल झाल्यानंतर भाविकांनी पंढरपूरात एकच गर्दी केली. प्रशासनाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार या वर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त, नियंत्रण कक्ष तसेच हजारो स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
पंढरपूरात अनेक स्वयंसेवी संस्थांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी वारकऱ्यांसाठी भजन, किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचा हा अनुभव घेण्यासाठी अनेक तरुण मंडळींनी उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. पारंपरिक वेशभूषा, फड आणि मिरवणुका यांमुळे शहरातील वातावरण अतिशय मंगलमय झाले आहे.
'या' कुटुंबाला मिळाला महापूजेचा मान!
आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सपत्निक महापूजा केली. त्याचबरोबर दरवर्षी आणखी एका विशेष कुटुंबाला पूजेचा मान मिळतो. यावर्षी नाशिक जिल्ह्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास दामू उगले यांच्या कुटुंबियांना हा मान मिळाला. कैलास उगले शेतकरी असून, मागची १२ वर्ष पंढरपूरची वारी करत आहेत. पूजेचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.