अभिराम भडकमकर यांच्या 'सीता' कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव!
30-Jun-2025
Total Views | 22
मुंबई : प्रख्यात लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या सीता या कादंबरीने प्रकाशनानंतर अल्पावधीतच यशाची अनेक शिखरं गाठली. अशातच आता पुन्हा एकदा या कादंबरीवर पुरस्कारांचा वर्षाव झाल्याचे दिसून येत आहे. इचलकारंजी येथील आपटे वाचन मंदिर आणि इचलकारंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्यावतीने 'सीता' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात नागपूरच्या 'अभिव्यक्ती' वैदर्भीय लेखिका संस्थेच्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार 'सीता' या साहित्यकृतीला प्रदान करण्यात आला आहे.
राजहंस प्रकाशनाच्यावतीने २०२४ साली प्रकाशित झालेल्या सीता या कादंबरीने केवळ सीता या व्यक्तिमत्वाचाच नव्हे, तर रामायाणाचा विविध अंगांनी आढावा घेतला आहे. या पुस्तकाविषयी बोलताना अभिराम भडकमकर सांगतात की "रामायण आपल्या कानावर अगदी लहानपणापासूनच येतं. ते कथेच्याही आधी ‘गीतरामायणा’तून माझ्यापर्यंत पोहोचलं आणि त्याचबरोबर मैथिली शरण गुप्तांचे ‘साकेत’ मी ऐकले होते. मोरारजी बापू हरियाना यांच्या दहा दिवसांच्या रामकथाही ऐकल्या. असं रामायण विविध बाजूने माझ्यापर्यंत पोहोचत होतं. मधल्या काळात सीता अबला, अगतिक असा आपला समाज झाला होता. पण, तरी त्या काळातील स्त्रीचित्राला छेद देणार्या गार्गी मैत्रेयी दिसल्या. रणांगणावर जाणारी कैकयी, वनवासाला जाणारी रामप्रिया, हा निर्णय सीतेचा होता. तिला जे प्रशिक्षण दिले होते - नैतिकता, राजकीय, संस्कृती, धर्म या सर्वांतून ती भूमिका आणि त्यायोगे निर्णय घेऊ शकते. ब्रह्मवादिनी गार्गी तर सीतेच्या गुरू होत्या. त्यात उत्तरकांड प्रक्षिप्त आहे, असे म्हटले जाते. रामाचे सुरुवातीचे विशेष उत्तरकांडात नाहीत. ते नंतर जोडले असावे. याचाही उल्लेख कादंबरीत केला आहे. सीता स्वतःचा निर्णय केवळ रामालाच सांगत नाही, तर कैकेयीला सांगते. कैकेयीला समजून घेणारी ही सीता आहे. या कादंबरीत ’नियती की कर्म’ हा सीतेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न केवळ माझा नाही, तर माता अहिल्या, कैकेयी यांचासुद्धा आहे. त्यांचा उलगडा करणारी ही सीता कादंबरी."