तृतीयपंथीयांना सन्मानपूर्वक जगता यावे, त्यासाठी प्रचंड मेहनत घेत विविध स्तरावर यशस्वी कार्य करणार्या मुलुंडच्या केशव जोशी यांच्याविषयी...
मुलुंडमध्ये मोजून ४० घरांत पौरोहित्याचे काम करणारे केशव मधुकर जोशी. त्यांचा दूध वितरणाचाही व्यवसाय आहे. त्याचबरोबर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी त्यांच्या बसही आहेत. पण, केशव यांची खरी ओळख आहे, तृतीयपंथीयांसाठी निस्वार्थीपणे काम करणारा माणूस. तृतीयपंथीयांना स्वाभिमानाने जगता यावे, त्यांना सन्मानपूर्वक रोजगार मिळावा, हक्काचे घर मिळावे, समाजात माणूस म्हणून स्थान मिळावे यासाठी ते काम करतात. जातीने ब्राह्मण, समाजात प्रतिष्ठा आणि आर्थिक सुस्थिती असलेले केशव, हे तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी का बरं काम करत असतील याचा मागोवा घेतला, तर आठवते ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पत्नीला एका पत्रात लिहिले ते वाक्य, "रामू दुःखच माणसाला मोठे करतात.” खरंच लहानपणी भोगलेले दुःख, अपमान, वेदना यामुळेच केशव जोशी यांनी, आयुष्यात माणूस म्हणून स्वतःचे मोठे अस्तित्व निर्माण केले आहे. ते ‘पाठिराखा प्रतिष्ठान संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच, ‘मुंबई उपनगर जिल्हा अधिकार कार्यालय तक्रार निवारण समिती’चे सदस्य व नवी मुंबई महानगरपालिका ‘दीनदयाळ जन आजीविका नियोजन समिती’चेही सदस्य आहेत. तृतीयपंथीयांसंदर्भातील समस्या आणि तक्रार निवारणासाठी, ते या समितीच्या माध्यमातून काम करतात. ज्यांच्या वाट्याला अमानुषतेचा अंधारच येतो, अशा तृतीयपंथीयांच्या उत्थानासाठी काम करणार्या केशव जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ.
मधुकर आणि सुनंदा जोशी हे मूळचे छत्रपती संभाजीनगरचे कुटुंब. कामानिमित्त ते मुंबई मुलुंड येथे स्थायिक झाले. यांना चार अपत्य, त्यांपैकी एक केशव. केशव ज्यावेळी सहा ते सात वर्षांचे होते, त्यावेळीच त्यांच्या आईवर एकटीने संसार सांभाळण्याची आपत्ती कोसळली.
८०चे दशक होते, एकट्या आईवर घराचा भार पडला. अशाकाळात आईला मदत व्हावी, म्हणून सात वर्षांच्या केशवने घराची जबाबदारी उचलली. ते त्या बालवयातही पहाटे चार वाजता उठत, लोकांच्या गाड्या धुणे, त्यानंतर ५ वाजता लोकांच्या घरी दूध वितरीत करणे आणि बरोबर एका तासाने म्हणजे ६ वाजता लोकांच्या घरी वर्तमानपत्र टाकणे, तिथून नित्यकर्म आटपून ७ वाजता किराणामालाच्या दुकानात जाऊन १२ वाजेपर्यंत तिथे हरकाम्या म्हणून काम करणे, १२.३० वाजता शाळेत जाणे, संध्याकाळी घरी आल्यावर आईला मदत करणे, रात्री अभ्यासाला बसणे, असे त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले.
त्यांना पुढेही शिकायचे होते पण, घरात तीन बहिणी होत्या. त्यांची जबाबदारीही केशव यांच्यावरच होती. त्यामुळे त्यांना नोकरी करणे भाग होते. त्यामुळे ते मॅकेनिकचे काम करू लागले. पुढे पेंटिंगचीही कामे त्यांनी घेतली. काम करता करताच ड्रायव्हिंगही करायला शिकले. त्यांनी सरकारी अनुदानातून रिक्षा घेतली, रिक्षा चालवू लागले. केशव यांनी अपार आणि प्रामाणिक मेहनत केली. दरम्यानच्या काळात पल्लवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. दोघांनी कष्टाने संसार उभा केला, आयुष्य स्थिरावले. २८ वर्षे ते शाळेचे बसवाहक म्हणून काम करत होते. सोबतीला घरचा दूध वितरणाचा व्यवसाय होताच. त्यामुळे काही वर्षांतच तीन स्कूलबस त्यांनी घेतल्या. या बस चालवण्यासाठी वाहकही त्यांनी नियुक्त केले.
दरम्यान त्यांनी अभय कुलकर्णी गुरुजींकडून पौरोहित्याचे प्रशिक्षण घेतले. त्यांचे काही नातेवाईक पौरोहित्याचे काम करायचेच. पौरोहित्यासाठी यजमानांकडे जाणे असू दे की, दूध वितरणाच्या व्यवसायात कुटुंबाशी संपर्क असू दे किंवा शालेय बसचालक म्हणून विद्यार्थी, पालक यांच्याशी संवाद असू दे, या सगळ्यांमुळे केशव यांचा लोकसंपर्क दांडगा झाला होता. पुढे सामाजिक स्थिती पाहता त्यांना वाटले की, शतप्रतिशत मतदान व्हावे म्हणून तृतीयपंथीयांनाही मतदान प्रक्रियेत समाविष्ट करणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी तृतीयपंथीयांशी संपर्क साधला. तृतीयपंथीयांबाबत समाजात असा समज असतो की, ते खूप श्रीमंत असतात वगैरे. पण, केशव यांना समजले की, तृतीयपंथीय समाजाची परिस्थिती दयनीय अशीच आहे. सर्वार्थाने पिचलेला शोषित समाज हेच त्याचे वास्तव. हे वास्तव पाहून केशव यांचे डोळे उघडले. तृतीयपंथीयांना माणसासारखे जगता यावे, म्हणून केशव यांनी काम सुरू केले.
पुरुष तृतीयपंथीय म्हणजे ‘गडे’ आणि स्त्री तृतीयपंथीय म्हणजे ‘साटले’ अशी तृतीयपंथीयांमध्ये वर्गवारी असते. या दोन्ही तृतीयपंथीयांचे संघटन करून त्यांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी केशव तत्पर असतात. त्यातूनच तृतीयपंथीयांना पेंशन मिळवून देणे, पनवेल येथे हक्काचे घर मिळवून देणे, त्यांचे बचतगट तयार करणे, सरकारी कंत्राट मिळवून देणे यासाठी केशव यांनी स्वतःला झोकून दिले आहे. या सगळ्या कामांत प्रशासकीय अधिकारी आणि तृतीयपंथीयांनीही त्यांना साथ दिली. केशव म्हणतात, "तृतीयपंथीयांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे आणि त्यासाठी त्यांना सन्मानाने जगता यावे, सन्मानपूर्वक रोजगार मिळावा, यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार आहे.” तृतीयपंथीयांच्या माणूसपणासाठी काम करणार्या केशव यांच्या ईश्वरी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!