मधुमेह नियंत्रणासाठी योगोपचार (भाग-४)

    11-Aug-2025
Total Views |

मधुमेहावरील आहार याविषयी आहार व अॅयुप्रेशरतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध सांगतात की, मधुमेह हा एक वाढता जीवनशैली विकार आहे, जो मुख्यतः शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित योगिक व्यायामासोबत संतुलित आणि योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. शाकाहारी आहार हा मधुमेहासाठी विशेष लाभदायक ठरतो.


१. संपूर्ण धान्यांचा वापर

पांढर्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, ज्वारी, नाचणी, बाजरी, साळीचा भात, ओट्स यांचा समावेश करावा. हे कमी ‘ग्लायसेमिक इंडेस’ असलेले अन्न घटक आहेत, जे रक्तातील साखर हळूहळू वाढवतात.

२. भरपूर भाज्यांचा समावेश

कोबी, पालक, मेथी, गाजर, टोमॅटो, कारले, घोसाळे, दुधी, फुलकोबी यांसारख्या ताज्या, कमी स्टार्चयुक्त भाज्या रोज खाव्यात. भाज्यांतील फायबर्स पचन क्रिया सुधारतात व साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात.

३. फळांचे योग्य प्रमाणात सेवन

फळांनी शुगर वाढते, हा एक गोड गैरसमज आहे. मधुमेह असणार्या सर्व लोकांनी भरपूर फळे खावीत, पण सकाळी अनशन पोटी आणि फळांच्या सेवनानंतर दोन तास काहीही खाऊ, पिऊ नये. कारण, फळांमध्ये फ्रुटोज असते, जे रक्तात मिसळत नाही आणि लवकर पचते, पण इतर कुठल्याही खाण्याच्या पदार्थांमध्ये ग्लुकोज असते, जे रक्तात इन्सुलिन कमी असल्यास मिसळते व ब्लड शुगर वाढवते, म्हणून फळांबरोबर दुसरा कुठलाही आहार घेऊ नये. कारण, दोन्ही एकत्र सेवन केल्यास त्याचे रूपांतर सुक्रोजमध्ये होते. म्हणजे खूप जास्त ब्लड शुगर वाढवते.

४. प्रथिनयुक्त अन्न

हरभरा, मूग, उडीद, सोयाबीन, राजमा, तूर अशा कडधान्यांचा आहारात समावेश करावा. यामुळे पचन सुधारते व पोट भरलेले राहते. दूध, दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ लो-फॅट स्वरूपात घ्यावेत.

५. साखर आणि गोड पदार्थ टाळणे

साखर, गूळ, साखरयुक्त पेये, मिठाई, बिस्किट्स, मैदा, बेकरीतील पदार्थ यांचे सेवन बंद करणे आवश्यक आहे. त्याऐवजी ‘स्टेविया’सारखे नैसर्गिक गोडी असलेले पर्याय वापरले जाऊ शकतात.

६. वेळेवर व प्रमाणात जेवण

भुकेप्रमाणे वेळेवर जेवणे आणि अति खाणे टाळणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसभरात तीन-चार लहान लहान जेवणं ठेवावीत.

निष्कर्ष

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी शाकाहारी आहार हा नैसर्गिक, सुरक्षित व प्रभावी मार्ग आहे. योग्य आहार, नियमित योगोपचार आणि मानसिक संतुलन ठेवल्यास औषधांशिवायही मधुमेह बर्याच प्रमाणात नियंत्रित होऊ शकतो.


डॉ. गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ समुपदेशक आहेत.)
९७३००१४६६५