
देशाचा ग्रामीण भाग आता नव्या अर्थक्रांतीचा भक्कम आधार आहे. ग्रामीण भागाच्या या प्रवासामध्ये सहभागी असलेल्या असंख्य महिलांपैकी एक असलेल्या ज्योती मोरे यांच्याविषयी...भारताचा ग्रामीण भाग म्हणजे केवळ शेतीपुरताच उरलेला नाही, तर तो आता नव्या शयतांचा, नवउद्योजकतेचा आणि परिवर्तनाचा चेहरा झाला आहे. ग्रामीण भागामध्ये असंख्य संधी दडलेल्या असून, ओळखण्याची नजर आवश्यक आहे. ‘कोविड’नंतर अनेकांनी गावाकडे नव्याने पाहिलं. तिथेच त्यांनी संधी शोधली आणि उभारीही घेतली. नृसिंहवाडीच्या ज्योती कृष्णा मोरे हे उद्योजक महिलांपैकी एक नाव!
नृसिंहवाडीला सद्गुरूंच्या कृपाशीर्वादासाठी लाखो भाविक नित्यनेमाने भेट देतात. या शहरात अजून एक गोष्ट फार प्रसिद्ध आहे, ती म्हणजे नृसिंहवाडीची बासुंदी. नृसिंहवाडी जशी सद्गुरूंशी जोडली गेली आहे, तसाच सद्गुरूंशी ज्योती यांचाही संबंध जन्मापासूनचाच आहे.
ज्योती यांचा जन्म कुरुंदवाड येथील. हे स्थानही सद्गुरूंच्या असंख्य लीलांमधील महत्त्वाचे स्थान. ज्योती यांचे बालपण कुरुंदवाड येथेच गेले. दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, घरच्यांनी त्यांचा विवाह नृसिंहवाडीच्या कृष्णा मोरे यांच्याशी लावून दिला. लहान वयातच संसाराची जबाबदारी ज्योती यांनी समर्थपणे पेलली. ज्योती यांच्या पतींना उत्तम बासुंदी आणि इतर गोड पदार्थ तयार करता येत. त्यामुळे ते अनेक ठिकाणी जाऊन बासुंदी तयार करून देत असत. संसाराचा हा गाडा हाकताना ज्योती यांना दोन पुत्ररत्नांचीही प्राप्ती झाली. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरातील कामातच ज्योती यांचा वेळ जाई. सर्व काही अलबेल सुरू असतानाच ‘कोविड’ची साथ देशभर पसरली. त्यामुळे साहजिकच पर्यटनक्षेत्री राहणार्या लोकांना ज्या समस्यांचा सामना करावा लागला, त्याच समस्या ज्योती आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही अनुभवायला आल्या.
मात्र, त्या परिस्थितीतही ज्योती यांनी कच खाल्ली नाही. ज्योती यांनी त्यांच्या पतीकडे असलेल्या कौशल्यांचा पुरेपूर वापर करण्याचे ठरवले आणि गावातील बासुंदीच्या लहानमोठ्या मागण्या घरगुती पद्धतीने करण्यास सुरुवात केली. नृसिंहवाडीमध्ये बासुंदी प्रसिद्ध असल्याने अनेकांकडे शुभ कार्याला बासुंदीचेच पक्वान्न असे. त्यामुळे साहजिकच लहान लहान ऑडर्सही मोठ्या प्रमाणात वाढत होती. अशातच ज्योती यांनी ग्रामपंचायतीमार्फत ‘उमेद’ प्रकल्पासाठी स्वतःची नाव नोंदणी केली होती. कालांतराने परिस्थिती सुधारली. ‘कोविड’काळातील महामारीनिमित्ताने आलेली बंधने शिथिल झाली. त्यामुळे सुरू झालेल्या पर्यटनामुळे साहजिकच ज्योती यांच्याकडील मालाची मागणी वाढत होती. मात्र, घरगुती स्वरूपाचा व्यवसाय असल्याने पुरवठा करण्यालाही मर्यादा होत्या. या सगळ्यावर आपल्या अंगीभूत व्यावसायिक कौशल्याच्या आधारे ज्योती मात करत होत्या. मात्र, त्याला मर्यादा होत्या. इतक्यातच शासनाच्या ‘लखपती दीदी योजने’ची माहिती घेऊन ‘उमेद’च्या माध्यमातून ‘नंदाई स्वयं साहाय्यता महिला समूहा’च्या काहीजणींनी ज्योती यांची भेट घेतली. त्यांना बासुंदी उद्योगाच्या विस्ताराबाबत, शासनाकडून मिळणार्या अनुदानाबाबत सविस्तर माहिती दिली. ज्योती यांनी मान्यता दिल्यानंतर ‘लखपती दीदी योजने’साठीच्या आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. काही काळातच ज्योती यांना या मदतीमुळे बासुंदी निर्मितीसाठी आवश्यक उपकरणे विकत घेतली. त्यामुळे आता बासुंदी निर्मितीचा वेगही वाढला होता. खाद्यपदार्थांमध्ये सर्वांत महत्त्वाचे असते ते म्हणजे, एकच चव कायम टिकवणे. या महत्त्वाच्या कामी ज्योती यांच्या मदतीला आला, तो त्यांचे पती कृष्णा मोरे यांचा या क्षेत्रातील दांडगा अनुभव. पतीचा अनुभव, अत्याधुनिक यंत्रणा, प्रामाणिकपणा आणि दत्तगुरूंचा आशीर्वाद हीच आमच्या यशाची चतुःसूत्री असल्याचे त्या सांगतात.
सध्या ज्योती यांच्या या कामामध्ये, त्यांचे पती व दोन्ही मुलेही मदत करतात. तसेच सासरे, दीर आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही ज्योती यांना भक्कम पाठिंबा आहे. "माझ्या नवर्यामुळेच आज मला यश मिळते आहे,” असे ज्योती अभिमानाने सांगतात. ज्योती यांनी दोन महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आज ज्योती यांच्याकडील श्रीखंड, बासुंदी आणि बासुंदी-पेढा या पदार्थांना मोठी मागणी असते. ज्योती घाऊक व्यापाराला प्राधान्य देत असून, महाराष्ट्रात कुठेही सेवा देण्यास त्या तत्पर असतात. घरातील चुलीवरून सुरू झालेला हा व्यवसाय, आज दिवसाला ४० लीटर बासुंदीच्या मागणीपर्यंत वाढला आहे. ज्योती यांच्याकडील बासुंदी पेढाही लोकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. येत्या गणपतीच्या निमित्ताने बासुंदीच्या खव्याचे मोदकदेखील तयार करणार असल्याचेही ज्योती सांगतात.
"सध्या असलेल्या कामगिरीवर समाधानी असले, तरीही ‘करोडपती दीदी’ योजनेचे लक्ष्य ग्रामपंचायत आणि ‘उमेद’च्या अधिकार्यांनी दिले असून, लवकरच ते पूर्ण करायचे आहे,” असे ज्योती सांगतात. लवकरच ज्योती यांच्या व्यवसायाचा विस्तार मुंबईमध्येही होणार असल्याचेही त्या नमूद करतात. ज्योती यांचा प्रवास म्हणजे, बिकट परिस्थितीमध्ये भारतीय स्त्री खचून न जाता, पदर खोचून कुटुंबाचा आधार होते, याचे उत्तम उदाहरण. ज्योती यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या हार्दिक शुभेच्छा!