ज्योतीचा तेजोमय प्रवास

Total Views |

एक सर्वसामान्य गृहिणी कौटुंबिक पाठबळ मिळाल्यास जिद्दीने यशस्वी होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण असणाऱ्या ‘श्रीराधे क्रिएशन’च्या संस्थापिका ज्योती मुकेश शर्मा यांच्याविषयी...


महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील मंदाना या एका छोट्या खेडेगावात, ज्योती यांचे संपूर्ण बालपण गेले. घरातील कौटुंबिक वातावरण थोडे शिस्तीचेच होते मात्र, ज्योती यांचे आजोबा आणि वडील दोघेही मुलांच्या शिक्षणाबाबत अत्यंत जागरूक असल्याने, ज्योती चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकल्या. ज्योती यांना शिक्षण घेण्यासाठी मंदाना या गावातून रोज शहादा येथे जावं लागत असे. जीप किंवा वडाप हे त्याकाळातील प्रवासाचे साधन होते. यामुळेच त्याकाळी गावातील खूप कमी मुलींना शिक्षण घेता आले. मात्र, ज्योती यांनी वडील आणि आजोबांच्या पाठिंब्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

बारावीनंतर त्यांनी ‘बीए’ला प्रवेश घेतला मात्र, त्याच काळात वर्ष १९९९ मध्ये ज्योती यांचे राजस्थामधील मुकेश शर्मा यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर ज्योती एकत्र कुटुंबात आल्या. लग्नानंतर दोन वर्षे त्या एकत्र कुटुंबपद्धतीत राजस्थान येथेच राहिल्या. पुढे मुकेश कामानिमित्त मुंबई येथे स्थायिक झाल्यावर, ज्योती यांनी काहीकाळ राजस्थान-मुंबई अशी ये-जा सुद्धा केली. नंतर मात्र ज्योती गिरगाव येथे कायमस्वरूपी स्थायिक झाल्या. याचकाळात पती मुकेश यांनी, उर्वरित शिक्षण पूर्ण करण्याविषयी ज्योतींना सांगितले. मात्र, ज्योती यांना कला आणि हस्तकलेची आवड असल्याने, त्या मोकळ्या वेळेत आपली आवड जोपासत होत्या. हस्तकलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवनवीन वस्तू तयार केल्या होत्या.

मारवाडी आणि त्यातून एकत्र कुटुंब असल्याने, ज्योती यांच्या घरात धार्मिक सोहळे आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत. अनेक मंदिरे आणि तीर्थस्थळांना भेटी देण्याचा योगही यानिमित्ताने येत असे. त्यावेळी ज्योती वाटे की, देवाला परिधान करण्यात येणार्या कापसाच्या कंठ्या या अत्यंत साध्या का असतात? त्यामुळे आकर्षक अशा नवीन कंठ्या तयार करण्याचा विचार त्यांनी केला. नंदुरबारला शेतात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे घरचा शेतातील कापूस वापरून, ज्योती यांनी आकर्षक कंठ्या तयार केल्या.

सर्वप्रथम ज्योती यांनी गणपती मंदिरातील मूर्तीसाठी, एक कंठी तयार केली. ती कंठी गणपतीवर अधिकच खुलून दिसत होती. ज्योती यांच्या मैत्रिणींनीही, त्यांच्या या कलेचे कौतुक केले. तसेच त्यांच्या घरच्या गणपतीसाठी अशी कंठी बनवून द्यावी, अशी मागणीही केली. ज्योती यांना या कलेचे पुढे जाऊन मोठ्या व्यवसायात रूपांतर होईल, असे कधीही वाटले नव्हते. जेव्हा ज्योती यांच्याकडे त्यांच्या मैत्रिणींनी विकत कापसाच्या कंठीची मागणी केली, तेव्हा ज्योती यांनी या मैत्रिणींना मजेशीर उत्तर दिले की, ’घरच्या कापसाची ही कंठी मी तुम्हाला अशीच देईन, त्यासाठी मला पैसे नको. किती पैसे आकारू यात सगळे घरचेच तर आहे?’, मात्र, या सर्वच मैत्रिणींनी ज्योती यांना त्यांच्यातील कलेला एक व्यावसायिक रूप देण्याचे सूचविले. पती मुकेश यांनीही ज्योती यांना पाठबळ देत, हा व्यवसाय उभा करण्यात हातभार लावला. ज्योती यांची मुलगीही आज ‘सीए’चे शिक्षण घेत असतानाही, आईला या कामात मदत करते.

आज ज्योती यांचा व्यवसाय केवळ गणपतीच्या कंठ्या इतकाच मर्यादित नसून, दरवर्षी त्या एक नव्या संकल्पनेची जोड देत,उत्सव काळात नवीन हस्तकलेचे नमुने सादर करतात. मुंबईतील अनेक मोठ्या मंदिरात, ज्योती यांनी निर्माण केलेल्या निरनिराळ्या वस्तू, तोरणं, कापसाच्या कंठ्या यांची मागणी कायम असते. देवपूजा, गौरी,-गणपती, नवरात्री याकाळात लागणार्या सर्व कापसाच्या वस्तूंची शुद्धता आणि पावित्र्य राखत निर्मिती करून, ज्योती यांच्या ‘श्रीराधे क्रिएशन’ने आज गिरगावात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ज्योती सांगतात, "मला मुलगी झाली, तेव्हा मी तिचे नाव राधिका ठेवले. याचकाळात बाजारातून माझ्या उत्पादनांची मागणीही वाढत होती. तेव्हा आम्ही विचार केला की, आपल्या उत्पादनाचेही काहीतरी नाव असायला हवे. म्हणून ‘माही श्रीराधे’ असे नाव आमच्या सर्व उत्पादनांना दिले. मुंबईतील अनेक मंदिरात मी दिलेली तोरणं लागतात. मला जेव्हा एखाद्या मंदिरात माझे तोरण दिसते तेव्हा, देवाची सेवा आपल्या हातून घडत असल्याचा खूप आनंद होतो. नंदुरबारमधल्या एका छोट्या गावातून मुंबईत आलेली माझ्यासारखी सर्वसामान्य स्त्री स्वतःचा व्यवसाय करू शकली, ते केवळ माझ्या पती आणि मुलीने दाखविलेल्या विश्वास आणि प्रोत्साहनामुळेच!” असे ज्योती आवर्जून सांगतात.

अनेकदा असे म्हटले जाते की, मुलीचे लग्न झाले म्हणजे तिची स्वप्नं आता संपली. घर, कुटुंब आणि मुलं यांच्या पलीकडे आता तिचे अस्तित्वच काय असणार? मात्र, मुकेश शर्मा यांच्यासारखे जोडीदार मिळाल्याने, ज्योती यांचे संपूर्ण आयुष्यच उजळून निघाले आहे. त्यामुळेच ज्योती शर्मा यांचा गृहिणी ते व्यावसायिक हा प्रवास, नक्कीच अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो. ‘श्रीराधे’ कंपनीच्या संस्थापक असणार्या ज्योती शर्मा यांना, त्यांच्या पुढील कार्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.