आईचे स्वप्न, मेघालीची शर्थ...

    05-Aug-2025
Total Views |

केवळ एक यशस्वी खेळाडू नव्हे, तर नेतृत्वगुण आणि प्रशिक्षणातून आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या क्रीडाविश्वातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मेघाली कोरगावकर-म्हसकर यांच्याविषयी...

मेघाली यांचे बालपण मुंबईच्या दादर-प्रभादेवी परिसरात गेले. बालपणीच कबड्डी हा खेळ त्यांच्या रोमारोमांत भिनला. त्यांचे वडील हे स्वयंप्रेरित कबड्डीपटू होते आणि त्यांच्या आईनेही आपल्याच काळात कबड्डीच्या मैदानावर चढ-उतार अनुभवले होते. आईने ‘शिवछत्रपती पुरस्कारा’साठी प्रयत्न केले; पण काही कारणांमुळे ती संधी हुकली. लहान वयातच मेघाली यांना हे जाणवले की, आईच्या डोळ्यात अजूनही अपूर्णतेचा हलकासा तडा आहे आणि याच तड्याला पूर्णत्व देण्याचे व्रत त्यांनी मनोमन स्वीकारले.

मेघाली यांना केवळ घरातूनच प्रेरणा मिळाली असे नव्हे, तर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांसारख्या खेळाडूंच्या खेळातील स्फूर्ती, मुलाखतीमधील सकारात्मकतेने त्यांना जिद्द मिळाली. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ अशा प्रत्येक टप्प्यावर कबड्डी खेळताना त्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा यथायोग्य अवलंब केला. ‘मुंबई विद्यापीठ’, ‘मुंबई शहर संघ’ आणि ‘महाराष्ट्र राज्य महिला संघा’चे कर्णधारपद त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. 1999 ते 2006 या कालखंडात सलग नऊ वरिष्ठ कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत, त्यांनी संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. अमरावती, मुंबई, कर्नाटक, बिहार, हरियाणा, हैदराबाद इत्यादी ठिकाणी त्यांनी सातत्याने आपली चमकदार कामगिरी सादर केली. नंतर रेल्वे संघात सहभागी होऊनही त्यांनी देशपातळीवर नाव कमावले. 2001 साली पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्रासाठी सुवर्णपदक पटकावले. 2005 साली हैदराबाद येथे संपन्न झालेल्या पहिल्या आशियाई महिला कबड्डी स्पर्धेत त्यांनी भारतीय महिला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. हा क्षण त्यांच्या क्रीडाजीवनातील सर्वोच्च शिखरांपैकी एक ठरला. पण, सर्वांत भावनिक आणि अर्थपूर्ण क्षण म्हणजे, 2002-03 साली वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी मिळालेला ‘शिवछत्रपती पुरस्कार!’ तो पुरस्कार स्वीकारताना त्यांच्या डोळ्यांत तरळलेले आनंदाश्रू फक्त वैयक्तिक यशाचे नव्हते; तर ते आईच्या स्वप्नपूर्तीची साक्ष देणारे होते. हा पुरस्कार स्वीकारणार्‍या मेघाली मुंबईतल्या आजपर्यंतच्या सर्वांत तरुण क्रीडापटू ठरल्या आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर दादर येथील सिद्धिविनायक मंदिरापासून सुरू झालेल्या त्यांच्या जंगी मिरवणुकीत हजारो लोकांनी त्यांना डोळ्यांत साठवले. पण, आपल्या यशाचे, विजयाचे रुपांतर अहंकारात कधीही होऊ दिले नाही, उलट त्या म्हणाल्या, “आता भारताच्या महिला कबड्डी संघाचे मला नेतृत्व करायचे आहे!”

मेघाली यांचा प्रवास खेळाडूपणापर्यंत मर्यादित राहिला नाही. त्यांनी ‘नेताजी सुभाष क्रीडा संस्थे’तून ‘ए ग्रेड’ प्रशिक्षक कोर्स पूर्ण केला. ‘स्ट्रेंथ अ‍ॅण्ड कंडिशनिंग’ या विशेष प्रशिक्षणाद्वारे त्यांनी आधुनिक क्रीडातंत्र आत्मसात केले. सातव्या ‘प्रो-कबड्डी’ सत्रात ‘स्टार स्पोर्ट्स’वरील तज्ज्ञ समालोचक, आठव्या सत्रात नवोदित खेळाडूंना निवडणार्‍या समितीतील प्रशिक्षक म्हणून आणि 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाच्या व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.

आज त्या मध्य रेल्वे विभागात कार्यरत आहेत. कार्यकर्तृत्व, प्रशिक्षण आणि सामाजिक भान यांचा सुंदर समन्वय साधत, त्या ग्रामीण भागातील वंचित मुलींना खेळासाठी प्रेरणा देत आहेत. तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे आजची तरुण पिढी मैदानापासून दूर जात आहे. यावर भाष्य करत मेघाली सांगतात, “आजचे तरुण मोबाईल, संगणक यामध्ये अडकत चालले आहेत. मैदान रिकामे होते आहे. पण, मी तर सांगते, मैदानात घाम गाळल्याशिवाय यशाचे सोनं घडत नाही.” त्यांनी यश, संघर्ष, अपयश सगळं अनुभवून नव्या पिढीला एक स्पष्ट संदेश दिला आहे; “धावपळीच्या या जगात स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा मैदानासाठी, खेळासाठी!” त्यांनी स्वतःच्या प्रवासात जे अनुभवले, जे शिकले, तेच आता त्या नव्या पिढीला देत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक मुलींनी ‘प्रो-कबड्डी’ आणि राष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवले आहे. मेघाली यांची आजवरची वाटचाल म्हणजे संघर्ष, त्याग, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श नमुना आहे. आता त्या नव्या खेळाडूंना सांगतात, “तुमचं स्वप्न मोठं असो वा लहान, खेळामुळे त्याला दिशा मिळते. खेळातून मिळणारा आत्मविश्वास, निर्णयक्षमता, सहकार्य आणि प्रतिकूलतेतही संयम बाळगण्याची ताकद यामुळेच त्यांनी कबड्डीला फक्त करिअर म्हणून नाही, तर आयुष्याचा मार्ग म्हणून स्वीकारले.”

मेघाली यांची ही यशोगाथा प्रेरणादायीच नाही, तर ज्या जिद्द आणि चिकाटीने त्यांनी स्वतःला घडवले, ती आजच्या आणि उद्याच्या पिढीला नवी दिशा देणारी आहे. मैदानाच्या प्रत्येक कोपर्‍यात त्यांचे स्वप्न अजूनही घामाच्या थेंबांत प्रतिबिंबित होत आहे. शेवटी त्या सांगतात की, “खेळा, शिका, पडलात तरी उभे राहा. कारण, हेच आयुष्याचे खरे शास्त्र आहे!”
9967020364