‘काठी न् घोंगडी घेऊन द्या की रं मला बी जत्रंला येऊन द्या की’ या सुप्रसिद्ध लोकगीताच्या पंक्तीनुसार उबदार घोंगडीचा शानदार प्रसार करणार्या गिरीश निकम यांच्याविषयी...बुहद्धिदाता श्रीगणेशाचे घरोघरी आगमन होण्यासाठी आता उरले अवघे काही दिवस. कलागुणांचा दाता असलेला हा ईश्वर मानवजातीला अत्यंत प्रेरणादायी असाच. सर्व कलागुणांना विकसित करण्याची संधी तो देत असतो. ६४ कलांमधील निपुण हे कलाकार मानवजातीला जो आनंद बहाल करतात, जी साधने उपलब्ध करून देतात, ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात. जसे की, विणकर जोपासत असलेली कला ही अद्भुतच. आजच्या अत्याधुनिक काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी हिटरचा उपयोग करणार्या आजच्या पिढीला कदाचित घोंगडीची उब उमजणार नाही. कारण, घोंगडीचा वापर आपल्या फॅशनला साजेशी नसल्याची त्यांची धारणा. या घोंगडीची ऊब मायेच्या उबेइतकीच उपयुक्त असते, हे आजच्या तरुण पिढीला पटवून देण्याची गरज आहे. म्हणूनच आजच्या या लेखातील नायक कदाचित या पिढीसाठी याकामी प्रेरणास्रोत ठरु शकतो.
काळ बदलत असला, अत्याधुनिक साधने उपयुक्त असली, तरी ती तात्कालिक असतात. ‘युज अॅण्ड थ्रो’च्या आजच्या जमान्यात समाजाची मानसिकतादेखील तशीच होत आहे. मात्र, जुने ते सोने हे ज्यांना उमजले, ते अशा वस्तू टाकून देणार नाहीत. त्यासाठीच आपल्या भारतात संस्कृती जपून ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित होते. आजचे नायक गिरीश निकम हे याच संस्कृतीच्या जतनाचे प्रतिनिधित्व करतात. आजच्या काळात आरोग्याच्या समस्या घरोघरी ठाण मांडून आहेत. ज्या काळात प्रगत औषधशास्त्राचा साधा शोधही लागला नव्हता, तेव्हा लोक आपल्या सभोवतालच्या निसर्गमित्राकडून उपचार करून घेत होते. मात्र, त्यानंतर झटपट उपचार करवून घेण्याची सवय जडली आणि ही पारंपरिक उपचार पद्धती विस्मरणात गेली. पण, आजच्या या लेखातील नायकाचे कार्य हे स्मरण पुन्हा करुन देते.
पूर्वी घराघरांत आलेल्या पाहुण्यांना बसण्यासाठी घोंगडी अंथरली जात असे. पावसात-थंडीत घोंगडी ही शेतकर्यांच्या कायम सोबत असायची. लग्नांमध्ये नवर्या मुलीसोबत सासरच्यांना पुरतील एवढ्या घोंगड्या भेट म्हणून दिल्या जात असत. घराघरात खूप सोयीसुविधा नसायच्या. त्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये घोंगडीचा वापर होत असे. अजूनही खेडेगावात घोंगडी वापरली जाते. पण, आजच्या पिढीला घोंगडी हा प्रकार फारसा परिचयाचा नाही. त्यामुळे घोंगडीचा आरोग्यासाठी होणारा वापरदेखील लोप पावत जात आहे. पूर्वी अंगावर पांघरण्यासाठी घोंगडीचा वापर होत होता. काळानुसार त्यात बदल होत गेले आणि आज घोंगडी ही काय असते, ती कशापासून बनते, यांची साधी माहितीही आजच्या पिढीला नाही, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ही कला लोप पावत आहे.
मूळचे इंदापूर येथील गिरीश निकम यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले. घोंगडी बनवणे आणि विकणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय. गेली ४० हून अधिक वर्षांपासून ते ही परंपरा जपत आहेत. ते दुचाकीवरून गावोगावी जाऊन घोंगडी विकण्याचे काम करतात. महाराष्ट्रभरात जाऊन घोंगडीचा प्रसार करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
मेंढपाळ आपल्याजवळ असलेल्या मेंढ्यांच्या अंगावरील कातर काढतात. त्यानंतर काळी व पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर त्यापासून सूत तयार होते. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपे जावे, यासाठी त्याला रात्रभर चिंचोयांच्या खळीमध्ये भिजत ठेवले जाते. त्यामध्ये हळद आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क टाकला जातो. साधारणपणे एक घोंगडी विणायला दोन ते तीन दिवस लागतात. पूर्वी दहा ते १२ फूट लांबीची घोंगडी विणली जात होती. आता ग्राहकांच्या मागणीनुसार हवी, तशी घोंगडी बनवून दिली जाते. एक किलो लोकर २९ ते ३२ रुपयांना पडते. एक घोंगडी विणायला सहा ते आठ किलो लोकर लागते. एक घोंगडी ७०० ते पाच हजार रुपयांपर्यंत विकली जाते. या घोंगड्यांची विक्री गिरीश स्वतः पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत तेथील आठवडे बाजार, जत्रा, कृषी खात्यामार्फत भरविलेल्या प्रदर्शनात विक्री करतात.
पूर्वी ग्रामीण भागातील घराघरांत घोंगडीचा वापर केला जात होता. काळानुसार बदल होत गेल्याने याचा वापर कमी झाला. त्याची जागा आज ब्लँकेट, बेडशीट यांनी घेतली. याशिवाय, वजनाला जड व अंगाला थोडीशी टोचत असल्यानेही घोंगडीची मागणी कमी झाली. परंतु, जुन्या पिढीतील आणि शहरी भागात स्थायिक झालेल्या ग्रामीण भागातील नागरिकांकडून घोंगडीला आजही मोठी मागणी आहे. घोंगडीचा वापर केल्यास पाठदुखी, कंबरदुखी, वात, सांधेदुखी यांपासून आराम मिळतो. तसेच, झोप येत नसणार्यांसाठी हे एक उत्तम आरामाचे साधन आहे. घोंगडीवर झोपल्याने शांत झोप लागते. उच्च रक्तदाब नियंत्रणात येण्यास मदत होते. कांजिण्या, गोवर, तापातही घोंगडीचा वापर करतात. लहान मुलांचा अस्थमा दूर होतो. अर्धांगवायूचा धोका टळतो, मधुमेह कमी होण्यास मदत होते. घोंगडीवर झोपल्याने साप, विंचू, मुंगी, गोम, मधमाशा, ढेकूण जवळ येत नाहीत, अशी माहिती सांगून निकम घोंगडीचा गावागावांत फिरून प्रसार करतात. त्यांच्या या समाजोपयोगी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मनःपूर्वक शुभेच्छा.
(अधिक माहतीसाठी संपर्क: ७२७६०३८६२७)
शशांक तांबे