‌‘सहस्त्रनाद‌’कार अमी

    08-Nov-2025
Total Views |

संस्कृतीचे रक्षण करत सर्वच सणवार आनंदात साजरे करून नाशिक ढोलचा आवाज देश-विदेशांत पोहोचविणाऱ्या अमी छेडा यांच्याविषयी...

जन्मभूमी मुंबई असलेल्या अमी मुकेश छेडा यांनी, नाशिकला आपली कर्मभूमी करत ‌‘सहस्त्रनाद‌’ ढोलपथकाच्या माध्यमातून आपला वेगळाच ठसा देशभर उमटवला आहे. 2018 सालापासून ढोलपथकाशी जोडल्या गेलेल्या अमी यांनी आपल्या भावासोबत ‌‘सहस्त्रनाद‌’ नावाच्या ढोलपथकाचा शुभारंभ केला. जेव्हा हे ढोलपथक सुरू झाले, तेव्हा अमी यांच्या पथकात वादकांची संख्या होती 150. आता वादकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून, आज 450 वादकांचे पथक अमी चालवतात.

आजोळ मुंबईच्या गिरगावातील असलेल्या अमी यांच्यावर, ढोलपथकाचा संस्कार अगदी लहान असल्यापासूनच झाला. ढोलपथकाबरोबरच विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचे कामही त्यांनी आवडीने केले. त्यामुळे नशिकमध्ये शहरात त्यांच्या बऱ्याच ओळखी निर्माण झाल्या. त्यातच युवा पिढीबरोबरच ढोलवादन हा विषय, जवळपास सर्वच वयोगटांतील व्यक्तींच्या जिव्हाळ्याचा. पथकाच्या माध्यमातून अनेक त्यांच्याशी लोक जोडली गेली होती. त्यामुळे त्यांच्या ढोलपथकाचा विस्तार होत गेला.

ढोलपथकाबरोबरच अमी यांचे सामाजिक कार्यही फार मोठे. ‌‘कोविड‌’च्या काळात सर्वांनाच मदतीची गरज असताना, त्यांनी निस्वार्थवृत्तीने ती देण्याचेे काम केले. महिलांच्या सबलीकरणाबरोबरच इतरही अनेक कामे करत महिलांना उभारी घेता येईल, यासाठी त्या जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत. यासाठी अमी यांनी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिबिरांचेही आयोजन केले. यासोबतच सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पाणी प्रश्नावरही, अमी यांचे कार्य मोलाचे आहे. यामध्ये अगदी गावखेड्यात जाऊन त्यांनी ‌‘पाणी अडवा पाणी जिरवा‌’ या संकल्पनेचा प्रसार केला. त्यांच्या या कामाची दखल घेत डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते, अमी यांना सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, ढोलपथकासाठीदेखील त्यांना खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत.

भारतभर अमी यांच्या ढोलपथकाचा नाद गुंजला असून, दक्षिण भारत, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्येही त्यांनी आपल्या नाशिक ढोल वादनाचे सादरीकरण केले आहे. ढोलपथकाच्या माध्यमातून अमी युवा पिढीला मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीने, प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्या आपल्या पथकाच्या माध्यमातून काही सामाजिक उपक्रम राबवत, तरुणांना आपल्या संस्कृतीकडे पुन्हा घेऊन जाण्याबरोबरच, संस्कार शिकवण्याचेही काम करतात.

आजकालची पिढी आपले सणवार आणि संस्कृतीपासून अलिप्त होते आहे. त्यामुळे अमी यांच्या पथकामध्ये सगळेच सणवार साजरे केले जातात. संस्कृतीसंबंधित सगळ्या गोष्टी, पथकातील वादकांकडून करून घेण्याचे कामही त्या करतात. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने ‌‘वसुधैव कुटुम्बकम्‌‍‌’ या संकल्पनेनुसार, त्यांच्या पथकात येणाऱ्यांशी वागले जाते. पथकात येणाऱ्या नव्या माणसाची कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, आर्थिक परिस्थिती या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, ‌‘आपण एक कुटुंब आहोत‌’ या मानसिकतेने वागण्याची भूमिका पथकासमोर अमी यांनी नेहमी मांडली आहे. युवा पिढीला दिशा मिळावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ढोलपथकाची समृद्ध परंपरेत खंड पडता कामा नये, यासाठी तिचा अधिक प्रसार होण्याची गरज असून, त्यासाठी अनेकांनी पुढे येण्याची गरज असल्याचेही अमी म्हणतात. ढोलपथकाशी एक वादक जोडला गेल्यावर, त्याच्यासोबत एक संपूर्ण कुटुंब जोडले जाते. असाच समाजही या पथकाशी जोडला जातो. अमी यांनी मानाची खूप वादनं केली असून, नाशिकमध्ये झालेल्या सर्वांत मोठ्या युथ फेस्टिव्हलमध्येही त्यांनी वादन केले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर अमी यांच्या ढोलपथकाने, युथ फेस्टिव्हल संचलनामध्ये वादन केले.

त्याचबरोबर ‌‘नॅशनल जिओग्राफी‌’ या चॅनेलवर ढोलपथक आणि महाराष्ट्रातील संस्कृतीवर एक माहितीपटाची निर्मिती झाली होती. त्यात एकमेव अमी यांच्या यशस्वी कारकिदचा मागोवा या माहितीपटात घेण्यात आला होता. अमी यांनी अनेक मानाचे तुरे मिळवले असून, राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्येही अमी यांनी वादनाचे कार्यक्रम केले आहेत. विदेशांतूनही अमी यांना अनेकदा वादनासाठी बोलावणे आले आहे. पण, एवढे मोठे पथक घेऊन जाणे आर्थिकदृष्ट्या परवडण्यासारखे नसल्याने, त्यांनी अद्याप विदेशात वादन केलेले नाही. तरीही दुबई, अमेरिका तसेच न्यू जस येथून काही दिवसांपूवच विचारणा झाली असून, आर्थिक समीकरणे जुळवणे शक्य नसल्याने विदेशांत वादन करणे शक्य नसल्याचे अमी म्हणातात.

दरम्यान, नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीसाठी, दरवष अनंत चतुर्दशीला वादन करण्याचा मान अमी यांच्याच पथकाचा आहे. यासोबतच नाशिकच्या ‌‘सिडको महाराजा‌’, ‌’द्वारकाचा सम्राट‌’, ‌’नाशिकचा गणराया‌’ या मानाच्या गणपतींसाठीही त्यांनी वादन केले आहे. शिवाय, गेल्या बऱ्याच वर्षांपासून कार्पोरेटमध्ये ढोलवादनाचे प्रशिक्षण त्या देतात. ‌‘टीएलसी‌’ नामक व्यावसायिकांच्या संघटनेच्या पूर्ण टीमलाही त्या वादन शिकवतात. त्यांच्यासाठी अमी यांनी बरेच कार्यशाळा गेल्या सहा-सात वर्षांत घेतले आहेत, त्याचबरोबर महिला, व्यावसायिक, बँकरसाठी अजूनही त्या कार्यशाळा घेत आहेत. अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून हार्दिक शुभेच्छा.

- विराम गांगुर्डे