फुलपाखरांचा पाठीराखा...

    13-Nov-2025   
Total Views |
Nitin Sridhar Kavathankar
 
जगासमोर सिंधुदुर्गातील फुलपाखरांचे विश्व उलगडणाऱ्या नितीन श्रीधर कवठणकर याच्याविषयी...
 
सिंधुदुर्गातील फुलपाखरांच्या मागे धावणारा हा मुलगा. वनस्पती आणि फुलपाखरांचा सहसंबंध उलगडणारा. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण टिपून त्यांच्या जीवनचक्राची नोंद करणारा. मालवणी जीवनशैलीतील निसर्गाची सांगड मांडणारा. सिंधुदुर्गातील निसर्गाशी एकरुप होऊन तिथल्या मातीमध्येच राहून निसर्गासाठी काम करणारा हा मुलगा म्हणजे नितीन श्रीधर कवठणकर.
 
नितीनचा जन्म दि. 31 जुलै 1999 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात झाला. वेंगुर्ला तालुक्यातील पाल हे छोटेसे गाव. या गावातील शेतकरी कुटुंबाच्या घरातील नितीनचा जन्म. या गावातीलच अणसूर-पाल हायस्कूलमध्ये त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. निसर्गाच्या सान्निध्यातच वाढल्यामुळे नितीनला निसर्गाविषयी ओढ निर्माण होणे साहजिकच होते. काही वेळा फुलपाखरे त्यांचे लक्ष वेधायचे, तर कधी झाडांच्या पानांची सळसळ त्याला रुंजी घाले. यामुळे मालवणी जीवनशैलीबद्दलचे कुतूहल आणि आवड त्याच्या मनात दाटू लागली. त्याचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे वेंगुर्ल्यातीलच बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात झाले. विज्ञान शाखेतील ‌‘रसायनशास्त्र‌’ या विषयातील पदवीचे शिक्षणदेखील इथूनच झाले. मात्र, याच शिक्षणादरम्यान त्याला खऱ्या अर्थाने निसर्गाची वाट गवसली आणि त्या वाटेची ओढ निर्माण झाली.
 
नितीन 2018 साली पदवीच्या शिक्षणाच्या दुसऱ्या वर्षाला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणथळ जागांचे सर्वेक्षण सुरू होते. जिल्हा प्रशासन आणि ‌’सिंधुदुर्ग वेटलॅण्ड ब्रीफ डॉक्युमेंटेशन कमिटी‌’च्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येत होते. या सर्वेक्षणामध्ये पाणथळ जागांमधील वनस्पतींचे सर्वेक्षण करण्याची संधी होती. नितीनने ही संधी हेरून त्याठिकाणी कामाला सुरुवात केली. वेंगुर्ला तालुक्यातील जवळपास दहा पाणथळ जागा फिरून त्याला वनस्पतींचे बारकाईने सर्वेक्षण करायचे होते. यामध्ये त्याला मार्गदर्शन मिळाले, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापिका डॉ. धनश्री पाटील आणि ‌‘सिंधुदुर्ग पाणथळ समिती‌’मधील तज्ज्ञ मंडळींचे. या काळातच नितीनला वनस्पतींची नव्याने ओळख गवसली. वनस्पतींची शास्त्रीय आणि वगकरणाच्या अनुषंगाने आवश्यक असलेली माहिती अवगत झाली. पाणथळ जागांची जैवसमृद्धी उमगली. वनस्पतींचे हे सर्वेक्षण त्याने यशस्वीरित्या पूर्ण केले. या कामासाठी कुडाळ येथे पार पडलेल्या ‌‘पाणथळ संवाद‌’ या कार्यक्रमात त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
 
या कामानंतर नितीनने मुंबईतील ‌‘दि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स‌’ येथून ‌‘विलेषणात्मक रसायनशास्त्र‌’ या विषयामधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मात्र, हा संपूर्ण काळ ‌‘कोविड‌’चा असल्याने त्यातील बऱ्याच कालावधीचे शिक्षण ऑनलाईन स्वरुपात झाले. दरम्यानच्या काळात नितीन समाजमाध्यमांमुळे फुलपाखरांच्या प्रेमात पडला. लोक एरव्ही निसर्गात फिरून फुलपाखरांच्या प्रेमात पडतात. मात्र, नितीनच्या बाबतीत उलटे झाले. समाजमाध्यमांवरील फुलपाखरांसंबंधीच्या ग्रुपच्या माध्यमातून त्याला फुलपाखरे उमगू लागली. वनस्पतींची आवड त्याला होतीच. त्यामुळे वनस्पती आणि फुलपाखरे यांचा एकमेकांशी असलेले सहसंबंध या दृष्टीने तो फुलपाखरांचे निरीक्षण करू लागला. त्यांचे जीवनचक्र मोबाईल कॅमेराने टिपू लागला. 2023 साली त्याला भारतामधील आघाडीचे फुलपाखरू संशोधक डॉ. कृष्णमेघ कुंटे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत काम करण्याची संधी मिळाली. ही संधी हेरून त्याने कामाला सुरुवात केली. यामध्ये नितीनने ‌‘इंडियन फाऊंडेशन फॉर बटरफ्लाय्स‌’ (www.ifoundbutterflies.org) या संकेतस्थळासाठी भारतातील फुलपाखरांच्या खाद्य वनस्पतींच्या नोंदी अद्ययावत करण्याचे काम केले. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमधील फुलपाखरू संशोधन कार्यातही त्याने सहभाग नोंदवला.
 
नितीन आता सिंधुदुर्गात परतला असून त्याला फुलपाखरू संशोधन आणि संवर्धन क्षेत्रात काम करायचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फुलपाखरांचे तो बारकाईने निरीक्षण टिपत आहे. या निरीक्षणाच्या माध्यमातूनच ‌‘लार्ज फोर-लाईनब्लू‌’ या फुलपाखराची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नोंद त्याने केली आहे. याखेरीज, त्याने या फुलपाखराचे जीवनचक्रही टिपले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतातील या फुलपाखराच्या जीवनचक्राच्या नोंदीचे हे पहिलेचे दस्तऐवजीकरण आहे. नितीनने आजवर फुलपाखरांच्या जवळपास 80 प्रजातींच्या जीवनचक्राची छायाचित्रित नोंद केली आहे. सध्या तो सिंधुदुर्गातील ‌‘फुलपाखरांचे गाव‌’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पारपोली या गावात ‌‘नॅचरलिस्ट‌’ म्हणून काम करत आहे. ‌‘नेचर कॉन्झर्वेशन फाऊंडेशन‌’च्या माध्यमातून सिंधुदुर्गात सुरू असलेल्या अधिवास पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पामध्येही त्याने काम केले आहे. त्याला यापुढे ‌‘वनस्पती आणि फुलपाखरांचे सहसंबंध‌’ या विषयामध्येच काम करायचे आहे. नितीनला पुढील वाटचालीकरिता दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून शुभेच्छा!
 
 

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.