प्रेरणादायी अग्निशिखा

Total Views |

लहानपणापासूनच अत्यंत महत्त्वाकांक्षी, अपार मेहनत आणि जिज्ञासूपणे आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवत ‌‘इस्रो‌’मध्ये संशोधक आणि शास्त्रज्ञ पदापर्यंत झेप घेणाऱ्या सुजाता मडके यांच्याविषयी...

ठाणे जिल्ह्यातील शिरगाव जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीचे, शाळेतील एका छोट्या कपाटाकडे कायमच लक्ष असे. या कपाटात तिच्या जीवनाला दिशा देऊ शकणारी असंख्य पुस्तके ठेवलेली असतं. त्या शाळेतील मुलांसाठी हे कपाट हेच ग्रंथालय होते. शाळेतील असंख्य मुलांमधल्या त्या एक विद्यार्थिनीच्या हाती या कपाटातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे ‌‘अग्निपंख‌’ हे पुस्तक पडले. ते पुस्तक त्या विद्यार्थिनीने मोठ्या उत्सुकाने वाचून काढले. त्या पुस्तकात अब्दुल कलाम यांनी म्हटले होते की, “छोटी ध्येये बघणे हा गुन्हा आहे.” म्हणजेच तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीमधून येता आणि तुम्हाला काय करायचं, हे तुमची परिस्थिती ठरवू शकत नाही. तुम्ही स्वतः किती मेहनत घ्यायला तयार आहात, त्यावरूनच ते ठरते. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा हा संदेश लक्षात ठेवत ‌‘इस्रो‌’मध्ये संशोधक म्हणून आपले स्थान पक्के करणारी ती तरुणी म्हणजे, सुजाता रामचंद्र मडके!

सुजाता यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण शिरगाव या छोट्या गावातील, जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शहापूरातील कवी खाडे विद्यालय येथे झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुजाता यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. शालेय शिक्षणातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. बारावीपर्यंतचे शिक्षण बिर्ला महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर, सुजाता यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याचे निश्चित करुनम्, प्रवेश घेतला. ‌‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी, लोणारे‌’ याठिकाणी. सुजाता यांना ‌‘मेकॅनिकल अभियांत्रिकी‌’ शाखेमध्ये प्रवेश मिळाला. मग पुढील साधारण चार वर्षे सुजाता यांनी पदवीचा अभ्यास केला. पुढे सन 200 7 मध्ये त्यांनी मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये ‌‘बी.टेक‌’ पदवी संपादन केली. या शिक्षणकाळातही सुजाता यांनी, त्यांचे शैक्षणिक प्राविण्य सिद्ध केले. अभियांत्रिकी पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच, सुजाता स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास करू लागल्या. ‌‘गेट‌’, रेल्वे, ‌‘बार्क‌’, ‌‘इस्रो‌’ आणि अशा अनेक स्पर्धा-परीक्षा देण्याचा सपाटाच त्यांनी लावला. दरम्यान ‌‘गेट‌’ परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे सुजाता यांना, ‌‘आयआयटी खडकपूर‌’ येथे, रिसर्च इंजिनिअर म्हणून वर्कशॉप प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली.  सुजाता इथेही कामातून काहीसा वेळ काढून अभ्यास करतच होत्या. काम कितीही असले तरीही, अभ्यासात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. याचवेळी ‌‘एएमव्हीआयची‌’ जाहिरात त्यांच्या वाचनाता आली.

सुजाता यांनी ही परीक्षा दिली आणि त्यांची निवडही झाली. खडकपूरवरून सुजाता थेट ठाण्यामध्ये असिस्टंट मोटर व्हेईकल इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाल्या. तिथेही सुजाता यांनी त्यांचा अभ्यास सुरुच ठेवला. पहाटे उठून, प्रवासात ट्रेनमध्ये, ऑफिसमध्ये जेवणाच्या सुटीत आणि घरी आल्यावर परत 11-12 वाजेपर्यंत आणि शनिवार, रविवार सुटीचा दिवस, अशा रितीने वेळ मिळेल तेव्हा सुजाता यांनी अभ्यास केला. त्यांचा अभ्यास पाहता प्रखर इच्छाशक्ती, आत्मविश्वास, आणि सातत्याने प्रगती करण्याची जिद्द या गुणांनी सुजाता यांचे व्यक्तीमत्व सजलेलं आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कठोर परिश्रम आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरच सुजाता यांनी ‌‘इस्रो‌’मध्ये सायंटिस्ट इंजिनिअर म्हणून रुजू होत, त्यांना अपेक्षित यश प्राप्त केले.

सुजाता ‌‘इस्रो‌’च्या ज्या विभागात रुजू झाल्या, त्या विभागात नव्याने तयार होणाऱ्या सॅटेलाईटचा दर्जा तपासण्याची जबाबदारी सुजाता यांच्याकडे देण्यात आली आहे. तरुणांना प्रेरणादायी संदेश देताना सुजाता सांगतात की , “आपण ‌‘मेड इन इंडिया‌’ म्हणून खूप काही करू शकतो. आज आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी भारतामध्ये कशा करता येतील, यावरच भर द्यायचा आहे. तरुणांना मी हेच सांगेन की, स्वप्न बघायला घाबरायचे नाही. नंतर ते सत्यात उतरेल की नाही याचा आपण विचार करण्यापेक्षा, आपल्या परिस्थितीनुसार आपण 100 टक्के प्रयत्न कसे करू शकतो, याकडे लक्ष द्यायला पाहिजे.” तसेच साधनांच्या उपलब्धतेविषयी बोलताना सुजाता सांगतात की, ”विशेष म्हणजे आता युट्यूब आहे किंवा अन्य डिजिटल रिसोर्सेस आहेत. अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत. आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी आता सहज उपलब्ध आहेत. जर तुम्ही मेहनत घ्यायला तयार असाल, तर साधने 100 टक्के आहेत. वेळेचे योग्य व्यवस्थापन करून प्रामाणिक प्रयत्न केले, तर तुम्हाला यश नक्की मिळेल.”

सुजाता यांची संवादकौशल्ये आणि वक्तृत्वशैलीही विशेष उल्लेखनीय आहे. 2014-15 मध्ये भारत सरकारच्या संसदीय व्यवहार मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेतही, त्यांनी प्रथम क्रमांक पटकवाला होता. ‌‘अग्निशिखा‌’ हा शब्द सुजाता मडके यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सारांश आहे. एक तेजस्वी, प्रेरक आणि धैर्याने उभे राहणारी अशी स्त्री, जिने आपल्या ज्ञानाने आणि आत्मविश्वासाने आसपासच्या जगाला प्रकाशमान केले आहे. सुजाता आजच्या ‌‘झेन-जी‌’ पिढीतील अशा अभियंता तरुणींपैकीच एक आहेत, ज्या तंत्रज्ञान, नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारी या तिन्ही क्षेत्रांचा सुंदर संगम साधतात. सातत्याने शिकण्याची आणि नवसृजनाच्या त्यांच्या वृत्तीमुळेच, त्यांनी हे यश संपादन केले आहे. सुजाता यांचे हे यश भविष्यातील नवकल्पनांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सुजाता मडके यांना पुढील यशस्वी प्रवासासाठी, दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्या अनेकानेक शुभेछा!

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.