आत्मनिर्भरतेची दिशा देणारे गणेश

    14-Nov-2025
Total Views |
Ganesha Gundami
 
व्यवसायाचे तंत्र अवगत झाले की आत्मनिर्भरतेचा प्रवास सुकर होतो. असाच प्रेरक प्रवास असलेल्या गणेश गुंडमी यांच्याविषयी...
 
उच्च शिक्षण पूर्ण करून शहरातील चांगली नोकरी सोडून गोमय, पंचगव्यमधून चांगल्या प्रकारे अर्थार्जन करता येते. याचे उत्तम उदाहरण गणेश गुंडमी यांनी दाखवून दिले आहे. गोशाळेत विविध प्रकारच्या वस्तू बनवून त्याला बाजारपेठ मिळवून देण्याचे काम ते करत आहेत. गोपालक आणि त्यांच्या सहकार्‍यांना दिलासा देण्याचे कार्य करणार्‍या गणेश यांचा जन्म सोलापुरात झाला. त्यांचे शालेय आणि बारावीपर्यंतचे शिक्षणही सोलापुरातच झाले. पदव्युत्तर शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर त्यांना नोकरी करावी आणि करिअर घडवावे, असे ठरवले. मात्र, नोकरी करताना व्यवसायाची संधी खुणावत होती. असेच निरीक्षण आणि अभ्यास करीत असताना, त्यांना एका ठिकाणी शेळीपालन हा पर्यायी उद्योग होऊ शकतो, हे लक्षात आल्यावर त्यांनी शेळीपालनाकडे वळण्याचा विचार केला.
 
यासाठी त्यांनी दोन प्रशिक्षणही घेतले, अनेक शेळीपालन ठिकाणी भेटीदेखील दिल्या. याबाबतची आवश्यक आणि पूरक अशी माहिती करून घेतली; मात्र हे करीत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, जेव्हा शेळी आपण खाटिकांना विकतो, तेव्हाच त्यातून पैसा मिळतो. लहानपणापासून विवेकानंद केंद्राचे संस्कार त्यांच्यावर असल्यामुळे ही कल्पना तितकीशी त्यांना आवडली नाही. त्यावेळी गोमय उत्पादन गोआधारित उत्पादनाची निर्मिती याबाबत माहिती मिळाली.
 
गोमय उत्पादन हे पर्यायी नसून, मुख्य उत्पादन होऊ शकते, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी २०१९ मध्ये नोकरी सोडून तामिळनाडू येथे दीड वर्षाचा ‘पोस्ट ग्रॅज्युएशन इन पंचगव्य’चा कोर्स केला. या कोर्सनंतर चिकित्सा आणि गोमय उत्पादननिर्मिती ते करू लागले. नोकरी सोडल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत पूर्णपणे बंद झाला होता आणि पंचगव्यामधून हवे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. यामुळे किंचित त्रासदेखील त्यांना मधल्या काळात झाला होता. परंतु, ध्येयबोध झाल्यानंतर या गोष्टीचा आपल्याला जास्त त्रास होत नाही, हे मनाशी पक्के केल्यानंतर पुणे सोडून सोलापूरला ते स्थायिक झाले. सोलापूर हे त्यांचे मूळ गाव असल्यामुळे तसेच विवेकानंद केंद्रामुळे त्यांना हवे तसे वातावरण आणि प्रोत्साहन येथे मिळत गेले.
 
परमेश्वर नेहमी पहिल्यांदा परीक्षा घेतो, त्याच पद्धतीने त्यांची परीक्षा झाली. नोकरी सोडून नवीन क्षेत्र निवडले आणि त्याचवेळी ‘कोरोना’ सुरू झाला. या समस्येचे रूपांतर संधीमध्ये परिवर्तन करून घेतल्याने त्यांनी ही संधी साधली. गोर्‍या, पणती, तूप, गोमय माळा, गोमय गणपती, गोमय लक्ष्मी पादुका असे गायीच्या शेणापासून तब्बल १५ प्रकारच्या वस्तू त्यांनी विक्रीसाठी आणल्या. ‘कोरोना’मध्ये याच सेंद्रीय वस्तू सर्वांना लागत होत्या. ‘लॉकडाऊन’मध्ये जेव्हा दोन-तीन तासांची खरेदीसाठी वेळ असायची, तेव्हा या वस्तू सर्वांपर्यंत नेमाने ते पोहोचवत होते. तेव्हा त्यांनी दिवसाला २० किमीपर्यंत त्यांनी दुचाकीवरून प्रवास केला आहे आणि येथूनच मग त्यांच्या व्यवसायाला गती मिळत गेली.
 
आज त्यांच्या गोशाळेत गायीच्या शेणापासून पणती, गोमय लक्ष्मी पादुका, गोवर्‍या, गोमय माळा, गोमूत्र अर्क, गांडूळ खत, वॉल हँगिंग, तोरण सांभरानी कप आणि धूपबत्ती अशा वस्तू गायीच्या शेणापासून वस्तू बनतात. अनेकजण गोशाळा चालवणारे दुधाला महत्त्व देतात. परंतु, ते त्यांच्या गोशाळेत गायीचे शेण आणि गोमूत्र याला महत्त्व देतात. दूध हे त्यांच्यासाठी ‘बायप्रॉडट’ आहे. आता पाच वर्षांनंतर ते व्यवसायात स्थिर झाले आहेत. वर्षभर गोमय गणपतीचे काम सुरू असते. यामध्ये अडीच इंचांपासून ते दीड फुटांपर्यंत गायीच्या शेणापासून मूर्ती बनवणे, हे काम त्यांचे वर्षभर सुरू असते. त्यातून अनेकांना रोजगार मिळत आहे.
 
सध्या सर्व वस्तू मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरु या ठिकाणी जात आहेत. येत्या काही काळात परदेशात वस्तू जाणार आहेत. याची सर्व कागदपत्र पूर्तता होत आहे. दिवाळीमध्ये गोमय किट बनवले. यामध्ये गोमय पणती, धूपबत्ती, साबण, अभ्यंग तेल, उटणे, लक्ष्मी चरण पादुका या वस्तू असतात. या किटला मोठ्या प्रमाणात मागणी दरवर्षी असते.
 
यासाठी ‘गिरिधर पंचगव्य केंद्र’ स्थापन केले आहे. येत्या काही महिन्यात त्यांचे स्वतंत्र उत्पादन केंद्र उभे राहणार आहे. जसजसे लोक आधुनिकतेकडे वळत आहेत, त्याच पद्धतीने त्यांना सेंद्रीय गोष्टींची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. सध्या इतर गोशाळा त्यांनी चालवायला घेतल्या आहेत. तसेच विविध शहरांत ते गोव्यवस्थापन, संगोपन याचे प्रशिक्षण घेतात. अनेक परदेशी नागरिक याठिकाणी भेट देऊन गेले आहेत. त्यांनी गोविज्ञान शाळेचा नमुना तयार केला आहे. गोमय आणि पंचगव्य क्षेत्रात विविध प्रयोग करणार्‍या गणेश यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
 
- अतुल तांदळीकर