आजच्या काळातील परीक्षाकेंद्री विद्यार्थ्यांना विषयाची गोडी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी असते ती शिक्षकांची. असे शेकडो शिक्षक घडवणार्या प्रशिक्षिका तरंगिणी खोत यांच्याविषयी...
शिक्षक होणं म्हणजे फक्त शिकवणं नाही, तर शेकडो विद्यार्थी घडवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते. शिक्षकाचे विषयाचे ज्ञान, त्यावरचे प्रेम त्यांची कळकळसुद्धा विद्यार्थ्यांना प्रभावित करते. केवळ परीक्षाकेंद्री न होता, त्यांना विषयाची गोडी लागणेदेखील शिक्षकाच्याच हाती,” असा मोलाचा सल्ला देतात, ‘संस्कृत शिक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या संचालिका तरंगिणी खोत.
तरंगिणी या ज्येष्ठ नाटककार प्रभाकर पणशीकर यांच्या कन्या. वडील नाट्यक्षेत्रात असले, तरी पणशीकर कुटुंब खरे तर संस्कृतप्रेमीच! तरंगिणी यांचे पणजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर हे संस्कृतचे प्रकांडपंडित होते. त्यांचे काकासुद्धा संस्कृत साहित्याचे पंडित होते. तरंगिणी यांचे वडील नाटकानिमित्त अधिकतर दौर्यावरच असल्यामुळे तरंगिणी यांच्यावर त्यांचे काका दाजीशास्त्री पणशीकरांचाच अधिक प्रभाव. इयत्ता आठवीत त्यांनी संस्कृत विषय निवडला, तोही आपल्या काकांच्याच मार्गदर्शनाने. तेव्हा काकांनी त्यांना जाणीव करून दिली की, "संस्कृत हा आपल्यासाठी फक्त एक विषय नसून ती आपल्या घराण्याची परंपरा आहे, ती जोपासणं, ही आपली जबाबदारी आहे!”
शाळेत शिकताना त्यांना संस्कृत श्लोकांबद्दल आकर्षण वाटले. पाठांतर आवडू लागले. महाविद्यालयातही संस्कृत शिकल्या; परंतु फक्त भाषांतर, रसग्रहणच केले जात असे. त्यांनी तोपर्यंत कोणालाही संस्कृतमध्ये बोलताना ऐकले नव्हते. तेव्हाच ‘संस्कृतभारती’च्या दहा दिवसांच्या शिबिरात भाग घेण्याची संधी मिळाली. याच शिबिरात त्यांना संस्कृत भाषेचे उच्चारानुसार ध्वनि असणे, हे वैशिष्ट्य सोदाहरण समजले आणि तरंगिणी यांच्या मनात संस्कृतबद्दल अधिकच उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर लगेचच, बेळगावला ‘संस्कृतभारती’चे ‘शिक्षक प्रशिक्षण शिबीर’ होते. त्यासाठी मुंबईहून तरंगिणी यांची निवड झाली. तेथे त्यांना एक महिना चमुकृष्णशास्त्री आणि अन्य मान्यवर संस्कृतपंडितांचे मार्गदर्शन लाभले. तेव्हा तरंगिणी पदवीचे शिक्षण घेत होत्या. त्या काळात मुंबईतील ‘रुईया’ महाविद्यालयात विद्यार्थ्यांअभावी तृतीय वर्षाला संस्कृत विषय मिळत नव्हता. तरीही आग्रहाने, हट्टाने आणि अर्थातच प्राध्यापकांच्या पाठिंब्याने त्यांनी ‘रुईया’तच पदवी संपादन केली. तरंगिणी यांच्या कुटुंबजनांसह, त्यांना शाळा, महाविद्यालय, संभाषण वर्ग अशा विविध टप्प्यांवर भेटलेल्या डॉ. बा. रा. दीक्षित आणि डॉ. रं. रा. देशपांडे इ. प्रत्येक शिक्षकाचा त्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे.
तरंगिणी यांनी जरी ‘वेदांत’ विषयात ‘एमए’ केले असले, तरी त्यांना संस्कृत व्याकरण आणि संभाषण, संस्कृतचा प्रचार-प्रसार करणेच मनापासून आवडत होते. ‘एमए’नंतर काही वर्षे त्यांनी ‘रुईया’मध्येच अध्यापनही केले. त्यांची शाळा ‘आयईएस’चे त्याच काळात रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करायचे होते. त्या कार्यक्रमात तरंगिणी यांच्या कल्पनेने संस्कृत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली गेली. त्यापासून सुरुवात करत पुढे असे असंख्य छोटे-मोठे उपक्रम त्या करत राहिल्या. त्यातूनच त्यांनी ‘संस्कृत केंद्रा’ची मुहूर्तमेढ रोवली आणि ते कार्य त्या आज ३२ वर्षे निरंतर करत आहेत. त्याअंतर्गत दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये ‘शिक्षक प्रशिक्षण वर्गा’चे आयोजन केले जाते. त्यात ‘बीएड’ची अट न ठेवता कोणाही सामान्य व्यक्तीला शिबिरात प्रवेश घेता येतो. कालांतराने त्याच वर्गातून शिकलेले त्यांचे विद्यार्थी तेथे शिक्षक म्हणून येऊ लागले. तेव्हा खर्या अर्थाने एक पिढी घडवल्याचे समाधान तरंगिणी यांना लाभले. तरंगिणी यांनी आपल्या पणजोबांच्या स्मरणार्थ ‘महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठान’ची स्थापना केली. संस्थेतर्फे संस्कृतमधील गेय शब्दकोश ‘अमरकोश’चा पाठांतराच्या स्पर्धांच्या माध्यमातून प्रसार केला.
पुढे त्यांनी ‘बालभारती’च्या संस्कृत पाठ्यपुस्तकांच्या संपादक मंडळात तज्ज्ञ सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच त्यांनी ‘चांदोबा’ मासिकाचा संस्कृतानुवाद ‘चंदमामा’चेदेखील संपादनकार्य केले. त्या ‘समर्पणम्’ वार्षिकांकासाठी लिखाण करतात. अलीकडे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांकडून तांत्रिक गोष्टी शिकून घेत ‘फेसबुक’वर ‘अमरकोश’संबंधी ‘अमरसरणी’नामक मालिकासुद्धा चालवली. तरंगिणी यांना त्यांच्या कार्यासाठी संस्कृत भाषेच्या प्रचार व प्रसार क्षेत्रातील कार्याच्या गौरवार्थ ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ यांचा ‘पहिला संस्कृत भाषा प्रसार पुरस्कार’ आणि महाराष्ट्र राज्य शासनाचा ‘महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कारा’नेसुद्धा गौरवण्यात आले आहे.
तरंगिणी यांनी आपण स्वतः शिक्षिका होण्यासोबतच शिक्षक घडवणारी शिक्षिका होण्याचे सामान्यांपेक्षा वेगळे स्वप्न पाहून साकारसुद्धा केले. त्यांना स्वच्छंदीपणे आपल्या वेळेनुसार शिकवण्या घेणे, इतर काही प्रदर्शने भरवणे, एखाद्या कार्यशाळेचे आयोजन करणे, अशी चौकटीबाहेरची कामे अधिक आकर्षित करतात. तरंगिणी खोत यांच्याकडून विविध माध्यमांतून संस्कृतचा प्रचार-प्रसार निरंतर होत राहो, या दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
- ओवी लेले