संघर्षमयी जीवनातून धडे घेत केवळ आपल्या पायावर यशस्वीरित्या उभे न राहता, इतरांचेही अर्थसाक्षरतेतून आयुष्य उजळविणार्या रोशन राऊत यांच्याविषयी...
रोशन राऊत यांच्या जीवनात एक काळ असा होता की, त्यांनी दुपारी आईला विचारले की, "आई, आज जेवायला काय आहे?” त्यावेळी आईने "काहीच नाही” असे उत्तर दिले. पोटात अन्नाचा कण नाही. पण, अशाप्रकारे रोशन यांना आपल्या जीवनप्रवासात कित्येक अनपेक्षित, कठोर प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण, तरीही ते खचले नाही. आज तेच रोशन, स्वतःसोबतच इतरांनाही "आयुष्यात सतत काम करीत राहा,” असा सकारात्मक संदेश देतात.
नागपूरमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत असतानाच रोशन यांना वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन करावा लागला. पाठी पाच भाऊ आणि दोन बहिणी असा मोठा परिवार. मात्र, रोशन यांनी तेव्हापासूनच निर्धार केला की, मागे हटायचे नाही. मूळचे गोंदियाचे असलेले हे कुटुंब मध्य प्रदेशात स्थायिक असले, तरी उदरनिर्वासाठी त्यांना नागपुरातच यावे लागे. पुढे पदवी शिक्षणानंतर रोशन नागपुरात नोकरीचा शोध घेत सावजी हॉटेलमध्ये ७०० रुपये मासिक वेतनावर वेटर म्हणून कामाला लागले. त्यानंतर गाठीशी असलेला अनुभव आणि शोधात असलेल्या संधीचे सोने करीत, त्यांनी उडपी, चायनीज आणि गार्डन हॉटेलमध्ये पडेल ते काम केले.
दिवसेंदिवस कष्ट वाढतच होते, पण त्या तुलनेत पगार मात्र तुटपुंजाच होता. तो जेमतेम १ हजार, ७०० झाला. नंतर तेथीलच एका मित्राच्या सांगण्यावरून नाशिक येथे नवे हॉटेल सुरू होणार, म्हणून रोशन पहिल्यांदा घराबाहेर पडले. नाशिकला २००६ साली त्या हॉटेलमध्ये काम मिळाल्यानंतर तीन हजार वेतन मिळू लागले. त्यानंतर मग त्यांनी पुणे गाठले आणि आपल्या कौशल्याचा उपयोग करीत हॉटेलमध्ये नऊ हजार ते १२ हजार मासिक वेतन आणि मग पुढे अगदी मॅनेजरपदापर्यंत बढतीचा यशस्वी प्रवास केला. तथापि, त्यांच्या आयुष्यात एक ‘टर्निंग पॉईंट’ आला आणि जीवनविमा परीक्षा दिल्यावर १५ वर्षांचा प्रवास, संघर्ष असलेला हॉटेलप्रवास त्यागून त्यांनी २०१२ नंतर या विमाक्षेत्रात आपले पाय रोवले.
आज त्यांच्या घरातील पहिली दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदी करणारे म्हणून रोशन कौतुकास पात्र ठरले आहेत. मुंबईचे कायमच स्वप्न पाहणार्या रोशन यांना नंतर प्रशिक्षणासाठी दर महिन्याला मुंबईला भेट देण्याचीही संधी मिळाली. एकदा तर दुबई प्रवासाचाही योग आला. ही सगळी आत्मनिर्भरता आणि कौशल्य विकासाची कमाल असल्याचे ते आवर्जून सांगतात. एकेकाळी पै अन् पैसाठी संघर्ष करणारे रोशन आता पैसे कमावल्यानंतर पैसे नेमके कुठे आणि कसे गुंतवावे, याबाबत मार्गदर्शन करतात आणि त्यांचेदेखील आर्थिक जीवन समृद्ध करीत आहेत. गुंतवणूक या विषयावर रोशन अखंड जनजागृती करतात. यासाठी त्यांनी संभाषण कलाही आत्मसात केली. ओळखीही वाढत गेल्या.
अनेकांना आर्थिक विषयांबाबत जागरुकता नसल्यामुळे आयुष्यात स्थैर्य लाभत नाही. ही बाब लक्षात घेता, समाजासाठी आपण याबाबत काहीतरी करायला हवे, असे रोशन यांचा निश्चय झाला. परंतु, नेमके काय करावे, हे त्यांना कळत नव्हते. मग रोशन यांनी विविध गावांमध्ये जाऊन तेथील नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यास सुरुवात केली. हे करताना नागरिकांमध्ये आर्थिक बाबतीत साक्षरता नसल्याचे दिसून आले आणि मग आर्थिक साक्षरता निर्माण करण्याचा मार्ग रोशन यांना दिसला आणि त्यादिशेने त्यांचे काम सुरू झाले. खेडेगावात, वाड्या-वस्त्यांमध्ये नागरिकांमध्ये आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक आणि बचत यांबाबत जागरूकता नसते. खेडेगावात नागरिक दुग्धव्यवसाय, शेती यातून अर्थार्जन करतात. शिक्षण नसल्याने आर्थिक साक्षरता, बचत, आर्थिक स्थैर्य हे शब्द त्यांच्या गावीही नसतात. काम करत असताना काही वेळा अपमानाचे प्रसंगदेखील आले. परंतु, यातून खचून न जाता आपण काम करत राहिले पाहिजे. आपण काय करतोय, हे कधीतरी समाजाला समजेल, यावर ठाम राहत रोशन यांनी काम सुरूच ठेवले.
गावातील नागरिकांना त्यांच्याच भाषेत सांगितले तर विषय समजतो, हे लक्षात आल्यावर शेतकरी, छोटे उद्योजक, नवीन उद्योजकांना आर्थिक साक्षरतेसाठी त्यांनी प्रोत्साहित केले. आर्थिक जोखीम आणि आर्थिक स्थैर्य यातील फरक समजून सांगायला सुरुवात केली. आर्थिक विमा, आरोग्य विमा याचे महत्त्व सांगून आर्थिक स्थैर्य प्राप्तीसाठी नेमके काय करावे आणि काय करू नये, याबाबत मार्गदर्शन ते करतात. पुणे, मुंबई ते अगदी दुबईपर्यंत शेकडो उद्योजकांना रोशन यांनी अर्थसाक्षर केले आहे. गुंतवणुकीसाठी कंपनी कशी निवडायची, फसवणूक होण्यापासून कसे सावध राहायचे, याचे प्रशिक्षण देण्याचे मोफत काम ते करतात.
या कामासोबत रोशन यांना व्यायामाचीही तितकीच आवड. समोरच्याला तंदुरुस्त राहण्याचा सल्ला देण्याचे ते कधीच विसरत नाहीत. त्यांच्या आर्थिक क्षेत्रातील भरीव कार्यासाठी अनेक कंपन्यांनी गौरविले आहे, तर खेडेगावात किंवा छोट्या भागांत चर्चासत्रात किंवा मार्गदर्शन सत्रात अनेक कंपन्या त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करतात. "आर्थिक स्थैर्य आणि आर्थिक बचत यातील फरक नागरिकांना कळत नाही. बचत केलेला पैसा भविष्यात कसा उपयोगी आणायचा, या विषयावर काम करण्यासाठी खूप संधी आहेत,” असे रोशन सांगतात. खेडेगावातील प्रत्येक शेतकरी अर्थसाक्षर झाला पाहिजे, हीच त्यांची इच्छा. यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने त्यांना अनेकानेक शुभेच्छा.