सातपाटीची सेवाव्रती...

    06-Nov-2025   
Total Views |
Sujata Pagdhare
 
समाजबंधनांवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांच्या कथा या सर्वार्थाने प्रेरणादीप. सुजाता पागधरे या त्याच पुष्पमालेतील एक पुष्प. त्यांच्या संघर्षमय जीवनाचा हा आढावा...
 
अरबी समुद्राच्या किनारी असलेल्या महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे किनारपट्टीवरील मच्छीमारांचे गाव. याच गावात सुजाता एकनाथ पागधरे यांचा जन्म झाला. आईवडील, चार बहिणी असे त्यांचे कुटुंब. सुजाता यांचे बालपण अत्यंत संघर्षमय अशा स्वरूपात गेले. घरची परिस्थितीतसुद्धा हलाखीचीच. सुजाता यांना शिक्षणाची प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांनी शिक्षणाबरोबर जमेल ते काम करायचं, असा पक्का निर्धार केला होता. त्यांनी ‌‘बी.कॉम‌’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ‌‘जीडीसीएमए‌’ची पदवीसुद्धा प्राप्त केली आहे.
 
असे म्हणतात की, प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचे अविरत प्रयत्न, संघर्ष आणि स्वतःवरचा अढळ विश्वासही दडलेला असतो. संकटे आली तरी न डगमगणारी, कष्टातून स्वतःचा मार्ग शोधणारी हीच खरी संघर्षशील महिला असते. समाजबंधनांवर मात करून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रियांच्या कथा आज प्रेरणेचा दीप बनल्या आहेत. सुजाता या त्याच पुष्पमालेतील एक पुष्प आहेत, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. मासेविक्री असो किंवा फुलविक्री, सुजाता यांनी आपल्या जीवनातले प्रारंभीचे दिवस अत्यंत कष्टाने घालवले आहेत. हे सर्व काम करत असताना त्यांनी शिक्षणामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही.
 
संघर्ष करणाऱ्या स्त्रिया फक्त आपलं नाही, तर पुढच्या पिढ्यांचं भविष्यदेखील उजळवतात. कष्ट तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो, पण त्यातून उमलणारे तिचे स्मितहास्य हीच खरी तिची ताकद असते. कालांतराने सुजाता ‌‘सातपाटी ग्रामविकास (बिगर शेती) सहकारी पतसंस्थे‌’च्या संपर्कात आल्या. तिथे त्यांनी नोकरीला सुरुवात केली. एकीकडे नोकरी आणि दुसरीकडे शिक्षण, अशी तारेवरची कसरत सुरूच होती. विशेष म्हणजे, सामाजिक कार्याची त्यांना सुरुवातीपासूनच आवड होती. योगायोग म्हणजे ‌‘सातपाटी ग्रामविकास सहकारी पतसंस्था मर्यादित‌’चे अध्यक्ष अनंत म्हात्रे यांनाही समाजसेवेची आवड असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुजातासुद्धा अनेक समाजकार्यांत सक्रिय होऊ लागल्या.
 
कालांतराने ‌‘मच्छीमार समाज उन्नती संस्था‌’ असेल किंवा ‌‘सातपाटी मांगेला समाज उन्नती संघ‌’ असेल, अशा विविध सामाजिक संस्थांच्या त्या संपर्कात आल्या. ‌‘मांगेला समाज उन्नती संघा‌’चे संस्थापक राशी पाटील यांनी सुजाता यांना संस्थेच्या कार्यकारिणीवर घेतले होते. ‌‘श्रीराम मंदिर संस्थान कमिटी‌’वरसुद्धा सुजाता कार्यरत आहेत.
 
हळूहळू सातपाटीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम होऊ लागले. गर्भवती महिलांसाठी औषधवाटप, आरोग्य शिबीर, शाळांमध्ये शौचालय आणि बोअरवेल, रंगमंच नूतनीकरण, आजीआजोबा उद्यान, वृक्षारोपण मोहीम, गावांसाठी रुग्णवाहिका इ. असे विविध स्वरूपाचे उपक्रम सुजाता यांच्या नेतृत्वात संपन्न होऊ लागले. आसपासच्या गावातील प्रत्येक वर्गापर्यंत सेवा यामार्फत पोहोचू लागली.
 
सुजाता सांगतात, आठ वर्षांपूव सातपाटीमध्ये श्राफ मैदानावरून वाद निर्माण झाला होता आणि त्यामध्ये एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी कारण नसतानाही त्यांना लक्ष्य करत, श्रीराम मंदिर संस्थांवर झालेली निवड बेकायदेशीररित्या रद्द केली. का, तर एक महिलेच्या नेतृत्वात गावात सेवाकार्य आणि विकास होत आहे म्हणून! गावातल्या राजकीय प्रतिनिधींचा सामाजिक संस्थांकडे बघण्याचा दृष्टिकोनही तेव्हा फारसा चांगला नव्हता. मध्यंतरी सातपाटी गावच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा विचार होता. सातपाटी पतसंस्थेच्या माध्यमातून तो पुतळा उभारण्यात येणार होता. मात्र, काही राजकीय लोकांनी त्यालाही विरोध करत मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला.
 
सुजाता मात्र खचल्या नाहीत, त्यांनी विविध प्रकारे आपले सामाजिक कार्य सुरूच ठेवले. त्यांनी सुरू केलेल्या रुग्णवाहिकेच्या सेवेचा फायदा अनेकांना झाला आहे. विरोध करणाऱ्यांनी विरोध केलाच, मात्र गावकऱ्यांना मिळणारा त्याचा लाभ आणि रुग्णांना मिळणारे जीवनदान यामुळे सुजाता यांना अशा विरोधाकडे सपशेल दुर्लक्ष केले. गावातील लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत अनेकांना याचा फायदा झाला आहे. विरोधाला न जुमानता कार्य करणे हे केवळ धैर्य नव्हे, तर एक प्रकारचं व्रत असतं. अशी निभड स्त्री समाजात बदल घडवते, कारण ती भीतीला नव्हे, तर सत्याला मान देते. तिच्यावर टीका होते, अफवा उठतात, परंतु ती स्त्री जाणून असते की, समाजाचं कल्याण हे स्तुतीपेक्षा कृतीत आहे. म्हणूनच ती पुढे सरकते. लोक काय म्हणतील हे न पाहता, लोकांसाठी काय करता येईल, हे पाहते. तिच्या संघर्षातच समाजाला नवी दिशा मिळते.
 
समाजाला फक्त विचारवंत नाही, तर समाजात उतरून समाजासाठी कार्य करणाऱ्यांची गरज असते, जी सेवेला पूजेसारखं मानते आणि भीतीला आव्हानासारखं स्वीकारते; ती भूमिका सुजाता नक्कीच निभावत आहेत. गेली 27 वर्षे सुजाता ‌‘सातपाटी ग्रामविकास (बिगर शेती) सहकारी पतसंस्थे‌’त कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात 14 ते 15 पुरस्कार व सहा ते सात सन्मान संस्थेला प्राप्त झाले आहेत. सहकार क्षेत्रातील पुरस्कार संस्थेला मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. ती इच्छा पूर्ण होवो, यासाठी दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’च्यावतीने त्यांना अनेक शुभेच्छा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक