आज एकविसाव्या शतकातही ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हे वाक्य आपल्या कानी पडतेच. त्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे, कायद्याच्या माहितीअभावी सामान्य माणसाला यातून मार्ग काढणे अतिशय जिकरीचे होऊन बसते. त्यासाठी आपले संविधान, आपला कायदा यांचा सामान्य नागरिकांना परिचय करुन देण्यासाठी न्यायिक पातळीवर प्रामाणिक अशी समांतर व्यवस्था आवश्यक आहे. याच भावनेने समाजात कार्यरत मंगेश खराबे यांचा कार्यपरिचय करुन देणारा हा लेख...
खरं तर गरजूंना कायद्याची लढाई समजावून सांगितली, तर सामान्य माणसाचा भार काहीसा हलका होऊ शकतो. याच विचारांनी पिंपरी-चिंचवड शहरातील वकील मंगेश खराबे सदैव तत्पर असतात. त्यांनी कायद्याच्या अभ्यासात रस घेतला. विशेष म्हणजे, यातून समाजप्रबोधनदेखील होते, हे लक्षात आल्यावर त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग अशा तर्हेने सुरू केला. विविध क्षेत्रांत त्यांचा पुणे आणि लगतच्या परिसरात मोठा मित्रपरिवार. विविध सामाजिक संघटना, संस्था यांच्यासमवेत संबंध आल्याने मंगेश यांनी पुणे पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्वांना कायद्यातील किचकट प्रक्रियेचे आकलन व्हावे, म्हणून पुढाकार घेतला. यास विधी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कायद्याचे ज्ञान हवे असणार्या पोलीस संघटना, संस्था यांनी त्यांना प्रतिसाद दिला.
कायदा म्हणजे काय? कायद्याची व्याप्ती काय असते? न्याय मिळतो म्हणजे नक्की काय असते? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतात. वकिलांच्या संघटनेत विविध पदांवर काम केल्यावर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्नही त्यांना जवळून अनुभवता आले. यासाठी नागरिकांमध्ये कायद्याची जागृती करण्याचा विडाच पिंपरी-चिंचवड शहरातील वकील मंगेश खराबे यांनी उचलला आहे. पोलीस अधिकारी, कायद्याचे विद्यार्थी यांच्यामध्ये कायद्याची जागृती व्हावी, यासाठी ती कायम प्रयत्नशील असतात. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील विधी विद्यालयातही मंगेश खराबे मार्गदर्शनासाठी आवर्जून जातात. कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मूट कोर्ट’चे आयोजन केले जाते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना न्यायालयातील प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. या उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. शहरांतील विविध विधी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते सदैव तयार असतात. आतापर्यंत 200 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कायद्याची व्याख्या आणि कायद्याची बाजू त्यांनी रीतसर समजावून सांगितली आहे. एवढेच नाही तर त्यांनी स्वतः कायद्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
त्यांचे प्रेमळ बोलणे, कायद्याचे सर्व आयाम योग्य पद्धतीने समजावून सांगणे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मंगेश खराबे हे प्रसिद्ध आहेत. ‘पिंपरी-चिंचवड वकील संघटने’च्या विविध पदांवर कामाचा देखील त्यांना दांडगा अनुभव आहे. खंडपीठाची मागणी असेल अथवा वकिलांच्या संरक्षणाचा प्रश्न, अशा न्यायव्यवस्थेतील अनेकविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. त्यांच्याकडे एखादा खटला आला की, ते सर्वप्रथम समोरच्या व्यक्तीला तणावमुक्त होण्याचा सल्ला देतात. जर मनुष्य तणावमुक्त असेल, तर प्रत्येक अडचणींचा सामना करता येतो, असे ते मानतात. यामुळे समोर येणार्या प्रत्येकाला मनाने शांत होण्याचा ते सल्ला देतात.
आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून नवीन कायद्यांचे महत्त्व, त्यामधील मुख्य बदल, आरोग्यसेवकांवर होणारे परिणाम, विद्यार्थ्यांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती, वाहन चालवताना घ्यावयाची खबरदारी व वाहतूक नियमांचे पालन, तसेच अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याविषयी ते सखोल मार्गदर्शन करतात. अनेक ठिकाणी जबाबदार नागरिक होण्यासाठी काय करावे, कायदेशीर साक्षरतेसाठी आणि प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यास ते मदत करतात. त्याचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर वाणिज्य शाखेतून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. पुण्यातूनच कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी जनमानसात जाऊन काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कायद्याची पदव्युत्तर पदवी घेतली. ‘विधी व न्याय फाऊंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी व्याख्यानांचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी ‘क्लासरूम ते कोर्टरूम’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याची व्याप्ती ते दाखवत आहेत. भोसरी येथील विधी व न्याय मंडळाचे ते संस्थापक- अध्यक्ष आहेत. ‘धर्मवीर संभाजी अर्बन सहकारी बँके’च्या कायदेशीर सल्लागारपदी ते आहेत. आजतागायत 200 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कायद्याची बाजू आणि व्याख्या त्यांनी सांगितली आहे. कायद्याची पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी सामान्यांना कायद्यातील किचकट प्रक्रियेतून दिलासा देण्यासाठी सदैव पुढाकार घेतला आहे. कायद्यांमध्ये जेव्हा बदल होतात, त्यावेळी रद्द झालेली कलमे पोलिसांना माहिती नसतात. अशावेळी वकील खराबे त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. त्यांनी यासाठी कार्यशाळा, व्याख्याने घेऊनही अनेकांना सहकार्य केले आहे.
जनमानसात कायद्याची भीती असलीच पाहिजे. परंतु, कायद्याप्रति आदरदेखील असला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी ‘क्लासरूम ते कोर्टरूम’ अशा उपक्रमातून त्यांनी प्रबोधन सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे, ते अनेक शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांचे सल्लागार आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून मंगेश खराबे यांना विविध संस्थांच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
किमान सामान्य जीवनात वापरले जाणारे कायदे आणि त्याचे सखोल ज्ञान प्रत्येकाला असायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाला आपली जबाबदारी काय आहे ते समजेल, असे ते मानतात. मंगेश खराबे यांच्या पुढील कारकिर्दीला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा.
शशांक तांबे
(अधिक माहितीसाठी संपर्क : 8446817727)