
प्रसूती ही एक अशी प्रक्रिया, जी मानवीसृष्टीमध्ये सृजनाच्या अविष्काराचे दर्शन घडवते. पण, त्याचवेळी आई आणि बाळ या दोघांच्या आयुष्याला धोकाही असतो. म्हणून प्रसूतीला स्त्रीचा पुनर्जन्म मानले जाते. प्रसूतीची चर्चा करण्यास कारणीभूत ठरलेली एक नुकतीच घडलेली घटना म्हणजे, ‘इन्स्टाग्राम’ मान्यताप्राप्त म्हणून नावाजलेल्या ‘फ्रीबर्थ’ पद्धतीचा अवलंब केल्याने एका महिलेला तिचे तान्हे गमावण्याची वेळ आली. नऊ महिने सांभाळलेला तो पोटचा गोळा अशा पद्धतीने काळाचा घास होणे हे सर्वस्वी क्लेषकारकच! पण, सहानुभूती आणि सांत्वनेच्या पलीकडे जाऊन विचार केल्यास समाजमाध्यमांच्या दुष्प्रभावाचा वाढता धोका इथे ठळक दिसतो. ‘फ्रीबर्थ’ पद्धतीने प्रसूती केल्यावर दुर्दैवाने नवजात बाळाचा मृत्यू होणे, ही केवळ वैयक्तिक शोकांतिका नाही, तर डिजिटल युगातील समाजाच्या आरोग्यविषयक निर्णय प्रक्रियेवरच गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारी घटना ठरते.
समाजमाध्यम हे माहिती, प्रेरणा आणि अनुभवांची देवाणघेवाण करणारे आधुनिक व्यासपीठ. परंतु, गेल्या काही वर्षांत त्याच्या स्वरूपापेक्षा प्रभाव अधिक महत्त्वाचा झाला. त्वचेची काळजी असो, नातेसंबंधातील नीती असो किंवा मातृत्वाची पद्धत, सर्व काही आता ‘ट्रेंड’, ‘व्हायरल’ आणि ‘हॅशटॅग’च्या चौकटीतच मोजले जाते. डिजिटल दृश्ये, भावनिक कॅप्शन आणि सुंदर फिल्टर्समागे वास्तविकतेचा शोध घेण्याची सवय म्हणूनच कमी होत चालली आहे.
‘फ्रीबर्थ’ म्हणजे पूर्णपणे वैद्यकीय तज्ज्ञ, किंवा प्रशिक्षित साहाय्याशिवाय प्रसूती करणे. या पद्धतीचे जगभरातील समर्थक ती पद्धत नैसर्गिक आणि पूर्वजांच्या वारशाचा भाग म्हणून रंगवतात. पण, या क्षेत्रातील वैद्यकीय विज्ञान वेगळीच कथा सांगते. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या आकडेवारीनुसार, २०२४ साली प्रसूतीदरम्यान जगभरात अंदाजे २ लाख, ८७ हजार मातामृत्यू झाले होते, त्यातील बर्याच घटना वेळेवर वैद्यकीय साहाय्य न मिळाल्याने घडल्याच्या नोंदी आहेत. प्रसूतीच्या वेळी होणारा रक्तस्राव, गर्भाशयातील बिघाड, बाळाचे श्वसन थांबणे हे सर्व प्रसंग काही मिनिटांत होत्याचे नव्हते करू शकतात.
या पार्श्वभूमीवर प्रसूतीमधील गुंतागुंत आणि धोके सर्वांनीच लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘इंस्टाग्राम-अप्रूव्ड’ हा शिक्का सुरक्षिततेची हमी नाही. कारण, समाजमाध्यमे दिसणार्या पोस्ट अल्गोरिदम, लोकप्रियता या घटकांवर सामग्रीला प्रसारित करीत असतात. सुरक्षिततेच्या तपशीलांपेक्षा ‘यशोगाथा’ आपल्याला तिथे जास्त दिसतात. मात्र, ते एक अर्धसत्य असण्याची शक्यताही अधिक. पण, उत्तम सादरीकरण आणि अल्गोरिदममुळे एकाच आशयाचा संदेश सतत दिसल्याने लोकांच्या मनात मोह निर्माण होतो.
आज मानवी आयुष्यातील एकही क्षेत्र असे नाही, जिथे डिजिटल प्रभाव आपल्या निर्णय प्रक्रियेला प्रभावित करत नाही. इथे मानवी मनोभूमिकेचाही विचार करणे क्रमप्राप्त ठरते. समाजमाध्यमांत दिसणारे सारे काही सत्य असून, ते संपूर्ण समाजाला मान्य असल्याचे आपल्याला भासते. कारण, आज जगाच्या विस्ताराची संकल्पना समाजमाध्यमांपुरतीच मर्यादित झाली आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर आपल्याला जे दिसते, त्याला आपण योग्य मानतो. जेव्हा एखादी पद्धत अनेक प्रभावशाली लोक वापरतात, तेव्हा तिची वैज्ञानिक सत्यता तपासण्यापेक्षा तिची नक्कल करण्याचा आपला प्रयत्न असतो.
समाजमाध्यमांच्या प्रभावाचा आणखी एक धोका म्हणजे, सामाजिक दबाव! यामुळे सुरक्षिततेपेक्षा सवंग लोकप्रियतेला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती बोकाळते. ही मानसिकता आता सर्वच निर्णयांमध्ये दिसू लागली आहे. आरोग्याशी संबंधित निर्णय हे तज्ज्ञांचा सल्ला, वैज्ञानिक पुरावे यांच्या आधारे घ्यावेत. समाजमाध्यमांतील कथा आपल्या भावनांना हात जरुर घालतात. पण, त्या आपल्या परिस्थितीशी जुळतात का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ‘नैसर्गिक’ हा शब्द मोहक आहे. पण, सुरक्षिततेची जागा घेऊ शकत नाही. विज्ञान आणि निसर्गाचा संगमच खर्या अर्थाने सुरक्षित मातृत्वाचा पाया आहे आणि जर आपण या समजुतीकडे दुर्लक्ष केले, तर अशा शोकांतिकांच्या यादीत अजून नवी नावे जोडली जातील. डिजिटल जगात खरी प्रगती म्हणजे ‘लाईस’पेक्षा जीवनाला, ‘ट्रेंड’पेक्षा विज्ञानाला आणि प्रतिमेपेक्षा वास्तवाला प्राधान्य देणे, अन्यथा आपण चकाकत्या आभासी दुनियेच्या नादाने आरोग्य गमावण्याचा धोका पत्करत आहोत आणि यामुळे होणारे नुकसान कोणताही फिल्टर वापरून लपवता येणार नाही!
कौस्तुभ वीरकर