शिवरायांच्या जागतिक दुर्गगौरावचा आम्हाला अभिमान! गिर्यारोहक, इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आनंद.

    13-Jul-2025   
Total Views | 13

मुंबई, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकाळाचा ऐतिहासीक ठसा उमटलेल्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडू येथील १ अशा १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झाला. जागतिक वारसा स्थळ समितीचे ४७ वे अधिवेशन दि. ६ जुलै रोजी पॅरीस येथे सुरु झाले असून ते १६ जुलै पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनातंर्गत विविध देशातीरल एकूण ३२ ठिकाणांचे मूल्यांकण व तपासणी केली जाणार आहेत. या मूल्यांकणाची प्रक्रिया शुक्रवारी सुरु झाली असून, २०२४-२५ या कालावधीसाठी भारताकडून मराठा साम्रज्याच्या साम्यर्थ्याचे प्रतिक असणाऱ्या १२ किल्ल्यांचा समूह असलेले 'मराठा लष्करी स्थापत्य' हे नामांकन पाठवण्यात आले. जागतिक वारसा स्थळांच्या या यादीमध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, हे महाराष्ट्रातील ११ किल्ले व तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांचा जागतिक वारसास्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला.

केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्तव सर्वेक्षण आणि सांस्कृतिक मंत्रालयाने २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडे पाठवण्यासाठी निवडला. सदर नामांकन हे युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य निकषांवर हे किल्ले उतरले. मराठा साम्राज्याच्या या ऐतिहासिक दुर्गसंपदेला लाभलेल्या जागतिक किर्तीबद्दल इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केले आहे.

किल्ल्यांच्या संवर्धनासाठी योजना आखणे महत्वाचे!

"सर्वप्रथम श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्यावतीने युनेस्कोच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अवघ्या हिंदुस्थानासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराची प्रक्रिया संपन्न झाली, इथपासून ते आज या सरकारच्या प्रयत्नांमुळे युनेस्कोसारख्या जागतिक संस्थेने घेतलेला हा निर्णय स्वागतर्ह आहे. त्याच बरोबर आता महाराष्ट्रामध्ये असे असंख्य दुर्लक्षित किल्ले आहेत, ज्यांच्या संवर्धनासाठी योजना आखणे आवश्यक आहे. किल्ल्यांची देखभाल करणे, त्यांच्या पुर्निमितीच्या कामासाठी केंद्र सरकारने कायदा करणे गरजेचे आहे."

- सुधीर थोरात कार्यवाह,
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ

आता जबाबदारी आपली!

"महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा नामांकन मिळाले त्याबद्दल सर्व दुर्गप्रेमींचे आणि दुर्ग अभ्यासकांचे मनःपुर्वक अभिनंदन. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेली १६ वर्ष महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहोत, त्यामुळे याचा विशेष आनंद आहे, दुर्गप्रेमींच्या कामामुळे आपण हा दिवस अनुभवू शकलो. आता हे नामांकन मिळालेले किल्ले नीट ठेवणे आणि त त्याच्याकडे संवर्धन या दृष्टीकोनातून विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हे मानांकन कायमस्वरूपी टिकविणे एक मोठी जवाबदारी आहे. या कामी कोणतीही मदत लागली तरी दुर्ग संवर्धन करणाऱ्या सर्व संस्था पुरातत्त्व विभाग यांच्या सोबत असतील अशी मी आशा करतो."

- अजित राणे,
दुर्गवीर प्रतिष्ठाण

वारश्याचे पावित्र्य जपायाला हवे!


"महाराष्ट्रातील गड किल्ले हे मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतिक आहे. या किल्ल्यांचं संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानले पाहिजे, त्यांच्या नेतृत्वात हा दुर्गगौरवाचा हा क्षण आपण अनुभवला. आपल्याकडचा एक एक किल्ला हा अत्यंत महत्वाचा सांस्कृतिक ठेवा आहे. या वारश्याचे पावित्र्य आपण जपायाला हवे. इतिहासातून बोध घेऊन, महाराष्ट्राचे भौगोलिक महत्व समजून घेऊन आपला हा वारसा वृद्धिंगत कसा होईल यासाठी आपण प्रयत्नशील असायाला हवे"

- संजय तळेकर,
इतिहास अभ्यासक

पर्याटनाच्या दृष्टीने ही सुवर्णसंधी!

" युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश होणं ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. वास्तविक ही प्रक्रियी खूप आधीच पूर्ण व्हायला हवी होती. पर्यटनाच्या दृष्टीने या निर्णयाचा विचार करायाचा झाल्यास, ही आपल्या सगळ्यांसाठीच एक सुवर्णसंधी आहे. जागतिक वारसा स्थाळ म्हणून देश विदेशातील पर्यटक या गड किल्ल्यांवर फिरायाला येतील. त्या अनुषंगाने गड किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांचा विकास करण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे. त्याचबरोबर या देशाचे नागरिक म्हणून या गड किल्ल्यांवर स्वच्छता ठेवणं, सुरक्षिततेचा विचार करणं या गोष्टींकडे आपण एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे.

- आशिष भंडारी,
गिर्यारोहक, युथ हॉस्टेल कांदिवली युनिट



मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121