स्वरसामर्थ्याचे प्रतीक म्हणजे पद्मजा!: भावगंधर्व पंडित ह्रदयनाथ मंगेशकर - मान्यवरांच्या उपस्थितीत ' स्वर चंद्रिका - एक सांगितिक प्रवास ' या गौरवग्रंथाचे प्रकाशन
मुंबई, "पद्मजाचा सांगितीक प्रवास सांगणारा ग्रंथ आज इथे प्रकाशित होतो आहे, याचा मला आनंद आहे. शास्त्रीय संगीत, भावसंगीताच्या माध्यमातून तिने आपली साधना निरंतर सुरु ठेवली. खरं सांगायचं तर पद्मजाचं गाणं म्हणजे स्वरसाम्यर्थ्याचं प्रतीक आहे" असे प्रतिपादन पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केले. 'स्वरचंद्रीका : एक सांगितिक प्रवास' या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " रुढार्थाने सिनेगीतांच्या वाटेवर न चालता पद्मजाने भावगीतांच्या माध्यमातून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली. पद्मजा एक उत्तम गायिका तर आहेच, पण त्याचसोबत ती एक उत्तम लेखिका आणि चित्रकार सुद्धा आहे."
दि. १३ जुलै रोजी, दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात, संगीता गोडबोले संपादित, चपराक प्रकाशन प्रकाशित 'स्वरचंद्रिका - एक सांगितिक प्रवास ' या गौरव ग्रंथाचा प्रकाशन समारंभ पार पडलं. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी भूषवले. सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना चपराक प्रकाशनाचे घनश्याम पाटील म्हणाले की "पद्मजा फेणाणी जोगळेकर यांची ४५ वर्षांची कारकीर्द अतुलनीय आहे. आपल्याकडच्या कलाकारांवर लेखन होणे गरजेचे आहे. त्यामुळे या गौरवग्रंथाच्या माध्यमातून आम्ही कळाचे दस्ताऐवजीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. " 'स्वर चंद्रिका - एक सांगितिक प्रवास' या पुस्तकाच्या संपादिका संगीता गोडबोले या प्रवासावर भाष्य करताना म्हणाल्या की " पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा सांगितीक प्रवास चितारणे ही आमच्यासाठी आनंदयात्रा होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेर असलेल्या पद्मजाजींच्या चाहत्यांनी या ग्रंथनिर्मितीमध्ये मोलाचा सहभाग नोंदवला." पुस्तक प्रकाशनाच्या या सोहळ्यात आपले मनोगत व्यक्त करताना पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की "माझ्या सांगितिक कारकीर्दीमध्ये मला हिमालयाएवढ्या उंचीची माणसं भेटली. आपल्याला चांगलं गातं यावं हीच एक अपेक्षा असताना, मला इतक्या सगळ्या लोकांचं प्रेम मिळालं, हा माझा बहुमान आहे. लोकांच्या याच प्रेमामुळे मला गर्भश्रीमंत झाल्यासारखं वाटतं आहे" संगीत समृद्ध करण्यात पद्मजाजींचे महत्वपूर्ण योगदान!
" माणसाला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी विविध गोष्टींचा आस्वाद घेता आला पाहिजे. त्याची स्वत:ची एक दृष्टी तयार झाली पाहिजे. पद्मजा जोगळेकर यांच्या गाण्यामुळे हीच समृद्धी आपण अनुभवतो. त्याचबरोबर संगीत समृद्ध करण्यात पद्मजींचे महत्वपूर्ण योगदान आहे. सिनेसंगीताची कास न धरता, भावसंगीताच्या माध्यमातून त्यांचा आवाज सर्व स्तरांवर पोहोचला याचे विशेष कौतुक".
- पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर (सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.