योग क्रांती ते शिक्षण क्रांती! भारतीय ज्ञानशाखांच्या प्रसारासाठी ४ विद्यापीठं एकत्र
29-Jun-2025
Total Views |
नवी दिल्ली : भारतीय संस्कृतीमध्ये विश्वकल्याणाचा विचार आपल्याला पदोपदी आढळून येतो. याच पारंपरिक विचारांचा, आधुनिक शिक्षण व्यवस्थेसोबत मेळ साधत, भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी भारतातील ४ विद्यापीठांनी एकत्र येऊन, सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्याच्या अंतर्गत भारतीय शिक्षणव्यवस्था, आयुर्वेद, योगा या गोष्टींचा समावेश आहे. या कराराच्या माध्यमातून पतंजली विद्यापीठ, राजा शंकर शाह विद्यापीठ, हेमचंद यादव विद्यापीठ, आणि महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय ही चार विद्यापीठं एकत्र आलेली आहेत. पतंजली विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य बालकृष्ण यांनी २६ जून रोजी या बद्दल माहिती दिली.
भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी एकत्र पुढे आलेल्या या विद्यापीठांच्या भाष्य करताना आचार्य बाळकृष्ण यांनी माहिती दिली की ही गोष्ट केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून, या कराराच्या माध्यमातून आपण ऋषि क्रांती, योग क्रांती, आणि शिक्षा क्रांतीचा नवा विचार आपण समाजामध्ये पेरत आहोत. भारतीय ज्ञानशाखांचे पुनरुज्जीवन ही काळाची गरज आहे, आणि त्यादृष्टीने अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले गेले आहे. या कराराच्या अंतर्गत वेगवेगळ्या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे, त्याचबरोबर संशोधनाला प्रोत्साहन देणारे वातावरण कसे तयार होईल यावर सुद्धा काम केले जाणार आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्थेला प्राचीन भारतीय ज्ञानशाखांची जोड देण्याचा मानस या कृती कार्यक्रमात आहे असे आपल्याला दिसून येते.