सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित मिलिंद रायकर यांचे प्रतिपादन
10-Jul-2025
Total Views | 13
मुंबई : “विद्यार्थी ज्यावेळेस गुरुकडे एखादी गोष्ट शिकायाला जातो, तेव्हा संपूर्ण शरणागतीच्या भावनेने त्याने जावं. गाण्याच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की गुरुला शरण गेल्याशिवाय संगीत साधना अशक्य आहे.” असे मत सुप्रसिद्ध व्होयलीन वादक पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले. गुरुपौर्णिमेनिमित्त दै. मुंबई तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ते बोलत होते. यावेळी आपल्या सांगितीक प्रवासावर भाष्य करताना ते म्हणाले की “ मी ज्या मान्यवरांकडे संगीताचे धडे घेतले, मग ते पंडित बी.एस. मठ गुरुजी असतील, दातार गुरुजी असतील, किशोरीताई आमोणकर असतील यांनी माझी परीक्षा घेतली, त्या त्या टप्प्यावर माझ्याकडून तयारी करुन घेतली. त्यामुळे एखादी गोष्ट शिकण्याची ओढ असेल तर समपर्णाचा भाव अत्यंत आवश्यक आहे.”
पंडित मिलिंद रायकर यांनी चार दशकाहून अधिक काळ वायलीन वादन केला आहे. शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा चिरकाल टिकून राहावा या हेतूने त्यांनी घेतलेला हा वसा, आता त्यांची पुढची पिढी सुद्धा तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहे. ए पी डा कोस्टा यांच्याकडून व्हायोलिनचे धडे घेतल्यानंतर, त्यांची पुढची वाटचाल पंडित वसंतराव काडणेकर, धारवडचे पंडित बी एस मठ यांच्या मार्गदर्शनाखाली समृद्ध झाली. गाणसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्याकडे २१ वर्ष पंडित मिलिंद रायकर गाणं शिकत होते. त्यांच्या या संगीत शिक्षणाचा काळ त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये उलगडून सांगितला. आपल्या शिक्षणाच्या या प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणतात की त्या काळात मी सातत्याने शिकत राहिलो, नवनव्या गोष्टींचा उलगडा होत होता. स्वरांमधील बारकावे,एक तान जर आम्हाला शिकवली, तर ती पूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय थांबायचं नाही, मग त्याला कितीही दिवस लागोत. एखादा आलाप जर असेल, तो जोवर सूरात येत नाही तोवर त्याचा ध्यास आपण सोडायचा नाही.
शास्त्रीय संगीतातील गुरु शिष्य परंपरेवर भाष्य करताना पंडित मिलिंद रायकर म्हणाले की ‘ संगीताची ही विद्या गुरुच्या घरी राहून शिकण्याची विद्या आहे. जवळपास ५ ते १० वर्षांपूर्वी मी असा प्रयोग केला होता, मात्र प्रपंचातील कर्तव्यांमुळे विद्यार्थ्यांना ते शक्य झाले नाही. मात्र माझ्याबाजूने हा प्रयत्न अजूनही सुरु आहे. मी अशा विद्यार्थ्याच्या शोधात आहे. कारण, संगीताची ही जी विद्या आहे ती आम्हाला मुखोद्गत आहे. जे गुरु वाजवतो, ते शिष्य ऐकतो आणि त्याच्या मनावर त्या सुरांचे संस्कार होतात. या गोष्टीसाठी वेळेचा अवकाश लागतो, तो कुठेतरी आज नाहीये असं आपल्याला बघायला मिळतं. आज एकाच वेळी आपल्या पाल्याने वेगवगेळ्या क्षेत्रात निपुण व्हावे अशी अपेक्षा काही पालकांची असते, त्यामुळे पूर्णपणे एका कलेला समर्पित असणे हे का गरजेचं आहे हे पालकांनी सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे असं मला वाटतं असे मत पंडित मिलिंद रायकर यांनी व्यक्त केले.