भारतीय साहित्यातील 'बुकर'चा अस्त! सहा वर्षांनंतर जेसीबी प्राईज फॉर लिटरेचर बंद
28-Jun-2025
Total Views |
मुंबई: भारतीय साहित्यविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा जेसीबी प्राईज फॉर लिटरेचर हा पुरस्कार बंद करण्यात आला आहे. २०१८ साली सुरु झालेल्या या पुरस्काराच्या माध्यमातून अनेक भारतीय लेखकांचा, अनुवादकांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्काराचे आकर्षण म्हणजे, पारितोषिक म्हणून दिले जाणारे लाखो रुपयांची बक्षिसं. इंग्रजी तसेच अनुवादित साहित्यासाठी दिला जाणाऱ्या या पुरस्काराला काही जण भारतीय 'बुकर' असे सुद्धा संबोधित करायचे.
जेसीबी प्राईज फॉर लिटरेचर या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्ठय म्हणजे, भारतीय लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिस म्हणून लाखो रुपये दिले जात असत. या पुरस्कारासाठी स्थापन केलेल्या जेसीबी लिटरेचर फाऊंडेशनचे ध्येय भारतीय साहित्याला प्रोत्साहन देणे, वाचकांना एकत्र आणणे हे होते. २०१८ साली मल्याळम लेखक बेंजामिन यांच्या जेसमिन डेज, या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला होता. या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर शहनाज हबीब यांनी केले होते. २०२४ साली उपमन्यू चॅटर्जी यांच्या 'लॉरेन्झो सर्चेस फॉर मिनिंग ऑफ लाईफ' या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.
अत्यंत मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार नेमका कुठल्या कारणासाठी बंद करण्यात येतोय याबद्दलचे स्पष्टीकरण जेसीबी लिटरेचर फाऊंडेशनकडून देण्यात आलेले नाही. परंतु, भारतीय साहित्याला मिळणारा अल्प प्रतिसाद लक्ष्यात घेता. जेसीबी प्राईज फॉर लिटरेचर बंद करण्यात आले आहे, असे मत काहींनी व्यक्त केले आहे.