मुंबई : योगतंत्र या संस्थेच्या माध्यमातून दि. २८ जून रोजी मुलुंडच्या रावसाहेब ठाकरे विद्यालय इथे योगप्रेमींचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाला प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ यश वेलणकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला योगतंत्र विश्वस्त ओनील खरे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. या प्रसंगी ओमकार खरे यांनी योगतंत्र ओळख, योगतंत्र चा आज पर्यंतचा प्रवास आणि भविष्यकालीन योगतंत्राची वाटचाल याविषयी थोडक्यात पण महत्वाची माहिती दिली. योगतंत्र विद्यार्थ्यांचा योग प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये सांगितीक योग आसने करण्यात आली. यानंतर योगतंत्रासंबंधित विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना यश वेलणकर यांनी ध्यान, योग व त्याचे जीवनातील महत्व, याविषयीचे आपले विचार मांडले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्राथमिक योग प्रशिक्षण, प्रगत योग प्रशिक्षण आणि योग शिक्षक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विदयार्थ्यांना प्रशस्ती पत्रक, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओनील खरे सर यांनी केले व उपस्थितांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता "पसायदानाने" करण्यात आली. योग विदयार्थी आणि योग प्रेमी यांच्या उत्साहात पुढील वर्षी आणखीन अनोख्या रूपात या कार्यक्रमाची मांडणी करण्यात येईल या ग्वाहीने हा कार्यक्रम आनंदात संपन्न झाला.