महाराष्ट्र रेडिओ महोत्सवात ५ आर.जे. घेणार मुख्यमंत्र्यांची मुलाखत!
मुंबईत रंगणार पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव!
20-Jun-2025
Total Views | 14
मुंबई : जागतिक संगीत दिनानिमित्त उद्या दि. २१ जून रोजी सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत आशा रेडिओ पुरस्कार २०२५चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ५ नामांकित आर जे देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. नरिमन पाँईट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी २ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रमात रेड एफएमचे आरजे सिद्धू, मॅजिक एफएमचे, आरजे अक्की, रेडिओसिटीच्या आरजे अर्चना, रेडिओ मिर्चीच्या, आरजे प्रेरणा आणि बिग एफएमचे, आरजे अभिलाष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे समन्वय हेनल मेहता करणार आहेत.
महाराष्ट्र रेडिओ महोत्सव अंतर्गत प्रथमच १२ रेडिओ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. आशा रेडिओ गौरव पुरस्कार हा संगीत क्षेत्रातील दिग्गज असलेल्या ‘महाराष्ट्र भूषण आशा भोसले’ यांच्या नावाने देण्यात येणार आहे. यासह आशा सर्वोत्कृष्ट कम्युनिटी रेडिओ केंद्र, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मनोरंजन कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ सामाजिक कार्यक्रम, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ पुरुष निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ महिला निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट नवोदित रेडिओ निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट रेडिओ मराठी निवेदक, महाराष्ट्र आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा कार्यक्रम, आशा सर्वोत्कृष्ट सामाजिक उत्तरदायित्व भान असणारा मराठी कार्यक्रम आणि आशा सर्वोत्कृष्ट स्टोरी टेलिंग कार्यक्रम अशी या पुरस्कारांची नावे असून जीवनगौरव पुरस्कार वगळता इतर पुरस्कार हे नामनिर्देशनाद्वारे घोषित करण्यात आली होती. मानचिन्ह, शाल आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
सदर कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रेडिओशी संबंधित गाणी, चित्रपटांतील गीत आणि रेडिओ या गोष्टींशी निगडित गाणी, गप्पा गोष्टी किस्से यांचे सादरीकरण प्रथितयश कलाकारांच्या माध्यमातून होईल. सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे अशा नावाजलेल्या कलाकारांच्या सादरीकरणातून सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत. या कार्यक्रमांला प्रवेश विनामुल्य आहे. सर्व रेडिओप्रेमींनी आणि रसिकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.