जय जगन्नाथ! सुदर्शन पटनायक यांच्या वाळूशिल्पाने वेधले सगळ्यांचे लक्ष्य
27-Jun-2025
Total Views |
भुवनेश्वर: ओडिशा येथे पार पडणाऱ्या महाप्रभु रथयात्रेच्या शुभ मुहूर्तावर लाखो भाविक पुरी येथे पोहोचले आहेत. अशातच, ख्यातनाम सँड आर्टीस्ट, पद्मश्री सुदर्शन पटनायक यांच्या आगळ्या वेगळ्या कलाकृतीने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले आहे. पुरी येथील समुदकिनाऱ्यावर सुदर्शन पटनायक यांनी महाप्रभु जगन्नाथांच्या १०१ मूर्तींसह एका अत्यंत देखण्या वाळूशिल्पाची निर्मिती केली आहे. त्यांची ही कलाकृती आता सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल होत आहे.
महाप्रभु रथयात्रेच्या निमित्ताने आपली कलाकृती सोशल मिडीयावर शेअर करत सुदर्शन पटनायक म्हणाले की " महाप्रभू रथयात्रेच्या सोहळ्यानिमित्त महाप्रभू जगन्नाथाच्या १०१ मूर्तींसह मी ही कलाकृती तयार केली आहे. महाप्रभूंच्या आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभो" समुद्रकिनारी वाळूपासून तयार केलेली ही कलाकृती म्हणजे भक्ती आणि कलेचा अनोखा संगम आहे. भगवान जगन्नाथांची मूर्ती साकारतान, अत्यंत बारकाईने ही कला साकारण्यात आली आहे.
वाळूशिल्प साकारणारे सुदर्शन पटनायक कोण आहेत?
ओडिशा येथील सुदर्शन पटनायक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वाळू शिल्पकार आहेत. त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा २०१४ साली पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. वाळूशिल्पासाठी प्रतिष्ठित फ्रेड डॅरिंग्टन सँड मास्टर पुरस्कार पटकवणारे ते पहिले भारतीय आहेत. इंग्लंडमधील डोरसेट येथे झालेल्या सँडवर्ल्ड २०२५ आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सवादरम्यान त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुदर्शन पटनाईक यांनी आपल्या या वाळूशिल्पाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून ते भारताचा सांस्कृतिक वारसा जगभर पोहोचवण्याचे कार्य करत असतात.