सैनिकी जीवन जगण्याचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण करून, निवृत्तीनंतरही त्यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेत ते पूर्ण केले. देशसेवा ते समाजसेवा असा प्रवास करणार्या रंगनाथ कीर्तने यांच्याविषयी...
लक्ष्मीबाई आणि सोनाप्पा शेती करूनच आपला उदरनिर्वाह करत होते. घरी म्हशी असल्याने दूधाचाही व्यवसाय होता. अमरावतीत दि. २६ एप्रिल १९३६ साली त्यांच्या पोटी जन्मलेल्या रंगनाथला, लहानपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती. सैनिकी जीवन जगण्याचे स्वप्न ते पाहू लागले. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी रंगनाथ शारिरीक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देऊ लागले. यासाठी त्यांनी शाळेतही ‘एनसीसी’मध्ये प्रवेश घेतला. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात जन्मल्याने, बालपणीच इंग्रजांचा काळ अनुभवला होता. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासूनच रंगनाथ जवळच्या संघ शाखेतही जाऊ लागले. बालपणापासूनच त्यांच्यावर संघाचे संस्कार झाले. अमरावतीत त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
मोठ्या प्रयत्नांनंतर रंगनाथ भारतीय सैन्यात रुजू झाले. सुरुवातीला त्यांची जालंधर येथे पोस्टिंग झाली होती. त्यानंतर देवळाली कॅम्प आणि मग पश्चिम बंगालमधील उत्तरेकडच्या शेवटच्या भागात त्यांची पोस्टिंग होती. १९६२ आणि १९७१ सालच्या दोन्ही युद्धांमध्ये त्यांचा सहभाग होता. १९६२ साली जेव्हा युद्ध झाले, तेव्हा देवळाली कॅम्प येथे ते ‘टेलिग्राफ मेकॅनिक’ म्हणून त्यांनी जबाबदारी संभाळली. वरिष्ठ पातळीवरून जसे आदेश आणि निर्देश येतील, त्याप्रमाणे त्यावेळी कार्यवाही केली जात होती. १९७१ साली झालेल्या युद्धादरम्यान त्यांची पंजाबमध्ये पोस्टिंग होती. या काळातही त्यांनी आपले कर्तव्य पूर्ण केले. त्याकाळी दूरध्वनी नसल्याने, नातेवाईकांचा हालहवाला समजण्यासाठी पत्र हाच एकमेव आधार असे. चार दिवसांनंतर पत्र घरी पोहोचत असे. अशा परिस्थितीतही त्यांनी युद्धकाळात न डगमगता आपले कर्तव्य पूर्ण केले. पुढे लग्नानंतर ते मनमाडला स्थायिक झाले. १९७४ साली भारतीय सैन्यातून रंगनाथ कीर्तने नायब सुभेदार म्हणून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी सुरुवातीला व्यवसाय उभारण्याचे ठरवले. मनमाडलाच नांदगाव रोडवर हॉटेल सुरू करण्याचे निश्चित झाले. गावाच्या वेशीवर असल्याने, हॉटेलला ‘किनारा’ हे नाव देण्यात आले. हॉटेल व्यवसायाने चांगलाच जोर धरला. मनमाडला असतानाही त्यांनी संघ उपक्रमांना हजेरी लावणे सुरूच ठेवले.
१९९० साली मनमाडमध्ये भाजप स्थापन करण्यात रंगनाथ अग्रेसर होते. रामजन्मभूमी आंदोलनाच्या कालावधीत, रंगनाथ यांनी मोठ्या प्रमाणावर कारसेवकांची सेवा केली. मनमाड हे रेल्वे जंक्शन असल्याने, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रेल्वेद्वारे कारसेवकांचा प्रवास सुरू असे. अशावेळी त्यांची भूक भागविण्यासाठी रंगनाथ आणि सहकारी स्थानकावर जेवण घेऊन जात असत. हवे-नको तेही बघत. बाबरी पाडल्यानंतर रेल्वेने परतणार्या कारसेवकांचीही त्यांनी सेवा केली. राम मंदिर उभारणीसाठी त्यांनी विटांचेही संकलन केल्या. मनमाडमध्ये दंगल झाल्यानंतर स्वयंसेवकावर हल्ला झाला. त्यावेळी रंगनाथ यांनी उच्च स्तरावर संपर्क साधून, मनमाडमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवून घेतली. संघ काम करताना त्यांचा ‘वनवासी कल्याण आश्रमा’शी संपर्क आला आणि ते तिथेच सक्रिय झाले. मनमाडमध्ये ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे काम वाढविण्यात त्यांचे योगदान फारच मोठे. मनमाड शाखेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
कनाशी येथील ‘वनवासी कल्याण आश्रमा’च्या मुलींच्या वसतिगृहात, दर महिन्याला ते काही कार्यकर्त्यांसह भेटीला जात असत. त्यावेळी आश्रमाला काही गरजेच्या वस्तू भेट देत. दरवर्षी विद्यार्थिनींना आमरसपुरीचे जेवणही दिले जाते. तसेच, गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कारही केला जातो. आदिवासी पाड्यावर आरोग्य शिबिरे घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
संपूर्ण आयुष्य सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल ‘लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी’ यांच्यावतीने त्यांना, २०२४-२५ सालच्या ‘लायन्स सोशल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. आतापर्यंत त्यांना विविध, संस्था आणि संघटनांनी विविध पुरस्कारांनी गौरविले आले.
रंगनाथ यांच्या पत्नी कुसूम या शाळेत मुख्याध्यापिकाही होत्या. त्यानंतर पुढे त्या ‘मनमाड नगर परिषदे’च्या पहिल्या महिला नगराध्यक्षा झाल्या. दरम्यान, इंग्रजांचा काळ अनुभवल्यानंतर रंगनाथ यांच्यामध्ये देशभक्तीचे वारे वाहू लागले. त्यासाठी सैन्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. मोठ्या जिद्दीने आणि प्रयत्नांनी त्यांनी सैन्यात नोकरी मिळवली आणि आपले सैनिकी जीवन जगण्याचे आणि त्याद्वारे देशाची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी जमेल त्या पद्धतीने देशसेवा सुरूच ठेवली. पुढे ‘वनवासी कल्याण आश्रमा’त सक्रिय होऊन आदिवासींची सेवा केली. संघ कार्यकर्त्यानंतर पुढे त्यांनी ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्यकर्ते म्हणूनही भरीव कार्य केले. अशा या बहुआयामी आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्वाला म्हणजेच रंगनाथ सोनाप्पा कीर्तने यांना, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा!
७०५८५८९७६७