मुंबई : पूर्वी आपल्याकडे पुढच्या पिढीला देण्याकरिता सोने सांभाळून ठेवायचे. पण मुंबईत घरांना सोन्यासाखी किंमत आहे. त्यामुळे पुढच्या पिढीला हे घर द्यायचे आहे, असा विश्वास मनात ठेवा. ही घरे विकू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडीवासियांना केले.
गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पहिल्या टप्प्याअंतर्गत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पात्र रहिवाशांना ५५६ पुनर्वसन सदनिका वितरण समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री पंकज भोयर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, खासदार मिलिंद देवरा, आ. कालिदास कोळंबकर, आ. सचिन अहिर, आ. महेश सावंत, सुनील शिंदे, सदा सरवणकर, श्रीकांत भारतीय, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "बीडीडी वासियांच्या समवेत आम्ही बघितलेल्या स्वप्नाची पूर्तता आज सुरू झाली आहे. बीडीडी चाळीने अनेक सामाजिक, राजकीय आंदोलने बघितली. या चाळीतून वेगवेगळे विचार तयार झाले. या चाळीच्या भिंतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कथा, कहाण्या दडलेल्या आहेत. अनेक परिवारांचा आनंद, दुःख दडलेले पाहायला मिळतात. या केवळ चाळी नसून मुंबईच्या सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचा जिवंत इतिहास म्हणून याकडे पाहता येईल. बीडीडी चाळीची झोपडपट्टी पेक्षाही वाईट अवस्था होती. त्यामुळे महायूती सरकार आल्यानतंर बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही ऐरणीवर घेतला. कुठलातरी बिल्डर बीडीडी चाळीचा विकास करेल या अपेक्षेने हा विकास होत नव्हता. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून हा विकास करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यामध्ये अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत वेगाने हे काम सुरु केले."
मुंबईकराला मुंबईतच घर मिळावे हीच भूमिका"जागतिक स्तरावर काम करणाऱ्या कंत्राटदारांना आपण या प्रकल्पाचे काम दिले. अनेक लोकांनी या प्रकल्पाला हातभार लावला. सगळ्या अडचणींतून मार्ग काढत आपण हे काम सुरू केले. आमचे किरण शेलार हे माझ्याकडे तीन-चार वेळा प्रस्ताव घेऊन आले. त्यांनी काही बदल सुचवले, तेसुद्धा आम्ही मान्य केले. समाजाकरिता काम करत असताना आडमुठी भूमिका घ्यायची नाही, असे महायूती सरकारचे काम राहिले आहे. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांचे पोलिसांना घर देण्याचे स्वप्न आपण पूर्ण करत आहोत. मुंबईकराला मुंबईतच घर मिळाले पाहिजे ही भूमिका आम्ही ठेवली. केवळ भावाचेच नाही तर बहिणीचेही नाव या घरांवर आले पाहिजे, याबद्दल आम्ही गांभीर्याने विचार करू," असे त्यांनी सांगितले.
धारावी हे आर्थिक विकासाचे केंद्र"धारावी संदर्भात सगळे निर्णय घेऊन धारावीचा पुनर्विकास आपण सुरू केला आहे. एकट्या धारावीत १० लाखांच्या वर लोकसंख्या आहे. त्याचा पुनर्विकास करणे म्हणजे एक वेगळे शहर वसवण्यासारखे आहे. धारावीमध्ये पात्र लोकांना त्याच ठिकाणी घर देणार आहे. धारावी ही केवळ झोपडपट्टी नसून ते एक आर्थिक विकासाचे केंद्र आहे. धारावीकरांच्या घरांसोबत त्यांचा व्यवसाय जुळला आहे. त्यामुळे तिथेच चांगल्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील. धारावीमध्ये आज एक मोठी औद्योगिक वसाहत उभी होणार असून ज्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे," असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका : उपमुख्यमंत्री अजित पवार"अनेक सरकारे आली आणि गेली पण हा प्रकल्प होईल की, नाही असा प्रश्न होता. आज वरळीकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बीडीडी चाळ बांधली. आता मिनी भारत अशी ही चाळ निर्माण झाली आहे. झोपडपट्टी मुक्त मुंबईची वाटचाल पूर्ण होणार आहे. १६० चौरस फुटांमध्ये राहत असलेला माणूस आता ५०० चौरस फुटांच्या घरात राहणार आहे. जसे बीडीडी चाळीचे स्वप्न पूर्ण झाले तसेच येणाऱ्या काळात धारावीचे स्वप्नदेखील पूर्ण होणार आहे. महायुतीचे सरकार ते स्वप्न पूर्ण करून दाखवणार आहे. उद्या टॉवरमध्ये गेलात तरी आपली संस्कृती विसरू नका. हे घर तुमच्या हक्काचे आहे त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे. काहीही झाले तरी तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका."
झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे सरकारचे धोरण - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे"म्हाडाच्या पूर्वीच्या घरांमध्ये आणि आताच्या घरांमध्ये खूप फरक आहे. इतर बांधकाम क्षेत्रांनी त्यांचे बांधकाम पहावे. या नव्या इमारतींमध्ये एक एक इंच जागेचा पुरेपूर वापर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि आज त्यांच्याच हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन होतंय, हा योगायोग आहे. मुंबईबाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी बीडीडी हे उत्तम उदाहरण असून झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्याचे सरकारचे धोरण आहे. आपण अनेक वर्षे खड्ड्यातून प्रवास केला. परंतू, आता रस्त्यांवर खड्डे दिसणार नाही. पुढच्या काही वर्षात आपल्याला खड्डेमुक्त मुंबई पहायला मिळेल. मुंबई आणि एमएमआरमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा आमचा संकल्प आहे."
"माझे वय ६५ वर्षे असून मी गेली ४५ वर्षे बीडीडी चाळीत राहत होते. आता मी मोठ्या घरात जाणार आहे. या प्रकल्पामुळे माझ्या पुढच्या पिढीला फायदा होणार आहे."
- वैशाली विजय ओगले, रहिवाशी (लाभार्थी) "ज्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्धाटन झाले त्यावेळी हा प्रकल्प पूर्ण होणार की, नाही आणि ५०० चौरस फुट घराचे आश्वासन स्वप्नवत वाटत होते. परंतू, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द ते खरा करणार असा रहिवाशांना विश्वास होता. आजचा हा दिवस आमच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. आम्ही चार पिढ्या बीडीडी चाळीमध्ये वास्तव्यास आहे. गेल्या २५ वर्षांपासून पुनर्विकास होणार असल्याचे आम्ही ऐकत होतो. पण आज हे स्वप्न पूर्ण झाले आहे. वरळीसारख्या ठिकाणी ५०० चौरस फुटांचे स्वत:च्या मालकीचे घर मिळाल्याने हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे."
- विजय बांदिवडेकर, रहिवाशी