मृत्यूचे रहस्य

    13-Nov-2024
Total Views | 170
mrutyuche rahasya
 
नचिकेतस् आख्यानाचा खरा अर्थ : नचिकेतस आख्यानातील सत्यार्थ जाणण्याकरिता, त्या आख्यानात वापरलेल्या शब्दांचा सत्यार्थ जाणणे आवश्यक आहे. ‘वाज’ म्हणजे अन्न आणि ‘श्रवस्’ म्हणजे कीर्ती. अन्नामुळे ज्याची कीर्ती सर्वत्र पसरली तो ‘वाजश्रवासः’ किंवा ‘वाजश्रवा’ होय. यावरून काही विद्वान असा अर्थ लावतात की, वाजश्रवा फार अन्नदान करीत असे. परंतु, रानावनात राहणारे आणि कंदमुळे व फळे खाणारे तत्कालीन ऋषी कशाचे अन्नदान करणार? अध्यात्मात अन्नदानाचा अर्थ ज्ञानदान असा धरावा लागेल. पोटाला जसे अन्न, तद्वत् आत्म्याला ज्ञान अन्नासमान आहे. असल्या ज्ञानान्नाचे दान करणारा तो ‘वाजश्रवा’ होय. म्हणजे जो आपल्याला माहीत असलेली माहिती, इतरांनी विचारलेले नसतानासुद्धा प्रवचनाद्वारे मुक्तपणे देतो त्याला उपनिषदकार ‘वाजश्रवा’ म्हणतात.

बरेच लोक असे समजतात की, केवळ प्रवचने केल्यामुळे वा ऐकल्यामुळे आपण ज्ञानी बनलो आणि आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाले. असल्या लोकांना उपनिषदे स्पष्टच सांगतात, ‘नायमात्मा प्रवचनेन लभ्यः। न मेधया न बहुना श्रुतेन’॥ म्हणजे प्रवचने केल्याने वा ऐकण्याने आत्मज्ञान प्राप्त होत नसते, तर त्याकरिता सुयोग्य साधना आणि चिंतन करावे लागते. तेव्हा केवळ प्रवचने केल्याने आपणास आत्मज्ञान प्राप्त झाले, असे खोटेच मानणारा वाजश्रवा, तर त्याचा पुत्र वाजश्रवस् हा होता. वाजश्रवा अन्नदानाबद्दल खोटी कल्पना करून बसला होता. परंतु, त्या वृत्तीचा पुत्र जो वाजश्रवस, त्याने तर एकूण दानाबद्दलची विकृत कल्पना स्वतःच्या उराशी बाळगली. पित्याने ज्ञानदान प्रवचनाद्वारे करण्यात आपले आयुष्य वेचून स्वतःला आत्मज्ञानी मानले, तर पुत्राने अन्नदान (ज्ञानदान) न करता गोदान करणे सुरू केले. परंतु, पित्याप्रमाणे त्याने ‘गो’चा अर्थ चुकीचा लावून, ‘गो’ म्हणजे गाय मानून प्रत्यक्ष गायीचेच दान करण्याचे ठरविले. ‘गो’चा अध्यात्मिक अर्थ ‘इंद्रिये’ असा आहे. साधारण साधक शास्त्रार्थ विसरून लौकिकार्थावर जोर देऊन, तद्वत् वागू पाहतात आणि आत्मवंचना करून आयुष्यभर अज्ञानात राहतात. असल्या वृथा गोदान करणार्‍या वृत्तीला, उपनिषदकार वाजश्रवस् म्हणतात. केवळ गायीचे दान करून आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. त्यासाठी सुयोग्य साधना करावी लागेल. गोदान म्हणजे इंद्रियदान!

ब्रह्म जाणण्याकरिता साधकाला लहानपणापासूनच आपली इंद्रिये ताब्यात ठेवून त्यावर योग्य संस्कार करून, त्या सर्व इंद्रियांचे समर्पण वा दान ब्रह्मज्ञानाकरिता म्हणजे ब्रह्माकरिता करायचे असते. गीता स्पष्टच सांगते. ‘ब्रह्मार्पणं ब्रह्म हवि: ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ख ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधीना’ या ब्रह्मालाच कथारुपाने, ब्रह्मावस्था वा ब्राह्मण म्हटले आहे. ब्रह्माला इंद्रिये समर्पण करायची म्हणजेच ब्राह्मणांना गोदान करणे होय, असल्या वृत्तीपोटी अधिक स्वार्थ उत्पन्न होऊन गोदान केल्याचे पुण्य मिळते का? मग म्हातार्‍या गायी वा साधकाची म्हातारी म्हणजेच निरुपयोगी इंद्रिये, ब्रह्माला दान करण्याची वृत्ती उत्पन्न होते. बाह्यार्थाने काहीजण ब्राम्हणांना वाजश्रवसाप्रमाणे म्हातार्‍या गायी दान देऊन, पुण्य प्राप्त झाले असे मानतात. तर काहीजण त्यावरील सत्यार्थ समजून, स्वतःची इंद्रिये (गौ) म्हातारवयात सर्व शारीरिक शक्ती संपल्यावर ब्रह्मकर्माला लावतात, म्हणजे दान करतात. दोन्ही वृत्ती चूकच आहेत.

इंद्रियांना लहानपणापासूनच सुसंस्कार लावावे लागतात. लहानपणी जे वळण पडेल, तेच मोठेपणी वा आयुष्यभर कायम असते. तुकाराम महाराज म्हणतात, ‘पडिले वळण इंद्रियां सकळा। भाव तो निराळा नाही दुजा॥ आयुष्यभर लांड्या-लबाड्या केल्यावर मग म्हातारपणी अध्यात्म करतो म्हटले, तर ते अत्यंत चूक आहे. कारण पूर्वायुष्यात इंद्रियांना जे वळण पडले, त्यानुसार सर्व इंद्रिये वर्तणार! बरेच लोक असे समजतात की, पूर्वायुष्यात नोकरी, व्यापार, धंदा करून सर्व आटोपले, म्हणजे मग म्हातारवयात अध्यात्माच्या गोष्टी कराव्यात. पण इंद्रियांवरील पूर्वसंस्कार म्हणजे खाद्य न सुटता, असल्या साधकांची इंद्रिये मिथ्याचार करतात. अशांना ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होणार? म्हणून अध्यात्म लहानपणापासूनच करायला हवे. साधकाने आपल्या आयुष्याचा बालवयातील इंद्रिये म्हणजे ‘गौ’ ब्रह्माला म्हणजेच ब्राह्मणांना दान करावीत. त्याने आयुष्यभर मतलब साधून, आपल्या म्हातारवयातील इंद्रिये म्हणजे ‘गौ’ ब्रह्मसाधनेकरिता दान म्हणजे समर्पण करण्याचे ठरविले. बरे, एवढ्याच स्वार्थी अर्थावर तो थांबला नाही, तर त्याने त्या म्हातार्‍या ‘गौ’ना म्हणजे इंद्रियांना ब्रह्मकर्माला म्हणजेच ब्राह्मणांना दान देण्यापूर्वी, त्यांना आपल्या पूर्वायुष्यात सतत संगोपन केलेल्या वृत्तिरुप चारापाण्याने पूर्ण तृप्त केले आणि मग तसल्या गो (इंद्रियांना) वाजश्रवसाने ब्राह्मणांना दान देण्याचे ठरविले. म्हातार्‍या गायी ब्राह्मणांना दान देण्यापूर्वी वाजश्रवसाने त्यांना, पोटभर चारापाणी खाऊ घातले, असे कठोपनिषदात लिहिले आहे. त्याचा अर्थ खर्‍या गायी व खरा चारापाणी नसून, इंद्रिये व पूर्वायुष्यातील संस्काररूप अन्न होय. शिवाय, असे केल्याने आपल्याला अक्षय आनंद म्हणजेच आनंदलोक प्राप्त होईल, असा स्वतःचा खोटाच समज वाजश्रवस वृत्ती करून घेते.

आत्मानंद असल्या स्वार्थी वा खोट्या वृत्तीने प्राप्त होत नसतो. म्हणून वाजश्रवसाचा पुत्र नचिकेतस याला त्याच्या पितावृत्तीचे ते करणे आवडले नाही. पूर्वापार संगोपन केलेल्या अशास्त्रीय असत्य वृत्ती वा संस्काराचा त्याग करून, सन्मार्गाला लागणारी सत्प्रवृत्ती म्हणजे नचिकेतस होय. खर्‍या साधकाने असल्याच नचिकेतस वृत्तीचा स्वीकार केल्यास, त्याला खरा ब्रम्हानंद प्राप्त होईल. म्हणून नचिकेतस वृत्ती स्वतःतील वाजश्रवसरुप पिता वृत्तीला असे सांगते की, असली म्हातारी इंद्रिये साधनेला दान करून, ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. आपली इंद्रिये (गौ) कुमार वयापासून ब्राह्मणांना (ब्रह्मकर्माकरिता) दान (समर्पित) केले पाहिजे. असे केल्यास साधकाला आनंदलोक प्राप्त होईल. लोक म्हणजे साधकाची अवस्था असा अर्थ लावल्यास स्पष्ट होईल. कुमार वयापासूनच साधकाने ब्रह्मसाधना करावी, म्हणून कुमार वयाचा नचिकेतस पिता वाजश्रवसाला स्वतःला ब्राह्मणांना म्हणजेच ब्रह्माला दान करण्यास सांगतो.
 
पूर्व संस्कारांनी परिलुप्त झालेल्या वाजश्रवस वृत्तीला, साधकातील दुसर्‍या नचिकेतसवृत्तीचे हे म्हणणे समजूच शकत नाही. कुमार इंद्रिये म्हणजे, नचिकेतसाला ब्रह्माला समर्पण करण्याऐवजी वाजश्रवस नचिकेतसाला यमाला दान करतो. यम म्हणजे मृत्यू! म्हणजे कुमार वयापासूनच इंद्रिये ब्रह्मसाधनेला समर्पण करणारा विचार (नचिकेतस) नष्ट व्हावा म्हणजे मरावा, म्हणून पिता वाजश्रवस पुत्रवृत्ती नचिकेतसाला यमाला (मृत्यू वा नष्ट होणे) दान करतो. ही वृत्ती मोठी फसवी असते. आपल्यातील उत्पन्न झालेल्या चांगल्या वृत्ती, आपल्यालाच सहन होत नाहीत. सत्प्रवृत्तीचा आणि असत्प्रवृत्तीचा हा झगडा या नचिकेतस आख्यानाद्वारे, उपनिषदकारांनी मोठ्या कौशल्याने ग्रंथित केला आहे. (क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)

योगिराज हरकरे
9702937357
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराची सवलत नाही - बाबासाहेबांच्या आरक्षणाचा अपमान थांबवाच!

धर्मांतराच्या जाळ्यात नुकताच ऋतुजा राजगेसारख्या गर्भवती, सुशिक्षित युवतीचा दुर्दैवी अंत झाला. तिच्या श्रद्धेचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा छळ करण्यात आला. या घटनेनंतर आता तरी आरक्षणाचा लाभ घेणार्‍या समाजाला जागं होणं अत्यावश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आरक्षण व्यवस्था धर्मांतरासाठी नव्हे, तर सामाजिक न्यायासाठी होती. शतकानुशतके शोषित राहिलेल्या घटकांना सन्मानाने उभं राहता यावं म्हणून होती. मात्र, आज जिहादी आणि ख्रिस्ती मिशनरी वृत्तीने प्रेरित झालेल्या धर्मांतरितांकडून, या व्यवस्थेचा दुरुपयोग ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121