इतिहासात भारतीय राजांनी सर्वंकष स्थापत्यकलेला चालना दिली. त्यामुळेच भारतात अनेक मंदिरे, शिल्पे उभी आहेत. हा भारतीय स्थापत्यकलेच्या तत्कालीन प्रगतीचा वारसा आहे. असाच एक वारसा सांगणारे मंदिर म्हणजे प्रवरा काठचे अमृतेश्वर मंदिर! या मंदिराचा स्थापत्यशैलीच्या अंगाने घेतलेला आढावा...
अमृताची प्राप्ती व्हावी म्हणून देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रमंथन चालू होते. अख्खा समुद्र खवळला गेला आणि तिथून अमृताचा कुंड बाहेर पडला. त्या सगळ्यामध्ये त्या अमृताचा एक थेंब महाराष्ट्रातल्या एका जागेवर पडला आणि तिथे प्रवरा नदीची सुरुवात झाली. प्रवरा नदीच्या उगमाची एक अत्यंत सुंदर कथा तिथले ग्रामस्थ आपल्याला सांगतात. या प्रवरा नदीच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय नयनरम्य आणि निसर्गाने भरभरून वरदान दिलेला आहे. एका बाजूला भंडारदर्याचे जंगल, एका बाजूला हरिश्चंद्रगडाचे जंगल, एका बाजूला सांदण दरी आणि एका बाजूला कळसुबाईचे मोठे शिखर! या सगळ्यांनी वेढलेल्या जागेमध्ये येतो तो रतनगड आणि त्या रतनगडाच्या पायथ्याशी आपल्याला दिसते, शंकराला अर्पण केलेले अमृतेश्वराचे अतिशय सुंदर मंदिर!
साधारण आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने, या भागामध्ये आपले राज्य स्थापन केले आणि खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या धार्मिक आणि ऐतिहासिक प्रगतीला इथूनच सुरुवात झाली. त्यानंतर अनेक वेगवेगळ्या राजघराण्यांनी इथे राज्य केले. यात सातवाहनपासून ते १३व्या शतकामधील यादवांपर्यंत, अशा अनेक वेगवेगळ्या राजघराण्यांचा समावेश आहे. या सर्वांनी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मोठेच योगदान दिले आहे. त्यामधील एक महत्त्वाचे राजघराणे म्हणजे शिलाहार राजघराणे! या शिलाहार राजघराणातल्या झांज नावाच्या राजाने साधारण दहाव्या शतकामध्ये, या अमृतेश्वर मंदिराची रचना केली. पुणेकरांना राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-ओतूर-राजुर या मार्गे अमृतेश्वरापर्यंत पोहोचता येते; तर मुंबईकरांना कसारा-इगतपुरी-चिंचोली या मार्गे अमृतेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी उत्तम रस्ता आहे.
अमृतेश्वर मंदिराला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजूंनी गर्भगृहांमध्ये येण्यासाठी मार्ग आहेत. पश्चिमेच्या बाजूला एक छोटा द्वारमंडप असून, पूर्वेच्या बाजूला मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे मंदिराचे मोठे भाग आपल्याला दिसतात. हे मंदिर शिवाला अर्पण केलेले असून, याच्या गर्भगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये असणारी शंकराची पिंडी ही भूतलापेक्षा खाली असून, त्यामध्ये बर्याचदा पाणी साठलेले आपल्याला दिसते. पूर्वेच्या बाजूने मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा पद्धतीने आपल्याला गर्भगृहापर्यंत पोहोचता येते; तर पश्चिमेकडून थेट द्वार मंडपातून गर्भगृहातल्या शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्याची सोय, या मंदिरामध्ये केलेली आहे. गर्भगृह आणि मंडप यांना जोडणारा अंतराळाचा भाग हा अतिशय उत्तम सुशोभित केलेला आहे. याच्यामध्ये मंदिराची जी द्वारशाखा आहे म्हणजे गर्भगृहात प्रवेश करताना दाराची जी कड आपल्याला दिसते, त्याला पाच वेगवेगळे थर असून त्याच्यामध्ये खालच्या बाजूला शैव द्वारपाल, गंगा-यमुना आणि इतर सेवक यांची रचना केलेली बघायला मिळते. अंतराळाचे वितान म्हणजे छत हे गोलाकार असून, त्याच्या कोनाड्यांमध्ये आपल्याला कीर्तीमुख दिसते. हे राक्षसाचे मुख, येणार्या जाणार्या भक्तांचे पाप खायचे काम करतात आणि म्हणूनच त्यांची रचना मंदिराच्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारांवर, खांबांवर, उंबर्यांवर आणि द्वारशाखांवर केलेली आपल्याला बघायला मिळते.
या मंदिराचा सभामंडपही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असाच. याच्या मध्यभागी चार खांब आहेत. त्या चार खांबांमध्ये आपल्याला रंगशीळा दिसते. या रंगशिळेवर कलाकार आपली कला त्या देवतेला अर्पण करतो. मंदिराच्या चारही बाजूंना अजून छोटे छोटे अर्धस्तंभ आहेत आणि त्यावर या मंदिराचे वजन त्यांनी तोलून धरले आहे. दुर्दैवाने मंदिराचा जुना छताचा भाग काही काळापूर्वी क्षतीग्रस्त झाला पण, पुरातत्त्व खात्याने त्याचे संरक्षण करण्यासाठी आजूबाजूच्या भागातल्या वेगवेगळ्या विरगळ आणि मोठ्या शिळा वापरून, परत त्याचे बांधकाम केले आहे. या सभागृहामध्ये जे स्तंभ आहेत, ते स्तंभ अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आणि वेगवेगळ्या शिल्पांनी युक्त आहेत. यांच्या वरच्या बाजूला पिलर कॅपिटल म्हणजेच स्तंभशीर्ष हा जो भाग आहे, तिथे भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात. याची संकल्पना अशी आहे की, या यक्षांनी या संपूर्ण मंदिराचे वजन आपल्या खांद्यावर उचलून धरले आहे. या खांबांवर वेगवेगळ्या शंकराशी निगडित कथा-प्रसंग, पुराणकथा, देवी-देवता कोरलेल्या आपल्याला दिसतात. या मंदिराचा बाह्य भागदेखील खूप सुंदर तयार केला आहे. मंदिराच्या शिखरावर आपल्याला आमलक म्हणजे गोलाकार भाग दिसतो, हे शिखर सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिरासारखेच आहे. याला भूमिज प्रकाराचे मंदिर असे आपण म्हणू शकतो. छोटे छोटे शिखर एकत्र करून, वरपर्यंत अशी संपूर्ण लहान शिखरांची रांग इथे तयार केली आहे. गर्भगृहाच्या बाह्य भिंतीवर दोन्ही बाजूला दोन देवकोष्ठ असून, दुर्दैवाने आज त्यात कुठल्याही मूर्ती आढळून येत नाही. मंदिराच्या पश्चिमेला जो द्वारमंडप आहे, त्याच्या खांबावर खूप वेगवेगळी शिल्प आपल्याला दिसतात. यामध्ये सूर्याची शिल्प, गणपतीची शिल्प, त्याचबरोबर काही वादक, नर्तक, मल्लयुद्ध करणारी मंडळी अशा वेगवेगळ्या कथा इथे कोरल्या आहेत. तसेच, खांबांच्या सर्वांत खालच्या भागात चामुंडा, भैरव इत्यादी शक्ती आणि शिव यांच्याशी निगडित महत्त्वाची तत्त्वसुद्धा कोरलेली दिसतात. मंदिराच्या मंडपामध्ये महिषासूरमर्दिनीचे एक अतिशय सुंदर शिल्प आहे. खाली महिषाच्या आकारामधला असूर हा पूर्ण आडवा आहे, त्याच्या पाठीवर देवीने पायाने पूर्ण दाब देऊन त्याला झुकवला आहे. तसेच तो मान वाकवून देवी त्याच्याकडे बघते आहे आणि आपल्या हातातला त्रिशूल तिने त्याच्या मानेमध्ये खूपसला आहे, असे महिषासुरमर्दिनीचे सुंदर शिल्प तिथे आहे. यांच्याबरोबरच मंडपामध्ये कार्तिकेय, सरस्वती, विष्णु, गणपती, भैरव इत्यादी देवतांचीदेखील अतिशय सुंदर शिल्प आहेत. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करण्याआधी आपल्याला एक चौकोनी आकाराची पुष्करणी म्हणजे बारव दिसते. याच्या तीनही बाजूंनी आतमध्ये जाण्यासाठी पायर्या दिसतात. इथे विष्णु, गणपती आणि इतर वेगवेगळ्या देवतांच्या अनेक मूर्ती असून, त्यांची अनेक उपमंदिरेदेखील या ठिकाणी तयार केलेली आहेत.सह्याद्रीच्या नैसर्गिक मुलाम्यामुळे कुठल्याही बाजूने फोटो काढला, तरी या मंदिराचा फोटो उत्तमच येतो. हा परिसर निसर्गदृष्ट्या अतिशय सुंदर आहे. खूप छान धबधबे या भागांमध्ये आहेत. प्रवरा नदीच्या काठी अनेक कॅम्पिंग साईट्सदेखील आज तयार झालेल्या आपल्याला दिसतात. हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसुबाई, भंडारदरा, सांदण व्हॅली हेदेखील ट्रेकिंगच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे मार्ग इथे आहेत. हजारो लोक दरवर्षी या ठिकाणी जातात पण, त्यातली काहीच या अमृतेश्वराचे दर्शन घेतात. अगदी अमृतासारखे वाटणारे हे मंदिर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाने एकदा तरी बघावे असे आहे. त्यामुळे या पावसाळ्यात तिथे भेट द्यायला नक्की जा!
इंद्रनील बंकापुरे