
ललिता त्रिपुरसुंदरीची देवतांनी स्तुती केली आणि तिला भंडासुराचा वध करण्याची विनंती केली. त्यानंतर देवी आणि भंडासुराचे युद्ध झाले. या कार्यात तिला अणिमा, महिमा, ब्राह्मी, कौमारी, वैष्णवी, वाराही, माहेंद्री, चामुंडी, महालक्ष्मी, नित्यादेवता आणि श्री यंत्राला व्यापून असणार्या अवर्ण देवतांचे साहाय्य होते.
सम्पत्करी देवी पिलखाना अर्थात हत्तीदलाची प्रमुख असते. अश्वारूढा देवी घोडदलाची प्रमुख असते. किरीचक्रावर आरूढ होऊन दंडीनी देवी, भूदलाचे नेतृत्व करते. तिला साहाय्य करणारी देवी मंत्रिणी गेयचक्र रथावर आरूढ असते. ज्वालामालिनी देवी सैन्याच्या सभोवताली अग्निचक्र निर्माण करून, त्यांचे संरक्षण करते. चक्रराज रथावर आरूढ होऊन, पराशक्ती स्वतः युद्धसज्ज असते.
तिचे वर्णन षोडशी स्वरूपात नित्यादेवी म्हणून केले जाते. वास्तवात नित्यादेवी हे तिचे अंशात्मक रूप आहे. तिचे षोडशी स्वरूप म्हणजे, १६ प्रकारच्या कामनांचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. ही १६ स्वरूपे अनुक्रमे खालीलप्रमाणे कामेश्वरी, भगमलिनी, नित्यलीन्ना, भेरुंडा, वन्हिवासिनी, महावज्रेश्वरी, शिवदुती, त्वरिता, कुलसुंदरी, नित्यानित्या, निलपताका, विजया, सर्वमंगला, ज्वालामालिनी वचित्रा. षोडशी अर्थात सोळावी देवी, ती स्वतः श्री ललिता त्रिपुरसुंदरी आहे. १६वा नित्य तिचा स्वतःचा आहे आणि बाकी सर्व १५ तिच्यात राहतात. प्रत्येक देवी विविध प्रकारच्या इच्छांची पूर्तता करते.
नित्यादेवी भंडासुराच्या सैन्याच्या मोठ्या भागाची हानी करते, बाला त्रिपुरसुंदरी अर्थात श्री ललिता त्रिपुरसुंदरीची नऊ वर्षीय कन्या, भंडासुराच्या ३० पुत्रांचा वध करते. मन्त्रिणी आणि दंडीनी त्याच्या दोन बंधूंचा अनुक्रमे विशंग आणि विशुक्राचा वध करतात. त्यानंतर तो असुर ललितादेवीच्या सैन्याच्या मधोमध जयविघ्न यंत्र फेकतो. त्या यंत्राच्या प्रभावाने ललितादेवीचे सैन्य थिजते, त्यांचा आत्मविश्वास लयाला जाऊ लागतो. त्यावेळी श्री ललिता देवीकडे कामेश्वर (तिचा पती/शिव) एक प्रेमकटाक्ष टाकतो, त्याचे फलित म्हणून श्री ललितादेवी श्रीगणेशाला निर्माण करते. श्रीगणेशाने पुर्यष्टकावर मात केलेली असते. त्यामुळे केवळ तोच जयविघ्न यंत्र निष्प्रभ करण्यास सक्षम असतो. श्रीगणेश जयविघ्न यंत्र नष्ट करतो आणि त्यानंतर श्री ललिता देवीच्या सैन्याची आगेकूच सुरू होते.
त्यानंतर भंडासूर हिरण्याक्ष हा हिरण्यकश्यपु आणि रावण या असुरांना निर्माण करतो. त्यानंतर देवी विष्णूचे दशावतार निर्माण करते आणि त्यांचा नाश करते. त्यानंतर ती भंडासुराचे संपूर्ण सैन्य पाशुपतास्त्र वापरून नष्ट करते आणि भंडासुराचा वध कामेश्वरास्त्र वापरून करते. त्यानंतर देव श्री ललिता देवीची स्तुती करतात. त्यानंतर ती मन्मथ अर्थात कामदेवाला विश्वातील सृजनचक्र पुनश्च सुरू व्हावे, या हेतूने पुनरुज्जीवित करते.
भंडासुराच्या वधाच्या आख्यानात श्री वाराही देवीने घोर पराक्रम केला आहे. वाराही देवी ही श्री ललिता देवीच्या सैन्याची मुख्य सेनापती आहे. तिच्या सैन्य तुकडीचे आणि तिचे अत्यंत अनुपम वर्णन ब्रह्मांड पुराणात केले आहे.
दंडनाथा अर्थात वाराही देवीचे सैन्य हे श्वेतछत्र धारण करून, पदन्यास करत निघाले आहे. तिचे सैन्य हातात दंड आणि शूल धारण करून चालत आहे. त्यांच्या दाढा अत्यंत कराल आणि उग्र आहेत. त्यांच्या सुळ्यांमधून अग्निशलाका आणि धूर निघत आहे. त्यांचा वर्ण तमाल वृक्षासमान श्यामल आहे.
त्यांची मुद्रा अत्यंत उग्र आणि त्यांचे नेत्र अत्यंत क्रुद्ध होते. त्या सैनिकांचे मुख वराहासमान होते आणि अशा असंख्य शक्ती पायी चालत होत्या; काही म्हशीवर आरूढ होऊन निघाल्या होत्या. यांच्या मध्यभागी दंडनाथ देवी अर्थात वाराही देवी, आपल्या किरीचक्र रथात आसनस्थ होती. वाराही देवी आपल्या रथातून उतरून आपले वाहन महासिंहावर आरूढ झाली. या महासिंहाचे नाव वज्रघोर असून, तो चालताना त्याची सोनेरी आयाळ कंप पावत होती. हा सिंह अत्यंत उग्र होता, त्याचे जबडे वासलेले होते, त्याचे विकट सुळे केवळ बघूनही भय निर्माण होत होते. त्याच्या अस्थी कासवाच्या पाठीसमान कडक होत्या आणि त्याच्या नख्या लांब आणि धारधार होत्या. त्याची उंची तीन योजनं होती आणि तो चालताना आपली शेपटी हलवत होता. अशा विक्राळ वाहनावर बसून ही देवीच्या सैन्याची सेनापती, अर्थात वाराही देवी युद्धसज्ज झाली होती.
तिच्या चेहर्यावरील उग्र भाव पाहून देवांना वाटले की, आज ही महादेवी आपल्या क्रोधाने समस्त जगताला भस्मीभूत करेल किंवा आपल्या सुळ्यांनी, ती पृथ्वीची दोन शकले करून टाकेल. देवीचे हे उग्र आणि रौद्र रूप पाहून समस्त देव भयभीत झाले आणि देवीची स्तुती करण्यासाठी, तिच्या अत्यंत प्रभावी अशा द्वादश नामांनी तिची आळवणी करू लागले.
श्री वाराही देवीची अत्यंत कल्याणकारी द्वादश नामे पंचमी, दंडनाथा, संकेता, समयेश्वरी, समय संकेता, वाराही, पौर्त्रिणी, वार्त्ताली, महासेना, आज्ञा, चक्रेश्वरी, अरिध्वनी ही होय. या द्वादश नामांचे मिळून एक वज्रपंजर तयार होते, ज्याच्या आत असणारा साधक सुरक्षित राहतो. म्हणून साधकाला प्राणभय निर्माण झाले, तर तो देवीच्या या द्वादश नामाचा पाठ करून स्वतःला नामरुपी वज्रपंजरात सुरक्षित ठेवतो. भयभीत देवांनी या वज्र पंजर नामावलीचे पठण करून देवीची कृपा प्राप्त केली. वाराही देवीचे हे वज्रपंजर ‘लव्ह जिहाद’च्या परिस्थितीत अडकलेल्या मुलीला सोडवण्यासाठी, अत्यंत साहाय्यक सिद्ध होऊ शकते. याच कथेला एका साधकाच्या देहातील अंतर्गत घटना म्हणून पाहिले, तर तिचे विवेचन असे असेल. ‘अंतःकरण चतुष्टय’ या संकल्पनेत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही चार तत्त्वे अंतर्भूत असतात. ही चार तत्त्वे देहाशी संलग्न घटक आहेत. यांचा आणि आत्म्याचा कोणताही संबंध नाही.
दक्ष याचा अर्थ कौशल्य असलेली व्यक्ती. ज्या व्यक्तीकडे एखादे कौशल्य असते, त्याला आपोआप अहंकार निर्माण होतो आणि त्यामुळे त्याचे आत्मिक अधःपतन होते. आपल्यातील आत्मतत्त्व हे शिवस्वरूप सच्चिदानंद अवस्थेत असते. अहंकाराने बद्ध मानव आपल्या अंतर्मनाचा आवाज नाकारून कार्य करतो, त्यानंतरच कोणत्या ना कोणत्या समस्येत अडकतो. दक्ष कन्या सती ही दैवी शक्तीचे, सत्याचे प्रतीक आहे, जिचे लग्न शिवाशी होते. ज्यावेळी अहंकार पराकोटीला पोहोचतो, त्यावेळी अंतर्मनाचा आवाज पूर्णपणे चिरडण्याची प्रवृत्ती निर्माण होते. या टप्प्यावर दक्ष सतीचा अपमान करतो. सती सांगत असते ते पूर्ण सत्य असते. परंतु, ते पचवणे दक्षाला जमत नाही. कारण, अहंकार आडवा येतो.
शुद्ध चेतना स्वरूप शक्ती अग्निकाष्ठे भक्षण करते, अर्थात, अंतर्मनाची बोच पूर्णपणे नाकारली जाते. ज्यावेळी अहंकारातून ती दुर्दैवी घटना घडून जाते, त्यानंतर मग अंतर्मन आपल्याला बोचणी लावते आणि याचा परिणाम म्हणून आत्मतत्त्व असणारे शिव दक्षाला दंड देतात. त्यानंतर मन्मथ अर्थात कामदेव जागृत होतो आणि तो त्याचा खेळ रचतो. यात एक तर व्यक्ती वासनांच्या आहारी जाऊ शकते किंवा या वासनांचे दमन करू शकतो. आत्मतत्त्व स्वरूप शिव मन्मथाला आपल्या ज्ञानचक्षूंनी भस्मीभूत करतात. त्यानंतर देवांच्या विनवणीनुसार त्याचे पुनरुज्जीवन होते, पण त्यातून तो भंडासुराच्या रूपाने जन्म घेतो, जे आपल्या अतृप्त वासनांचे मूर्त स्वरूप आहे.
भंडासुर आणि मन्मथ हे रजोगुण आणि तमोगुणाचे प्रतीक आहे, म्हणजेच हे वासना आणि क्रोध याचे प्रतीक आहे. अपूर्ण वासना या रागाला जन्म देतात. वासना हेच दुःखाचेसुद्धा मूळ असते. त्यामुळे क्रोध आणि काम या वासनांवर मात करणे आवश्यक आहे. यांना पूर्ण शून्य करणे शय नाही. परंतु, त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे निश्चितपणे शय आहे. हे नियंत्रण मिळवणे आपल्याला धर्माचरण आणि श्री ललिता देवीची - श्री कामाक्षीची उपासना केल्याने शय होते.
सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण अनुक्रमे न्याय्य कृती, अंधाधुंध कार्य आणि निष्क्रियता दर्शवितात. भंडासुरावर विजय मिळवून आणि मन्मथाला निष्प्रभ करून, श्री कामाक्षी देवी हे सिद्ध करते की, अकार्यक्षम राहून आणि जबाबदारीचे निर्वहन टाळून समस्या सुटत नाही; उलट अकार्यक्षमतेमुळे समस्या वृद्धिंगत होते. म्हणून सत्वगुणांचे पालन करून कार्यप्रवण असणे, हेच इष्ट आहे. शक्ती ही क्रोधाचा नाश करते आणि आपल्या चित्ताला वासनांपासून उन्नत करून, क्रोधाला शांततेत परिवर्तित करते. हे परिवर्तन श्री ललिता सहस्त्रनामाच्या पठणामुळे होते. बाह्य जगाचा मोह आणि क्रोध व वासनेच्या आहारी गेलेल्या आपल्या चित्ताला अंतर्मुख करून शांतता, तृप्ती आणि सच्चिदानंद स्वरुपाची अनुभूती या पठणामुळे प्राप्त होते. शिवाचे हे शक्तीशी असणारे ऐयरूप आत्मरति म्हणून ओळखले जाते. क्रमशः