आशयनिर्मितीचे ‘आदित्य’ किरण

    16-Nov-2023
Total Views |
Aditya Vikasrao Deshmukh

ध्वनीआरेखन ते चित्रपट निर्मितीपर्यंतचा प्रवास तरुण वयातच केलेले आदित्य विकासराव देशमुख यांच्या आजवरच्या प्रवासाचा परिचय करुन देणारा हा लेख...


ध्वनीआरेखनापासून आदित्य विकासराव देशमुख यांची वाटचाल सुरू झाली. आज तरुण वयात चित्रपट महोत्सवात लक्षवेधी ठरणार्‍या चित्रपटाचे एक निर्माते म्हणूनही ते ओळखले जातात. ‘पोस्ट प्रॉडक्शन्स’ सुविधा देत त्यांनी करिअरचा श्रीगणेशा केला आणि पुढे ‘कोविड’ काळानंतर आपल्या या अनुभवाला सर्जनशीलतेची जोड देत ते निर्मिती क्षेत्राकडे वळले.मुळात आदित्य यांची सुरुवात तंत्रज्ञान विषयापासून झाली. अभियांत्रिकी शाखेतील शिक्षणानंतर त्यांनी प्रारंभी काही काळ नोकरीही केली. पण, नंतर त्यांना लक्षात आले की, आपली ‘क्रिएटिव्ह भूक’ नऊ ते पाच स्वरुपाच्या नोकरीत अजिबात पूर्ण होणारी नाही. आपल्याला पूर्णवेळ ‘इनोव्हेटिव्ह’ क्षेत्रात काम करावं लागेल, हे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्याअनुषंगाने त्यांची पावलं पुढे पडत गेली.

आदित्य सांगतात की, “घरामध्ये तसे संगीत होतेच. पण, मला विज्ञान-तंत्रज्ञानाशी असलेले नातेही तोडायचे नव्हते. मग काय, संगीत आणि विज्ञान अशा दोहोंची सांगड घालणारा ‘साऊंड इंजिनिअरिंग’ हा पर्याय मला छान वाटला.” आदित्य लहान असताना त्यांच्या आईच्या दोन कॅसेट्सही रेकॉर्ड झाल्या होत्या. त्यावेळी आईसोबत असल्याची आठवणही ते सांगतात. त्या वयातही त्यांना ‘साऊंड रेकॉर्डिंग’चे प्रचंड कुतूहल वाटले. पुढे आदित्य यांनी ‘साऊंड इंजिनिअरिंग’चा एक अभ्यासक्रमदेखील पूर्ण केला आणि स्टुडिओत कामही स्वीकारले. तिथे त्यांना या क्षेत्रासंबंधी बरेच काही शिकता आले. त्यानंतर पुण्यात स्वतःचा स्टुडिओ उभारण्याचा निर्णय आदित्य यांनी घेतला. या सगळ्या प्रवासात घरच्यांचा खूप सकारात्मक पाठिंबा मिळाल्याचे आदित्य आवर्जून नमूद करतात.
 
स्टुडिओत आदित्य यांनी सुरुवात ध्वनीआरेखनापासून केली. मग पुढे एडिटिंगही सुरू झाले. नंतर एक-दोन म्युझिक व्हिडिओ करणार्‍या मित्रांसाठी पार्श्वसंगीताचे कामही त्यांनी केले. त्यानंतर फिल्मच्या रंगसंयोजनावर काम सुरू केले. अशा अनेक गोष्टी त्यांनी एकाच छताखाली देण्यास सुरुवात केली. अनेक फिल्मससाठी त्यांनी ‘पोस्ट प्रोडक्शन’ची कामे केली, त्यात गाजलेल्या काही चित्रपटांचाही समावेश होता.‘कोविड’ काळात त्यांनी विचार केला की, आपल्याकडे आवश्यक सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर आशयनिर्मितीचा विचार का करू नये? जे करायचे, ते उत्तमच करायचे, असा विचार करून मग त्यांनी काम सुरू केले. आधी एका मित्राच्या म्युझिक व्हिडिओची सहनिर्मिती केली. त्यानंतर ‘जीव जडला’ या गाण्याच्या व्हिडिओची निर्मिती केली. असे दोन म्युझिक व्हिडिओ केल्याचे आदित्य सांगतात. पुढे एका फिल्म प्रोजेक्टला सहनिर्माते होण्याबाबत एका मित्राकडून त्यांना विचारणा झाली. ‘पोस्ट प्रोडक्शन’मध्ये एकदा फायनल फाईल दिली की, चित्रपट वितरणाच्या पुढच्या टप्प्यांशी संबंध नसतो. हे पुढचे टप्पे अनुभवण्याची संधी ‘स्टोरी ऑफ लागीर’ने दिली असे आदित्य सांगतात.

उत्तम चित्रपट बनू शकेल, अशी कथा- पटकथा लवकरच त्यांच्यापुढे आली. मयूर करंबळीकर या मित्राची ‘डायरी ऑफ विनायक पंडीत’ची संहिता पुढे आली. आदित्य सांगतात की, संहिता पातळीवर ती खूप छान कथा होती, तरी त्याबद्दल भरपूर विचार केला. कारण, चित्रपटनिर्मिती ही सोपी गोष्ट नाही. मोठे अर्थकारण त्यामागे असते. अनेक मंडळी या सगळ्या निर्मिती प्रक्रियेत जोडली गेल्याचे त्यांनी नामोल्लेखांसह सांगितले.‘पोस्ट प्रोडक्शन’मधला अनुभव आदित्य यांच्या गाठीशी होताच. चित्रीकरण संपल्यावर अल्पावधीत सगळी कामे संपवून ती पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (‘पीफ’) दाखल केली. ‘पीफ’ महोत्सव लहानपणी आदित्य यांनी पाहिला होता. अशा महोत्सवात आपली फिल्म सहभागी होणे, हा अभिमानाचा क्षण असल्याचे आदित्य सांगतात.
 
लातूरच्या चित्रपट महोत्सवात चित्रपट प्रदर्शित होणार आहे, असे कळले तेव्हा तर त्याचा आनंद खूप वेगळा होता. कारण, आजही मराठीचा मूळ प्रेक्षकवर्ग हा मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र भागात मोठ्या प्रमाणात आहे. लातूरला जो रसिकांचा प्रतिसाद, प्रतिक्रिया मिळाला, त्यातून आदित्य यांनाही खूप काही शिकायला मिळाले. चित्रपटात एका शिक्षकाची गोष्ट आहे. हे आमचं जगणं मांडलं आहे, अशी काहींची प्रतिक्रिया होती. अशा गोष्टी आमच्यापुढे नेहमी का येत नाहीत, असा प्रेक्षकांचा प्रश्न होता. याविषयी बोलताना आदित्य सांगतात की, “मराठी प्रेक्षकांची भूक काय आहे, त्यांना कुठल्या प्रकारचा ‘कंटेट’ पाहायला मिळतो, याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आपल्या फिल्म्स कशा होत्या, हे आपणच आपल्या इतिहासात डोकावून पूर्वीच्या चित्रपटांत पाहिले पाहिजे. आपण आपल्या संस्कृतीला धरून चित्रपट, आशयनिर्मिती केली, तर तो मराठी प्रेक्षक नक्की उचलून धरेल, आम्हाला हे लातूरला लक्षात आले.”

“मराठीत आशयनिर्मिती करणार्‍यांनी थिएटर, ओटीटी ही सगळी माध्यमे वापरली पाहिजेत. मराठी प्रेक्षक आहेच, तो कुठे जात नाही, आपण निर्माते म्हणून त्यांना काय देतोय हे महत्त्वाचे आहे,” असे निरीक्षणही आदित्य यांनी नोंदवले.आदित्य यांनी ध्वनीआरेखन म्हणून सुरुवात केली आणि आशयनिर्मितीपर्यंत त्यांचा प्रवास आज पोहोचला आहे. “इथल्या चांगल्या कथा पुढे येणे महत्त्वाचे आहे, नाही तर भविष्यकाळात ‘एआय’ येत आहे, त्याने सगळ्या गोष्टी रोबोटिक होऊन जातील,” असे जेव्हा आदित्य सांगतात, तेव्हा ते तरुण मराठी आशयनिर्मात्यांचे प्रातिनिधिक मत वाटते. आदित्य यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!

मनोज तुळपुळे




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.