समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर, पुण्यातील झोपडपट्टीत राहून केवळ स्वतःचाच नव्हे, तर अनेकांच्या जीवनप्रवासाला वळण लावणार्या कुमार हनुमंत पंजलर यांच्याविषयी...
मूळ कर्नाटकातील असलेले पंजलर कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. कुमार यांचे वडील गवंडीकाम करत, तर आई मंडई भागातल्या एका रुग्णालयामध्ये काम करायची. अशा सामान्य पार्श्वभूमीत कुमार यांचे बालपण गेले. झोपडपट्टीतील दैनंदिन शिव्याशाप, भांडणे, दारूबाज वातावरणामुळे लहानपणीच त्यांचे बालमन अस्वस्थ झाले. शाळेत मन न लागणे, सतत ओरड-झिडकार सहन करणे या सर्वांचा परिणाम म्हणून नैराश्याची भावना निर्माण झाली. पण, एका टप्प्यावर त्यांनी स्वतःला जागे केले. मनाशी ठाम निर्धार केला की, या सगळ्यातून बाहेर पडायचे, काहीतरी वेगळे, चांगले आणि समाजासाठी करायचे. याच विचारांतून त्यांनी ‘पतीत पावन संघटना’ या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या संघटनेत सक्रिय सहभाग घेतला. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शहरातील विविध भागांत गरीब, वंचित आणि पीडितांसाठी लढा दिला. मुलींच्या छेडछाडीविरोधात मोर्चे, आंदोलने केली. मुस्लीमबहुल भागात होणार्या जिहादी अत्याचारांविरुद्ध आवाज उठवला. या कार्यातून त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीची आणि हिंदुत्वाची खोलवर जाणीव निर्माण झाली.
हिंदुत्व विचारांबरोबरच त्यांनी सामाजिक उत्सव, सार्वजनिक सणांचे आयोजन सुरू केले. गणेशोत्सव, शिवजयंती, दहीहंडी अशा उपक्रमांतून त्यांनी तरुणाईला एकत्र केले. पुढे ‘भगवा ग्रुप’ स्थापन करून त्यांनी समाजात बदल घडवण्याची दिशा स्पष्ट केली. प्रारंभी काही विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. कार्यक्रमांमध्ये अडथळे आणण्याचाही प्रयत्न केला. पण, कुमार आणि त्यांच्या सहकार्यांनी त्या विरोधांना नेटाने सामोरे जात, आपले कार्य अधिक ठामपणे सुरू ठेवले. त्यांच्या कार्याचे खर्या अर्थाने रूपांतर तेव्हा झाले, जेव्हा त्यांनी ‘भगवे ट्रेकर्स’ ही संस्था स्थापन केली. गडसंवर्धन, इतिहासजागर आणि युवा संघटन या त्रिसूत्रावर आधारित असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वस्तीतील तरुण मुलामुलींना गड-दुर्गांची ओळख करून दिली. दिवाळीच्या सुमारास आयोजित होणार्या गडदौर्यांमध्ये दरवर्षी 200 ते 250 मुले सहभागी होतात. या ट्रेकिंगद्वारे केवळ साहस नव्हे, तर इतिहास, शौर्य आणि संस्कृती यांचीही शिकवण दिली जाते. या उपक्रमांमुळे मुलांच्या विचारांमध्ये बदल घडला. मोबाईल गेम्स, समाजमाध्यमांच्या आहारी गेलेल्या तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण झाली. ‘भगवे ट्रेकर्स’ने आपल्या उपक्रमांना केवळ ट्रेकिंगपुरते मर्यादित न ठेवता, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विस्तार केला. यामध्ये त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक टप्पा म्हणून महिला कबड्डी संघाची स्थापना केली. यामुळे वस्तीतील मुलींना आत्मविश्वास आणि एक वेगळी ओळख मिळाली. आज या संघातून अनेक मुली जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत.
‘भगवे ट्रेकर्स’च्या उपक्रमांमध्ये अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, सार्वजनिक जयंती आणि सणांचे आयोजन. दि. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांची जयंती, श्रीराम नवमी, महाशिवरात्र अशा अनेक सणांचा ते वस्तीतील लोकांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करतात. यातून त्यांनी धार्मिकतेच्या मर्यादेपलीकडे जाऊन सामाजिक सलोख्याची भावना जागृत केली आहे. 2025 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुण्यातील सोमवार, मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौकात आयोजित केलेला कार्यक्रम त्यांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या कार्यक्रमात हिंमतगडाची प्रतिकृती उभारण्यात आली. महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले आणि मुलांसाठी मोफत ट्रेकिंग सहलीचे नियोजन करण्यात आले. याच कार्यक्रमातून ‘भगवे ट्रेकर्स’ ही संस्था समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारी असल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. कुमार यांचे कार्य केवळ संघटनात्मक नाही, तर प्रेरणादायी आहे. झोपडपट्टीतून उगम पावलेला हा संघर्ष आज शेकडो तरुणांसाठी आशेचा किरण ठरला. त्यांची वाटचाल ही हिंदुत्वाचा झेंडा हाती घेऊन चालणारी असली, तरी ती समाजहिताच्या व्यापक परिप्रेक्ष्यातून घडलेली आहे. ‘हिंदुत्व म्हणजे केवळ धर्म नव्हे, तर संस्कृती, आत्मगौरव आणि समाजप्रेम’ हे त्यांनी आपल्या कामातून सतत सिद्ध केले आहे.
आज त्यांच्या ‘bhagvestrekers' या इन्स्टाग्राम पेजवरून त्यांच्या उपक्रमांची झलक पाहता येते. कुमार हनुमंत पंजलर यांचा प्रवास हा केवळ झोपडपट्टीतून यशाकडे गेलेला मार्ग नाही, तर तो एका विचारशील, समर्पित, देशप्रेमी आणि समाजाभिमानी तरुणाचे आत्मकथन आहे. समाजातील प्रत्येक तरुणाने त्यांच्या कार्यातून शिकून समाजासाठी योगदान द्यावे, हाच त्यांचा संदेश आहे.
कुमार हनुमंत पंजलर हे त्या नवभारताचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या कार्यातून प्रत्येक तरुणाने शिकण्यासारखे आहे. आपल्यात बदल घडवायचा असेल, तर आधी समाजात बदल घडवण्याचे स्वप्न बघा. कारण, अशा स्वप्नांमधूनच उद्याचा समर्थ भारत घडतो. कुमार यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे अनेक शुभेच्छा!
सागर देवरे