समाजातील वंचित मुले डोळस, स्वावलंबी व्हावीत, हा ध्यास उराशी बाळगून ‘माझं घर’ प्रकल्पाअंतर्गत समाजकार्य करणार्या लातूरच्या शरद झरे यांच्याविषयी...
दर महिना लाखो रुपये कमविण्याची क्षमता असतानाही, ऐशोआरामाचे जीवन सोडून समाजासाठी झटणारे विरळेच. दरमहा लाखोंचे उत्पन्न देणारा व्यवसाय बंद करून समाजसेवी उपक्रमांना आयुष्य समर्पित करणारे लातूरचे शरद केशवराव झरे हे त्यांपैकीच एक. त्यांच्या समाजशीलतेमुळे गेल्या सहा वर्षांत कित्येक वंचित मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले आहे.
लातूरच्या निलंगा तालुक्यातील वडगाव या छोट्याशा गावात शरद झरे यांचा जन्म झाला. इथली माती, पाणी, माणसांच्या सहवासात त्यांचे संपूर्ण बालपण गेले. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गावातील जि. प. प्रशाला येथे घेतले. पुढे आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण साधारण दोन किमी अंतरावर असलेल्या शेजारच्याच शिवणी (को) या गावी झाले. याच कालावधीत ते शेतीतील विविध कामेही शिकले. त्याचा फायदा आज शरद यांना आपला प्रकल्प चालवताना होतो. लातूरच्या नामवंत राजर्षी शाहू महाविद्यालयात त्यांचे ‘बीए’चे शिक्षण झाले व ‘एमआयटी लातूर’मधून ‘बीजेसी’ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून ‘एमजेसी’ केले. याच काळात अनेक सामाजिक संघटनांशी ते जोडले गेले.
घरी आईवडील, दोन भाऊ, चार बहिणी असा मोठा परिवार. वडील पेशाने शिक्षक. तरीही वडिलांची इच्छा होती की, शरद यांनी शेतीच करावी. मात्र, शरद यांना शिक्षणाची आवड असल्याने वडिलांकडे हट्ट धरून बारावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले. या वयातच त्यांची सामाजिक कार्याची जडणघडण होत गेली. समाजासाठी आयुष्यभर काम करत राहायचे, हा दृढसंकल्प करून आजतागायत ते समाजासाठी कार्यरत आहेत. मधल्या काळात ते पत्रकारिता क्षेत्राकडे वळले. त्यातूनच ‘बॅचलर ऑफ जर्नालिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन’ झाले खरे. मात्र, ते जास्तकाळ पत्रकारिता क्षेत्रात रमले नाहीत आणि ते पुन्हा आपल्या गावी आले. 2007 साली राज्यातला तरुण सरपंच होण्याचा मान तेव्हा त्यांनी मिळवला. अवघ्या दोन वर्षांत साधारण दोन कोटींची विकासकामे करून गावाला सतत भेडसावणारा पाणीप्रश्न त्यांनी मार्गी लावला. इतके होऊनही ग्रामीण भागातील राजकारणामुळे त्यांना सरपंचपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, पुढे जिल्हाभरात पर्यावरण संवर्धन, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरे तसेच मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरे आयोजित करून पुढे चार वर्षे अशा विविध कामांतून लोकसेवा ते करत राहिले.
डोक्यावर कर्ज होतेच, मात्र ते खचले नाही. त्यांनी भाजीपाला विक्रीचे दुकान टाकले आणि परिसरातील उपाहारगृहांना भाजीपुरवठा करण्याचे काम सुरू केले. त्यात चांगला जम बसला आणि चार वर्षांत कर्ज फेडले. परंतु, शरद यांच्या मनाची कुठेतरी समाजकार्यासाठी चलबिचल सुरु होती. वंचित मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, ते स्वाभिमानाने जीवन जगले पाहिजेत, असा विचार करून त्यांच्यासाठी कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. परळी तालुक्यातील वानटाकळी येथे 22 निराधार मुलांना स्वावलंबी बनवत, शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. काही कारणास्तव तो नंतर बंद पडला. तिथून अंबाजोगाई येथे सहा महिने उपक्रम राबविला. याच दरम्यान ‘माणूस प्रतिष्ठान’ची स्थापना झाली आणि 2018 साली लातूर तालुक्यातील मौजे काडगाव येथे शरद आणि त्यांची पत्नी संगीता झरे यांनी ‘माझं घर’ हा उपक्रम सुरू केला. शिक्षणापासून वंचित, निराधार, एकल पालक, कला केंद्र, वेश्यावस्ती, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींसाठी या प्रकल्पाअंतर्गत कार्य सुरू आहे. आज या प्रकल्पात 40 मुले आणि 21 मुली असे एकूण 61 जण वास्तव्यास आहेत.
आज हा प्रकल्प 30 टक्के स्वावलंबी झालेला आहे. पण, तो 100 टक्के स्वावलंबी करण्यासाठी शरद यांचे प्रयत्न सुरू आहेत. ‘माझं घर’ प्रकल्पातील मुलांना पुस्तकी शिक्षणासोबतच शेतीतील कामे, भाजीपाला लागवड, गणेशमूर्ती तयार करणे, पणती तयार करणे, आकाशकंदील बनवणे, होमहवन सामग्री तसेच, मोठ्या प्रमाणात गोवर्या बनवणे, झेंडू फुले उत्पादन आणि विक्री, गांडूळ खतनिर्मिती इत्यादींचे धडे दिले जातात. प्रकल्पातील मुलांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींची लातूरमध्ये तर प्रचंड चर्चा झालीच होती. परंतु, त्यांनी बनवलेल्या मूर्ती लातूरकरांनी मोठ्याप्रमाणात विकत घेतल्या. आज ‘माझं घर’ प्रकल्प कोणाच्याही मदतीविना सुरू आहे. प्रकल्पातील मुलांचा सांभाळ करण्यासाठी होणारा खर्च हा मुलांनीच तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून केला जातो. या कार्यासाठी शरद यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असले, तरी समाजातील वंचित मुले डोळस, स्वावलंबी व्हावीत, इतकाच शरद यांचा ध्यास आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी शरद झरे यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!