जनसेवेचे दीपस्तंभ

    11-May-2025
Total Views | 11
जनसेवेचे दीपस्तंभ
 
‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ हा अभंग प्रत्यक्षात जगत, त्याच्यानुसार समाजातील दिव्यांगासाठी कार्य करणार्‍या माधवी जोशी यांच्याविषयी...


माधवी यांचा जन्म दि. 7 डिसेंबर 1969 साली कुर्ला येथे झाला. त्यांचे बालपण सांस्कृतिक शहर असलेल्या डोंबिवलीत गेले. त्यांचे वडील मनोहर दामले हे सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर होते, तर आई नलिनी या गृहिणी. माधवी यांना दोन भावंडे आहेत. माधवी सगळ्यात मोठ्या त्यानंतर बहीण आणि धाकटा भाऊ असे त्यांचे कुटुंब. त्यांचे शालेय शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, राणाप्रताप येथे झाले. इयत्ता सातवीत असताना जिल्हास्तरीय आंतरशालेय कबड्डी स्पर्धेत, त्यांच्या शाळेच्या संघाला उपविजेता होण्याचा मान मिळाला. त्या कबड्डी संघाच्या माधवी या उपकर्णधार होत्या. कबड्डी खेळात त्यांनी मिळविलेले विशेष प्राविण्य आणि प्रमाणपत्राच्या जोरावर त्यांना, ‘मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स’ या नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला. 1990 साली त्यांनी ‘बीकॉम’ ही पदवी मिळविली. शिक्षण पूर्ण होताच लगेच ‘विशुद्ध रसायनी प्रा. लि. ठाणे’ येथे त्यांना अकाऊंट्स विभागात नोकरी मिळाली. 1991 साली त्यांची संदिप जोशी यांच्याशी विवाहगाठ बांधली गेली. संदिप हे सुद्धा डोंबिवलीकर असल्याने, लग्नानंतरही माधवी या डोंबिवलीकरच राहिल्या. संदिप हे सेंट्रल एअर-कंडिशनिंग यंत्रणेच्या मार्केटिंग आणि सेल्स विभागात कार्यरत होते. माधवी यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा मोहित आणि धाकटी मुलगी साक्षी. 1996 साली नोकरी करत असतानाच मोहितचा जन्म झाला. पण, माहेर आणि सासरहून पाठिंबा असल्यामुळे माधवी यांनी नोकरी सुरु ठेवली. 2000 साली साक्षीचा जन्म झाला आणि मग मात्र माधवी यांनी नोकरी सोडली. त्यांनी पूर्ण वेळ मुलांच्या संगोपनासाठी देण्याचे ठरविले. त्यांचा मुलगा मोहित आणि सून श्वेता हे दोघेही कमर्शियल आर्टिस्ट आहेत तर, मुलगी साक्षी हिने कथ्थकमध्ये ‘विशारद’ आणि ‘एमए’ केले आहे.

माधवी या नोकरी करत असतानाच, त्यांच्या सासूबाई ‘भजनभूषण’ नलिनी जोशी यांच्याकडे भक्तिसंगीत शिकत होत्या. तसेच, त्यांच्याबरोबर भजनाच्या कार्यक्रमातदेखील सहभाग घेत. नोकरी सोडल्यानंतरही त्यांचा सासूबाईसोबतचा संगीतप्रवास सुरूच होता. 2016 साली रिमा देसाई यांच्या ‘आय डॉल’ आणि ‘पर्ल्स ऑफ व्हीजन’ या दोन ‘एनजीओ’शी त्यांचा परिचय झाला. या संस्था शाळा व महाविद्यालयीन अंध विद्यार्थ्यांसाठी मराठी व हिंदी भाषेत पेपर लिहिणे, त्यांचा अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करून देणे, तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम ध्वनिमुद्रित करून देण्याचे सामाजिक कार्य, विनामूल्य तत्त्वावर करून देतात. सध्या या दोन्ही ‘एनजीओ’च्या माधवी या सक्रिय सभासद म्हणून काम करत आहेत. लेखनिक आणि ध्वनिमुद्रक म्हणून आजपर्यंत त्यांनी साधारण 300 कामे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे ‘आय डॉल’साठी काम करणारे जोशी हे पहिलचे कुटुंब आहे.

रुईया महाविद्यालयातील गिरीश पटेल नावाच्या अतिशय हुशार अंध विद्यार्थ्याचे ‘एफवायबीए’पासून ‘टीवायबीए’पर्यंतचे बरेच पेपर लिहिण्याचे काम, माधवी यांनी केले. प्रत्येकवर्षी तो ‘ए प्लस’ श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याला महाविद्यालयातर्फे ‘बेस्ट स्टुडंट’चा अ‍ॅवॉर्डदेखील मिळाला आहे. त्याला पुण्यातील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेत नोकरीदेखील लागली. त्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी त्याला पुण्यात मदत हवी होती. योगायोगाने माधवी आणि त्यांची मुलगी साक्षी या दोघीही त्यावेळी पुण्यातच होत्या. त्यांनी गिरीशला या कामात मदत केली. गिरीशच्या मदतीला माधवी येणार असल्याने, गिरीशलादेखील खूपच आनंद झाला. नंदुरबार येथून आलेला हा विद्यार्थी, आता पुण्यात स्थायिक झाला आहे. “गिरीशचे पेपर मी लिहिले असल्याचा मला अभिमान आहे,” असे माधवी सांगतात.

राजप्पा हे कॅनरा बँकेत काम करणारे एक अंध कर्मचारी आहेत. बढतीसाठी त्यांना बँकेच्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक होते. त्या परीक्षांच्या क्रमित अभ्यासक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी, राजप्पा बदलापूर ते डोंबिवली प्रवास करून माधवी यांच्या घरी यायचे. पहिल्या परीक्षेसाठी त्यांना ध्वनिमुद्रणासाठी माधवी यांनी मदत केली. त्यानंतरच्या परीक्षेसाठी मोहितने त्यांना मदत केली. आता राजप्पा वरिष्ठपदी पोहोचले आहेत.

माधवी यांच्या सासूबाईंच्या शिष्या आणि डोंबिवलीतील सांस्कृतिक चळवळीच्या प्रणेत्या दिपाली काळे यांच्या प्रोत्साहनामुळे, त्या 2023 साली ‘श्रीकला संस्कार न्यास’ या संस्थेशी त्या जोडल्या गेल्या. या संस्थेचे उपक्रम म्हणजेच बालनाट्य शिबीर, आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा, एक दिवसीय बालनाट्य प्रशिक्षण शिबीर, बडबडगीत स्पर्धा इत्यादींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. घरातील पाच दशकांच्या सांगीतिक वातावरणामुळे 2012 साली कोजगिरी पौर्णिमेस, ‘स्वरझंकार’ या वाद्यवृंदाचा सांगीतिक प्रवास सुरू झाला. माधवी, त्यांचे पती संदिप, मुलगा मोहित, सून श्वेता, मुलगी साक्षी यांच्या सक्रिय सहभागामुळे त्यांची संगीतयात्रा आजतागायत सुरू आहे. हिंदी, मराठी चित्रपट गीते व मराठी भावगीतांवर आधारित निवडक कार्यक्रम त्या करतात. तसेच 2025 सालापासून ठिकठिकाणच्या सहकार्याने ‘चित्रपट संगीत रसास्वाद कार्यशाळा’, स्वरझंकारच्या माध्यमातून आयोजित केली जात आहे. या सर्व उपक्रमांमध्ये संहितालेखन आणि निवेदनाची जबाबदारी माधवीच पार पडतात. अशा प्रकारे सर्वांच्या मदतीला धावणार्‍या माधवी यांना, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!


जान्हवी मोर्ये
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121