आज ज्या कलाकाराची ओळख आपण करून घेत आहोत, त्यांची समाजमाध्यमांवर चित्रे बघितली की, एकच प्रश्न ओठी येतो, ‘ये कौन चित्रकार हैं...’
प्रेमाने जग जिंकता येते आणि पुस्तकासारखी माणसे वाचली, तर जीवनात पुढे होणारा अनर्थ टळतो,’ असे सुंदर आणि प्रगल्भ विचार जगणारी ही व्यक्ती म्हणजे दत्ता खाडे. सातारा जिल्ह्यातील एनकुळ या गावातून आपल्या अद्भुत आणि इतरांना चकित करणार्या प्रतिभेचे जन्मजात देणे लाभलेल्या दत्ता खाडे यांची चित्रकारितेतील नजाकत अतिशय विलोभनीय आणि मन प्रसन्न करणारी अशीच!
गावीच महर्षी शिंदे विद्यालयात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दत्ता खाडे यांनी उच्च आणि उच्चतर शिक्षण कराडच्या शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातून घेतले. सुरुवातीला ते शासकीय सेवेत कार्यरत होते. मात्र, नंतर त्यांनी स्वतंत्र व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केले. मात्र, हा व्याप सांभाळताना त्यांनी जपली ती त्यांची चित्रकारिता. त्यांच्या प्रतिभेचे धुमारे असे काही रंग उधळतात की, हे चित्र आपल्याशी जणू संवाद साधत असल्याची अनुभूती येते. त्यांची चित्रं पाहिली की, आपसूकच ओठी शब्द येतात, ते पं. भरत व्यास यांनी लिहिलेल्या गाण्याचे ‘ये कौन चित्रकार हैं, ये कौन चित्रकार...’
एखादे लहान बाळ बघितल्यावर आपण जसे त्याच्या अनाहूतपणे निर्वाज्य प्रेमात पडतो, तशीच दत्ता खाडे यांची बोलकी चित्रे. ती बघितली की कुणीही त्यावर ‘व्वा!!!’ असे उत्स्फूर्त उद्गार काढल्याशिवाय राहणार नाही, इतके त्यात अल्लड सौंदर्य दडलेले!
हा माणूस अगदी साधा. मात्र, त्याचे विचार अतिशय प्रगल्भ आणि इतरांना मोहित करणारे. सहसा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना अनेकजण उतावीळपणा दर्शवितात. मात्र, दत्ता खाडे हे नेहमी संयतपणे व्यक्त होतात. अशा काही पोस्ट व्हायरल करतात की, त्या थेट मनाला भिडतात. विशेषतः त्यांच्या चित्रकलेतून त्यांच्या उत्तुंग प्रतिभेचे दर्शन घडत असते. अलीकडील उदाहरण द्यायचे म्हटले, तर देशात सर्वांचा लाडका असलेला आपला क्रिकेटपटू विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली काय आणि लगेच दत्ता खाडे यांनी त्याचे अप्रतिम रेखाटन जारी करून ‘वाहवा’ मिळविली काय. अर्थात, ही त्यांची ‘वाहवा’ म्हणजे त्यांच्या कलेचे सर्वांनी केलेले कौतुकच. याच प्रेमाच्या बळावर त्यांची प्रतिभा आता दिवसेंदिवस बहरत आहे.
याशिवाय त्यांना फोटोग्राफी, पर्यटन, नवनवीन पाककृती बनवणे, रांगोळी रेखाटणे असे विविध छंद आहेत. त्यांना चित्रकलेची आवड माध्यमिक शाळेत असल्यापासून होती. त्यांनी ‘एलिमेन्ट्री’, ‘इंटरमिजिएट’ परीक्षा उत्तीर्ण केल्या, स्पर्धेत भागसुद्धा घेतला. शाळा-महाविद्यालयांमध्ये यामुळे मान-सन्मान होत होते, पारितोषिके मिळत होती. विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवरही त्यांची चित्रे व्हायरल व्हायला लागली आणि दत्ता खाडे हे नाव सुपरिचित झाले. लोकांचा प्रतिसाद त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरत गेला, आनंद देत गेला. समाजमाध्यमांतून खूप चित्रकार त्यांच्या संपर्कातही आले. त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असल्याचे ते प्रांजळपणे कबूल करतात.
आई-वडिलांचे पाठबळ, आशीर्वाद हे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणतात की, “घरातून पाठबळ मिळाल्यामुळेच अभ्यासासोबत चित्रकारितेत रमत गेलो. विशेष म्हणजे, शाळेत झालेल्या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवत होतो, तसेच ‘एलिमेन्ट्री’, ‘इंटरमिजिएट’मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत होतो. त्यामुळे हळूहळू घरच्यांचेही पाठबळ मिळत गेले. योग्य वेळेत मिळालेला मार्गदर्शक हा कोळशाच्या खाणीत सापडलेल्या हिर्यासारखा असतो,” असे दत्ता खाडे म्हणतात.
शालेय जीवनात किशोर मार्तंडे तसेच महाविद्यालयीन जीवनात सुनिल सोलापूरे आणि आता बाहेरील जगात असताना जितू काळे, संदीप बेलवलकर या मान्यवरांनी मार्गदर्शन केल्याचे खाडे सांगतात. तसेच काही चुका असतील, त्या चुका लक्षात आणून दिल्या. त्यामुळे नेहमीच नवनवीन शिकायला मिळाले, अशी प्रामाणिक भावनादेखील ते व्यक्त करतात. “आज मी जो काही आहे, ते सर्व आई-वडिलांचे आशीर्वाद, माझे परिश्रम, गुरूजनांचे मार्गदर्शन यांमुळे आहे, अशी कृतार्थ भावना दत्ता खाडे बोलून दाखवतात.
विशेष म्हणजे, समाजमाध्यमांवरील चित्र व्हायरल झाल्याने ते ‘कोण होणार करोडपती मराठी’मध्ये पोहोचले. तसेच, विविध क्षेत्रांतील राजकारणी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, शैक्षणिक, सामाजिक कार्याती मंडळी यांमुळे खूप लोकांचा त्यांना पाठिंबा मिळाला. “आपल्या कौतुकामुळे नवीन ऊर्जा मला मिळत गेली. लोकांना स्वतःचे चित्र पाहण्यात वेगळाच आनंद असतो, त्यामुळे लोक खूपच उत्सुक असतात,” हेदेखील ते मान्य करतात. “आपल्याला मिळालेला पुरस्कार म्हणजे आपल्या कलेची लोकांकडून मिळत असलेली कौतुकाची थाप आहे,” असे दत्ता खाडे यांना वाटते.
त्यांच्यातून ज्या ज्या मंडळींनी चित्रे काढून घेतली, त्यांच्याकडून खाडे यांना बरीच पुस्तके भेट स्वरुपात मिळाली. यामुळे विशेषत्वाने लेखक वर्गासोबत चांगला संपर्क वाढल्याचे, मित्रदेखील वाढल्याचे ते सांगतात. अनेकदा शालेय कार्यक्रमांत ‘प्रमुख उपस्थिती’ किंवा ‘अध्यक्षपद’ हाच गौरव पुरस्कार म्हणून मला मिळत असतो; त्यामुळे दत्ता खाडे यांची एक नवीन ओळख निर्माण झाली आहे. तेव्हा, अशा या इतरांना आपल्या कलेतून आनंद प्रदान करणार्या अवलिया चित्रकारास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर
(अधिक माहितीसाठी संपर्कः 8600422189)